Skip to main content
x

व्यास, विद्याधर नारायण

        त्तर हिंदुस्थानी रागदारी संगीतातील विख्यात पं. नारायणराव व्यास यांचे सुपुत्र विद्याधर यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई. विद्याधर व्यासांचे शालेय शिक्षण राजा शिवाजी विद्यालयात (किंग जॉर्ज हायस्कूल) झाले. मुंबईच्याच रुइया महाविद्यालयामधून अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी बी.ए. ही मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली. त्यांनी पदव्युत्तर एम.ए. समाजशास्त्र हा विषय घेऊन केले.

        घरातच गायन असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर गाण्याचे उत्तम संस्कार झाले. पं. नारायणरावांकडून त्यांना खास ग्वाल्हेर घराण्याच्या पलुसकर पठडीतील तालीम मिळाली. याबरोबरच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची ‘संगीताचार्य’ ही पदवीही त्यांनी घेतली.

        जात्याच स्वरेल आवाजाची देणगी लाभलेले व ग्वाल्हेर घराण्याची पक्की तालीम लाभलेले विद्याधर व्यास ग्वाल्हेर घराण्यातील प्रचलित, अप्रचलित रागांतील विविध ख्याल, तराणे, तसेच पलुसकरांनी गायलेली भजनेही सुरेख गातात. त्यांच्या आवाजावर नारायणराव व्यासांच्या लगावांचा प्रभाव आहे. बोल अंगांनी गाण्यावर भर, ग्वाल्हेरी अंगाच्या सरळ-सपाट ताना व प्रवाहितता ही त्यांच्या गाण्याची काही वैशिष्ट्ये होत.

        एक उत्तम शिक्षक व मार्गदर्शक म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. ते १९६४ पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. पदवी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना, पदव्युत्तर एम.ए.च्या विद्यार्थ्यांना ते शिकवत आहेत व मार्गदर्शन करीत आहेत. डॉक्टरेट घेणार्‍या विद्यार्थ्यांनादेखील १९७२ पासून त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. १९७३ साली जयपूर येथील गव्हर्नमेंट म्युझिकल कॉलेजात (राजस्थान संगीत संस्थान) प्राचार्य पदावर त्यांची नियुक्ती झाली. १९८४ साली मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाचे ते प्रमुख झाले. २००४ साली लखनौ येथील भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूटमध्ये कुलगुरू (व्हाइस चान्सलर) या पदासाठी त्यांची निवड झाली. २००७ पासून कोलकात्याच्या आय.टी.सी. संगीत रिसर्च अकॅडमीचे कार्यकारी संचालक म्हणून भार सांभाळला.

        अनेक अधिवेशने, संगीत परिषदा यांतून त्यांचा सहभाग असतो. संगीत विषयावरही त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केले असून ते प्रात्यक्षिकासह व्याख्यानही देत असतात. ते आकाशवाणीवरील उच्च दर्जाचे गायक आहेत. दूरदर्शनवरही त्यांचे कार्यक्रम झाले असून, भारतात व परदेशांतही त्यांच्या मैफली झाल्या आहेत. ‘हिंदुस्थानी रागसंगीताची निर्मिती’ या विषयावरही त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत. त्यांची ‘सुने री मैंने निर्बल के बलराम’ ही ध्वनिचकती निघाली आहे.

        विद्याधर व्यासांचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांनी नाटकातून केलेल्या भूमिका. पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ या नाटकात (१९६९-७३) त्यांनी सदाशिवची भूमिका (जी प्रसाद सावकार करत होते) केली. नाटकाकरिता त्यांनी ‘अतुल व्यास’ हे नाव घेतले होते, तसेच जयपूरमध्ये वास्तव्य असतानाही हौशी नाट्यमंडळातून त्यांनी विविध मराठी नाटकांतून भूमिका केल्या आहेत.

        विद्याधर व्यासांना २००७ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देण्यात आला. मुंबईत वास्तव्य असलेले विद्याधर व्यास यांनी वेगवेगळ्या संगीत संस्थांतून सल्लागार म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम केले.

माधव इमारते

व्यास, विद्याधर नारायण