अभ्यंकर, शंकर कृष्ण
शंकर कृष्ण अभ्यंकर यांचा जन्म सातारा येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील कृष्णाजी गोविंद अभ्यंकर हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांना गाण्याची अतिशय आवड होती. परंतु पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांच्याकडे ते करारपत्र लिहून न देऊ शकल्यामुळे त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. आपल्या मुलांना उत्तम गाता आले पाहिजे या भावनेपोटी त्यांनी मुलांना गायनाचे शिक्षण देण्यास आरंभ केला. उ. अब्दुल करीम खाँ यांच्याकडेही ते मुलांना शिकवायला घेऊन गेले; परंतु खाँसाहेबांनी त्यांना स्वीकारले नाही. मग सातार्यालाच म.रा. दांडेकर यांच्याकडे या भावंडांचे गाण्याचे शिक्षण चालू राहिले. भोरच्या संस्थानाच्या दरबारात गाण्याइतपत ही भावंडे तयार झाली.
ग्वाल्हेरचे कृष्णराव पंडित, अंतूबुवा जोशी, गजाननराव जोशी अशा वेगवेगळ्या गुरूंचे दरवाजे ठोठावून शेवटी शंकर अभ्यंकर वयाच्या सुमारे अकराव्या वर्षी, ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. नारायणराव व्यास यांच्याकडे आले. तेथे जवळजवळ चौदा वर्षे गुरुकुल पद्धतीने राहून त्यांनी शास्त्रीय कंठसंगीताचे शिक्षण घेतले. त्या वेळी विष्णू दिगंबरांच्या पठडीप्रमाणे विद्यार्थ्यांना गायनाबरोबरच इतर वाद्येही शिकविली जात. त्यामुळे अभ्यंकर तबला वादनातही अत्यंत प्रवीण झाले व त्यांनी पुढे अनेकदा पं. नारायणराव व्यास यांना संपूर्ण संगीत मैफलींत तबला संगतही केली. त्यांनी पं. शंकरराव व्यास यांच्याकडून सतार वादनाचेही प्राथमिक धडे घेतले.
नारायणराव व्यास यांच्याकडे राहत असताना त्यांना पलुस्कर पुण्यतिथी व इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने थोर कलाकारांच्या मैफली ऐकण्याची संधी मिळाली. त्यामुळे वेगवेगळ्या घराण्यांच्या गायकीची व थोर गायक-वादकांच्या शैलींची वैशिष्ट्ये त्यांच्या मनावर पुरती बिंबली.
पं. रविशंकर व उ. विलायत खाँ यांच्या सतार वादनाचा एकलव्याप्रमाणे अभ्यास करून त्यांनी सतार वादनात प्रगती साधली. सवाई गंधर्व पुण्यतिथी, गुनिदास संगीत संमेलन यांसारख्या प्रतिष्ठित संगीत महोत्सवांत, तसेच सिंगापूर, इंंग्लंड, पोलंड इ. परदेशांतही त्यांचे सतार वादनाचे कार्यक्रम झाले.
पं. नारायणराव व्यास हे त्यांचे शास्त्रीय कंठ संगीतातील गुरू खरे; पण त्यानंतर पं. कुमार गंधर्व हे त्यांचे ‘मानसगुरू’ ठरले. त्यांच्या गायकीने व विशेषत: त्यांच्या बंदिशींनी ते अत्यंत प्रभावित झाले आणि कुमारांच्याच प्रेरणेने त्यांनी बंदिश निर्मितीला सुरुवात केली. त्यांनी पारंपरिक रागांमध्ये व जोडरागांमध्ये, वेगवेगळ्या तालांमध्ये अनेक आकर्षक बंदिशी बांधल्या. हमीर-नंद, हमीर-केदार, नायकी-मल्हार, मारुबसंत यांसारखे काही जोडराग त्यांनी निर्माण केले, तसेच ‘प्रतीक्षा’, ‘आराधना’ इ. रागांचीही निर्मिती केली. विलंबित ख्याल, छोटे ख्याल, तराणे, तसेच दादरा, ठुमरी, झूला, भजन अशा उपशास्त्रीय संगीतातील रचनांचाही त्यांत अंतर्भाव आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने या बंदिशींचा ‘आराधना’ हा संग्रह १९९१ साली प्रकाशित केला. आजच्या आघाडीच्या गायक-गायिकांनी गायलेल्या अभ्यंकरांच्या अनेक उत्तमोत्तम बंदिशी ध्वनिचकत्यांच्या (सीडी) रूपात रसिकांसमोर आल्या आहेत.
त्यांनी गायन व सतार या दोन्ही क्षेत्रांतील ‘संगीत अलंकार’ ही पदवी संपादन केली. त्यांनी श्री.ना.दा.ठाकरसी महिला विद्यापीठाच्या संगीत विभागात संगीताचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे अध्यापन केले. अनेक सांगीतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. तसेच त्यांनी संगीत शिक्षक संघ, मुंबई या संस्थेचे उपाध्यक्ष या नात्याने गेली चाळीसहून अधिक वर्षे संस्थेचा कार्यभार सांभाळला. अनेक गरीब कलाकारांना शासनाकडून मदत मिळवून दिली.