Skip to main content
x

वडावाला सुमेध

      विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात (१९९१ ते २०००) मराठी कथेत सुमेध वडावाला नावाचा कथाकार प्राधान्याने पुढे आला. अर्थात, १९८६पासून कथालेखन करणारे ते मूळचे रिसबूड आडनावाचे असून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हे त्यांचे मूळ गाव. ते मुंबईच्या माझगाव डॉक्समध्ये नोकरीत आहेत.

      ‘डुफलीवाले’ ही त्यांची वेगळ्या प्रकारची कथा ‘धनुर्धारी’ मासिकातून प्रसिद्ध झाली. त्यानंतर १९८९ साली ‘स्त्री’मधील ‘बाजार’ या कथेने त्यांच्यावर कथाकार म्हणून शिक्कामोर्तब झाले आणि पुढच्या दशकात त्यांचे ‘सांजवा’ (१९९३) आणि ‘चांदणफुला’ (१९९५) हे तोपर्यंत लिहिल्या गेलेल्या प्रारंभिक कथांचे संग्रह प्रसिद्ध झाले.

      वडावाला यांच्या कथेबद्दल लिहिताना समीक्षक डॉ. अंजली सोमण म्हणतात, ‘त्यांच्या कथा दीर्घ आणि वेगळ्या प्रकारच्या असतात. आधुनिकतेपेक्षा परंपरा त्यांना अधिक भावत असावी, असे त्यांच्या कथेचा आशय आणि अभिव्यक्ती लक्षात घेतल्यानंतर वाटत राहते. त्यांच्या कथेतील प्रश्नही नव्या जमान्यातले, नव्या जाणिवेने विचार करणार्‍या स्त्री-पुरुषांमधील नसतात. हे प्रश्नही बरेच वेळा पारंपरिकच वाटतात...’

     सुमेध वडावाला यांच्या भाषेवरील प्रभुत्वाबाबत त्या म्हणतात, ‘त्यांच्या निसर्गवर्णनपर भाषेला अंगभूत लय असते. प्रतिमांचा ते अतिशय सुंदर उपयोग करून घेतात. त्यांची लयबद्ध वाक्ये मनात घर करून राहतात. या दशकातील कथाकारांमध्ये शैलीचा असा बाज फारच थोड्या कथाकारांपाशी सापडतो.’ (म.सा.पत्रिका अंक २८७, ऑक्टो.-डिसें.१९९८; डॉ.अंजली सोमण)

     वडावाला यांच्या कथेने मानवी मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न आपल्या कथांतून केला आहे. मानवातील वैषयिक भावनांचे धीटपणे चित्रण हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. ‘धर्मयुद्ध’, ‘ब्रह्मकमळ’, ‘तृष्णा’ इत्यादी त्यांच्या कादंबर्‍या असून पैकी धर्मयुद्ध पूर्ण संवाद-स्वरूप अशी आहे.

     अल्पावधीतच श्रेष्ठ कथाकार म्हणून पुढे येत असलेले सुमेध वडावाला अल्पावधीतच तशा कथालेखनापासून दूर जात आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे. गेल्या काही वर्षांत ते परिचयात्मक वृत्तपत्रीय धाटणीचे लेखन करतात; त्यांची पुस्तके प्रसिद्ध होत असली तरी चांगली क्षमता असलेला त्यांच्यातील कथाकार हरवत चालल्याची खंत निश्चितच आहे. जुन्यांतून वेगळे काहीतरी देणारा कथाकार म्हणून त्यांची नोंद आहे. त्यांना अनेक प्रतिष्ठेचे साहित्यिक पुरस्कार मिळाले आहेत.

     - मधू नेने

वडावाला सुमेध