Skip to main content
x

वासवानी,थांवर लीलाराम

साधू वासवानी

 साधू थांवर लीलाराम वासवानींचा जन्म  हैद्राबादच्या (पाकिस्तानातील) सिंध प्रांतात, कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी झाला. अनेकांशी भ्रातृभावाने नाते जोडणार्‍या या मानवतावादी व्यक्तीला सारे ‘दादा’ या नावानेच ओळखत. त्यांच्या मनातल्या विश्वबंधुत्वाच्या भावनेपासून कोणतीही जात, पंथ, धर्म, व्यक्ती इतकेच काय, पण पशू, पक्षी, निसर्गाचे कोणतेही रूप वंचित राहिले नव्हते. त्यांचे नाव ‘थांवर’ ठेवले गेले. ‘थांवर’ या सिंधी शब्दाचा अर्थ आहे, ‘स्थिर.’ आई-वडिलांचे हे दुसरे अपत्य. त्यांच्या आईचे नाव वरणदेवी आणि वडिलांचे लीलाराम होते. वडील कालीमातेचे भक्त होते, तर आईची श्रद्धा गुरू नानकांवर होती. तिच्या तोंडी सदैव ‘वाहे गुरू’चा जप असे. वासवानींच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले. आईनेच पुढे त्यांचा सांभाळ केला. साधू वासवानी लहानपणापासूनच एकांतप्रिय होते. लहानपणीच कालीमातेच्या मंदिरात मिळालेल्या प्रसादाचा त्यांनी त्याग केला होता, कारण तो प्रसाद मांसाहारी होता. सर्व प्राणिमात्र आपले बांधव आहेत, या मुक्या प्राण्यांचा घास आपल्या आनंदासाठी घेणे ही गोष्ट त्यांच्या मनाला कदापि रुचणारी नव्हती. म्हणूनच आजन्म शाकाहारी राहण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली. सर्वांठायी एकच ईश्वरी तत्त्व आहे अशी त्यांची धारणा होती, म्हणूनच सर्व प्राणिमात्रांवर त्यांनी आयुष्यभर  निस्सीम प्रेमच केले. साधू वासवानी यांचा जन्मदिवस जगभरात ‘शाकाहारी दिन’ (मीटलेस डे) म्हणून पाळण्यात येतो.

एका चांदण्या रात्री, वयाच्या आठव्या वर्षीच आपल्या घराच्या गच्चीवर एकांतात ध्यानस्थ बसलेल्या थांवरला साक्षात्कार झाला. आत्मज्ञानाची प्राप्ती झाली, आणि जगाला शांती आणि प्रेमाचा संदेश देण्याची प्रेरणा मिळाली. थांवर शाळेत जाऊ लागला. त्या काळी पंतोजी मुलांना छडीचा मार देऊन शिकवत असत. थांवरला ते मुळीच रुचले नाही. थांवरने असे ठरवून टाकले, की मोठे झाल्यावर आपण नव्या शिक्षणप्रणालीने शिक्षण देणारी शाळा काढायची; जिथे मास्तर हातातल्या छडीचा नाही, तर प्रेममय वृत्तीचा उपयोग शिक्षण देण्यासाठी करतील. त्यांचे हे स्वप्न ‘सेंट मीराज विद्यालया’च्या रूपाने साकार झाले. ते सिंधमधील ‘अकॅडमी’ नावाच्या शाळेचे विद्यार्थी होते. या शाळेचे मुख्याध्यापक होते, संत साधू हिरानंद. साधू हिरानंद थोर समाजसुधारकही होते. त्यांनी व्यसनमुक्तीसाठी शाळेतल्या विद्यार्थ्यांची संघटना बांधली होती, जिचे नाव होते ‘बॅण्ड ऑफ होप.’ साधू वासवानी या संघटनेचे सक्रिय सदस्य होते. सुसंस्कारित जीवनाचा ‘श्रीगणेशा’ अशा प्रकारे त्यांनी शाळेतच गिरवला.

शाळेत शिकत असतानाच ते ‘ब्रह्मबांधव’ नावाच्या एका ज्ञानी बंगाली व्यक्तीच्या सान्निध्यात आले. ब्रह्मबांधव यांच्या प्रभावामुळे त्यांना भारतीय तत्त्वज्ञान आणि उपनिषदांच्या अभ्यासाची ओढ निर्माण झाली. त्यांनी आपले सुरुवातीचे एक पुस्तक ‘विटनेस ऑफ दी एन्शंट’ ब्रह्मबांधवांनाच समर्पित केलेले आहे. ‘डॉ. अ‍ॅनी बेझंट’ यांच्या वक्तृत्वाने त्यांच्यावर असाच प्रभाव टाकला होता. साधू वासवानी एक प्रज्ञावंत विद्यार्थी होते. त्यांनी बी.ए.ची परीक्षा उत्तम रितीने दिली. त्यांना मुंबई विद्यापीठाची ‘एलिस शिष्यवृत्ती’ प्राप्त झाली होती. ते कराची येथील डी.जे. सिंध महाविद्यालयाचे ‘दक्षिणा फेलो’ही होते, तसेच त्यांनी १९०२ साली एम.ए.ची पदवीही प्राप्त केली. त्यांनी ‘आजन्म ब्रह्मचारी’ राहून मानवांची सेवा करण्याचे विशाल स्वप्न पाहिले होते. त्यासाठी फकीर बनण्याची विलक्षण ओढ त्यांच्या मनाला लागली होती. आपल्या प्रेमळ आईला ही आपली इच्छा कशी बोलून दाखवावी हा विचार त्यांच्या मनाला त्रस्त करणारा असाच होता. पण जेव्हा त्यांनी आईसमोर आपली इच्छा प्रकट केली तेव्हा आईने त्यांना मोेठ्या मनाने आशीर्वाद दिला.

साधू वासवानींना कलकत्त्याच्या प्रसिद्ध मेट्रोपॉलिटन महाविद्यालयाकडून प्राध्यापकाच्या सन्माननीय हुद्द्यावर बोलावणे आले. कलकत्त्याला आल्यावर त्यांनी श्रद्धेय अंत:करणाने स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या पुनीत वास्तव्य असलेल्या वास्तूचे दर्शन घेतले. कलकत्त्याला असताना एकदा रस्त्यावरून जात असताना शेजारच्या लहानशा घरातून त्यांना चैतन्य महाप्रभूंचा महामंत्र ‘हरि बोल, हरि हरि बोल’ या मंत्राचे गायन ऐकू आले. तेव्हा ते मंत्रमुग्ध होऊन त्या घरात शिरले, आणि तिथेच त्यांना आपल्या गुरूंच्या प्रथम दर्शनाचा लाभ झाला. हे गुरू होते महात्मा केशवचंद्र यांचे पुतणे व ब्राह्मो समाजाचे संस्थापक प्रमोथोलाल सेन. ‘स्वदेशी’च्या चळवळीचे ते दिवस होते. याच सुमारास टिळक कलकत्त्याला आले आणि त्यांच्यावर टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचा खोल ठसा पडला. कलकत्त्यालाच त्यांना रवींद्रनाथ टागोरांच्या सहवासाचाही लाभ मिळाला होता.

ते १९१० साली बर्लिनला ‘विश्वधर्म’ परिषदेस उपस्थित राहिले. त्यांची १९१४ साली लाहोर येथे ‘दयालसिंह’ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नेमणूक झाली. त्यांनी त्यानंतर कुचबिहार येथील व्हिक्टोरिआ महाविद्यालय आणि पतियाळा येथील महाविद्यालयाचे प्राचार्यपद भूषविले.

१९१९ साली त्यांच्या मातु:श्रींचे निधन झाले. भारतमातेच्या मुक्तीसाठीही त्यांनी हिरीरीने स्वातंत्र्यसंग्रमात उडी घेतली. डॉ. शास्त्रींच्या सहयोगाने त्यांनी ‘शक्ती आश्रमा’ची स्थापना केली. १९२९ साली कराचीला त्यांच्या मोठ्या भावाचे निधन झाले आणि साधू वासवानी कराचीला कायमचे वास्तव्य करण्याच्या इराद्याने परत आले. आपल्या समाजातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सबलीकरणासाठी त्यांनी तिथे ‘सखी-सत्संग’ सुरू केला. ‘सखी-सत्संगा’तर्फे प्रभातफेरी निघत असे. या प्रभात फेरीला त्यांनी ‘हरिसेना’ असे नाव ठेवले.

३ जून १९३३ या दिवशी त्यांनी लहान मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न पाहिले. ४ जून १९३३ रोजी  ताबडतोब वैदिक मंत्रोच्चाराच्या घोषात, पवित्र हवन करून अग्नीच्या साक्षीने त्यांनी ‘संत मीरा विद्यालया’ची (सेंंट मीराज स्कूल) या मुलींसाठीच्या शाळेची घोषणा केली. संत मीराबाईंचा आदर्श या मुलींसमोर सतत राहावा म्हणून त्यांच्या नावाने ‘मीरा मूव्हमेंट’ ही शैक्षणिक चळवळ सुरू केली. ज्ञानाची परिणती सेवाभावामध्ये व्हावी अशीही त्यांची अपेक्षा होती. ‘मानवतेची सेवा हीच ईश्वरसेवा आहे’, अशी त्यांची शिकवण होती.

१९३३ साली साधू वासवानींनी पंजाबमध्ये परिभ्रमण केले. या परिभ्रमणानंतर मनन-चिंतनासाठी ते ‘झिरकन’ या शांत स्थळी एकांतवासात राहिले होते. तेथेच ‘नूरी’ हे टोपण नाव घेऊन त्यांनी काही सिंधी काव्यरचना केली. त्यांनी चितोड येथील मीरेच्या मंदिराचा जीर्णोद्धारही केला. स्त्रियांमधील चेतनेला स्फुल्लिंगित करून चेतवण्याचे महान कार्य त्यांनी आरंभिले होते, त्याची प्रमुख प्रेरणा ‘संत मीराबाईं’ची होती.

फाळणीनंतर साधू वासवानी १३ फेब्रुवारी १९४९ रोजी पुण्याला आले आणि तिथपासूनच ‘पुणे’ ही त्यांनी आरंभलेल्या महान कार्याची कर्मभूमी झाली.  १९६६ साली त्यांचे निधन झाले.

आज पुणे स्थित ‘साधू वासवानी मिशन’ जगाच्या पाठीवर एक महनीय कार्य करणारी मानवतावादी सामाजिक संस्था म्हणून गणली जाते. साधू टी.एल. वासवानी आणि दादा जे.पी. वासवानी यांच्या आदर्शांना अनुसरून संस्था अनेक समाजोपयोगी कार्ये करते. साधू टी.एल. वासवानी यांच्या निधनानंतर साधू जे.पी. ऊर्फ दादा वासवानी सध्या त्यांचे कार्य पुढे चालवीत आहेत.

डॉ. माधवी वैद्य

वासवानी,थांवर लीलाराम