Skip to main content
x

वैद्य, डॉ. सरोजिनी शंकर

     डॉ. सरोजिनी शंकर वैद्य यांचा जन्म व शिक्षण पुणे येथे झाले. त्यांनी १९५६मध्ये पुणे विद्यापीठातून प्रथमवर्गात, प्रथम क्रमांकाने एम.ए. (मराठी) उच्च पदवी प्राप्त केली.  १९५७ ते १९९३ अशी एकूण सदतीस वर्षे त्यांनी अध्यापन क्षेत्रात निष्ठेने काम केले. या कालखंडात त्यांनी मराठीचे अध्यापन केले.

     १९५७ ते १९६२ दरम्यान सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे; १९६९ ते १९७२ दरम्यान रुईया महाविद्यालय, मुंबई येथे अध्यापन व १९७२ ते १९८५ दरम्यान या काळात मुंबई विद्यापीठात प्रथम अधिव्याख्याता व नंतर मराठी विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले व अध्यापनही केले.

     निवृत्तीनंतरही त्यांनी महाराष्ट्र ‘राज्य मराठी विकास संस्था’ या संस्थेच्या संस्थापक व संचालक म्हणून कार्य केले आणि त्या संस्थेची पायाभरणी केली. कार्यकालादरम्यान कोशवाङ्मयसूची, चरित्र माहिती, परिभाषाकोश अशा मूलगामी योजना आखून त्या पार पाडल्या. १५ जून, १९९९ पासून ४ जुलै, २००१ पर्यंत शासकीय, तसेच खासगी स्तरांवर अनेक संस्थांना मार्गदर्शन केले. मराठी भाषेच्या व वाङ्मयाच्या अभिवृद्धीसाठी अथक परिश्रम केले. अखेरच्या श्वासापर्यंत मराठी वाङ्मयलेखन करीत राहणार्‍या साहित्यिकांपैकी त्या एक आहेत.

     त्यांनी पीएच.डी.साठी लिहिलेल्या प्रबंधाचा विषय होता,  ‘नाट्यछटाकार दिवाकर शंकर गर्गे यांच्या समग्र साहित्याचा समीक्षात्मक अभ्यास’ या विषयाचे सतत चिंतन असल्याने, त्यावर त्यांनी वारंवार लेखन केले. त्यांची ग्रंथसंपदा विविधांगी आहे. ललितलेखन, चरित्रलेखन, वैचारिक लेखसंग्रह, समीक्षा आणि आत्मलेखनपर वेध घेणारे अत्यंत कसदार असे लेखन त्यांनी केले. त्यांच्या अनेक ग्रंथांना शासनाचे पुरस्कार मिळाले.

     त्यांचा पहिलाच ललितलेखसंग्रह ‘पहाटपाणी’ (१९७५) त्यानंतर ‘माती आणि मूर्ती’ (समीक्षा, १९७५), ‘काशीबाई कानिटकर’, ‘चरित्र व आत्मचरित्र’ ‘टी.एस. इलियट आणि नवीन मराठी कविता’, (समीक्षालेख), ‘समग्र दिवाकर’, (नाट्यछटाकार दिवाकरांचे अप्रकाशित लेखन, १९९६) ‘संक्रमण’ (वैचारिक लेख) अशा विविधांगी दृष्टीनी त्यांचे लेखन संपन्न झाले आहे. भारतीय शिक्षण प्रतिष्ठानाकडून त्यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (१९८८) प्राप्त झाला. सत्यशोधक पुरस्कार (ओतूर १९९४) हा शैक्षणिक कार्यासाठीचा पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्यांनी बडोदा वाङ्मय परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. राज्यशासनातर्फे दिले जाणारे अनेक वाङ्मयपुरस्कार त्यांच्या ललितलेखनाला, चरित्रवाङ्मयाला देण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे पुरस्कार, सु.ल.गद्रे पुरस्कार, नगर वाचनमंदिर पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले.

      ‘पहाटपाणी’, ‘माती आणि मूर्ती’ यापाठोपाठ ‘गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी’ (१९७८), ‘काशिबाई कानिटकर आत्मचरित्र आणि चरित्र’ (१९८७), ‘ललित निबंध’ (१९८०), ‘जीवनलेखन’ - नाटक, ‘रमाबाई रानडे, व्यक्ती आणि कार्य’, ‘संक्रमण’ (वैचारिक, १९९६), ‘आठवणी काळाच्या आणि माणसांच्या’ (महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार), ‘समग्र दिवाकर’ (जांभेकर पुरस्कार) ‘लंडनच्या आजीबाईंची गोष्ट’ इत्यादी चरित्रवाङ्मय, ‘वाङ्मयीन महत्ता’ (१९९१), अशी महत्त्वपूर्ण पुस्तके त्यांनी लिहिली.

     विद्यापीठात विभागप्रमुख असताना त्यांनी डॉ. वसंत पाटणकरांच्या सहसंपदनाने समीक्षालेख प्रकाशित केले. मराठी व्याकरणासारख्या विषयाच्या मूलगामी विवेचनाला (कृ.श्री. अर्जुनवाडकरकृत) ग्रंथ प्रकाशनासाठी साहाय्य केले. तसेच, अमराठी मंडळींसाठी मराठी शिक्षणक्रम बनवून त्यांना नोकरीत आवश्यक असणार्‍या प्रमाणपत्राची व पदविकेची सुविधा उपलब्ध करून दिली. सातत्याने आणि  मूलगामी कार्य करीत राहणे व त्याचबरोबर इतरांना त्यात सहभागी करून प्रगतीची वाट दाखवणे, हा त्यांचा स्वभाव होता. श्रमसातत्याला तर तोडच नव्हती.

     त्यांनी केलेले आणखी एक अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे ‘ज्ञानदेवी’चे संपादन आणि लेखन. केळकर-मंगरूळकरांनी संपादिलेल्या ज्ञानदेवीचे ‘हार्द’ त्यांनी आपल्या प्रस्तावनेतील १५० पानांत उलगडून दाखविले (१९९४). ज्ञानदेवीच्या या तीन खंडांचे संपादन हा त्यांच्या विद्वत्तेचा, सहृदयतेचा आणि मौलिक वैचारिकतेचा परिपाक होय. या प्रकल्पाने त्यांना श्रमसाफल्याचा आनंद दिला आहे आणि मराठी मनाला संस्मरणीय भेट बहाल केली आहे.

     मराठीतील चरित्रवाङ्मयाचा जेव्हा विचार होतो, विशेषतः अर्वाचीन काळातील प्रबोधन चळवळींच्या काळातील व्यक्तींची चरित्रे हा चर्चेचा विषय असतो; तेव्हा सरोजिनीबाईंचे नाव आवर्जून घ्यावे लागते. हा काळ वैचारिक प्रबोधनाचा, खळबळीचा असून तो सरोजिनीबाईंच्या चिंतनाचा, औत्सुक्याचा आणि विशिष्ट संस्कारित जीवनाचा विषय आहे. म्हणून त्यांनी दिवाकरांवर लिहिले, गोपाळ हरी देशमुखांवर लिहिले, काशिबाई कानिटकरांवर लिहिले आणि लंडनच्या आजीबाई वनारसेंवर त्यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीवरून लिहिले. त्या-त्या व्यक्तींच्या वेळचा काळ सजीव केला. त्या व्यक्ती चरित्रातून मूर्तिमंत उभ्या केल्या. त्यासाठी खूप परिश्रम केले आणि जाणकारीने माणसे वाचली. आपल्या कल्पनाशक्तीचा कस लावून वास्तव उमजून घेऊन त्यांनी काहीशा वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तींचे चित्रण परिश्रमपूर्वक केले आहे. त्यांनी चरित्रवाङ्मयाला एक वेगळे कसदार वळण दिले.

     काशिबाई कानिटकरांसंबंधी सरोजिनीबाईंना एक भावनिक आकर्षण असल्याचे जाणवते. कानिटकर कुटुंबाच्या आठवणी, समकालीन लेखक, पत्रव्यवहार यांचे साहाय्य घेऊन एकूणच त्या काळाचे सांस्कृतिक वळण लक्षात घेऊन सरोजिनीबाईंनी कानिटकरांच्या आयुष्याचा अन्वयार्थ शोधला आहे. त्यातूनही काही वगळले गेले, काही चुकीचे वाटले त्यासाठी ‘उत्तरायणा’चा प्रपंच केला. त्या-त्या चरित्रनायकांबरोबर त्या काळात त्या ‘जगल्या’ असे म्हटले तरी योग्य होईल. लंडनच्या आजीबाईंच्या चरित्राबाबत त्या म्हणतात, “विशिष्ट स्थितीचा मागोवा घेत मी आजींच्या आयुष्यातलं वास्तव पाहिलं आहे आणि शब्दांकित केलं आहे. वाचकांना ते मराठी स्त्री-जीवनाचा, मनुष्याच्या पिंडप्रकृतीचा आणि आपल्या जगातील मूल्यविचारांचा वेध घ्यायला लावील, असा विश्वास वाटतो.” हा विश्वास सार्थच आहे.

     ‘पहाटपाणी’, ‘शब्दायन’ यांमधील ललित लेख प्रसन्न शैलीत अनुभवरूपाला साकार करणारे, ‘आत्मीय’ अनुभव प्रकट करणारे आहेत. आजूबाजूचा समाज, त्यातील माणसांचे जगणे, वागणे व स्वतःला आलेले अनुभव यांवर त्यांनी या लेखातून नेमकेपणाने बोट ठेवले आहे.

     त्यांनी अखेरच्या टप्प्यावर लिहिलेला ‘वासुदेव बळवंत पटवर्धन’ यांच्यासंबंधीचा ग्रंथ वेगवेगळ्या कारणांनी महत्त्वाचा आहे. सुमारे वीस वर्षे हा विषय लेखिकेच्या मनात होता. मराठीच्या समीक्षेसंदर्भात जे काम पूर्वी झाले नाही, आणि पुढे होणार नाही; असे काम म्हणजे ‘मासिक मनोरंजन’विषयी. १८८५ ते १९३५ या काळात ‘मासिक मनोरंजन’ने फार मोठे कार्य केले. या वेळी वासुदेव बळवंत पटवर्धन हे फर्गसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांनी समीक्षेपर दिलेली व्याख्याने ऐकण्यासाठी बालकवी येत. माधवराव पटवर्धनही येत. यासंबंधी का.र.मित्र यांनी केलेला पत्रव्यवहार या संदर्भातले महत्त्वाचे संदर्भ-दुवे सरोजिनीबाईंनी दाखवून दिले आहेत.

     मराठी समीक्षेचा पाया या वासुदेव बळवंत पटवर्धनांच्या व्याख्यानांमधून घातला गेला. त्यांच्याविषयीचा हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा असून तो लिहून पुरा करण्याचा ध्यास बाईंनी घेतला होता. मराठी वाङ्मय समीक्षेविषयी वासुदेव बळवंत पटवर्धन यांचे हे महत्त्वपूर्ण कार्य मराठी वाङ्मयविश्वापुढे आले पाहिजे, म्हणून हा ग्रंथ निर्माण झाला. आज त्याचे महत्त्व अधोरेखित होत आहे.

     बाईंनी आयुष्यभर ज्ञानसाधना केली. त्यांना ‘वाग्विलासिनी’ म्हणून मानले गेले. दादर वनिता समाजाने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविले. महाराष्ट्र सेवा पुरस्कार, द.ग. गोडसे यांच्या कलामीमांसेसाठी दिलेला पुरस्कार, त्यांच्या एकूण पाच पुस्तकांना मिळालेले महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार आणि भारतीय शिक्षण प्रतिष्ठानाने केलेला गौरव हेच प्रमाणित करतात की, सरोजिनीबाईंनी वाङ्मयसेवक म्हणून केलेले कार्य अत्यंत मौलिक आहे.

     मराठी वाङ्मयात काही दाम्पत्यांनी लक्षणीय कार्य केले आहे. कवी अनिल आणि कुसुमावती, इंदिरा संत आणि ना.मा. संत यांप्रमाणेच डॉ. सरोजिनी वैद्य आणि कवी शंकर वैद्य हे दाम्पत्यही मराठी वाङ्मयक्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी लक्षात राहील असे आहे.

- प्रा. अनुराधा साळवेकर

वैद्य, डॉ. सरोजिनी शंकर