Skip to main content
x

आकोटकर, रमेश रामचंद्र

             मेश रामचंद्र आकोटकर यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यातील पणज या गावी एका शेतकरी कुुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. वयाच्या १८व्या वर्षापासून त्यांनी पारंपरिक शेती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मात्र त्यांनी शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यांनी प्रामुख्याने केळीचे पीक घेतले. ऊती संवर्धनाची (टिश्यूकल्चर) ग्रँडनैन नं.९ ची रोपे पुणे येथील ऊती संवर्धन प्रयोगशाळेमधून ते आणत व आपल्या पणज येथील ग्रीनशेडनेटमध्ये हार्डनिंग करून इतर शेतकर्‍यांना पुरवत. पूर्वी ही रोपे हैदराबादहून आणावी लागत. त्यामध्ये वेळेचा व पैशांचा अपव्यय होई, तसेच रोपांची मरही होई. आकोटकर यांनी पणज येथे ‘इंद्रायणी अ‍ॅग्रोटेक’ या नावाने केळी रोपे हार्डनिंग केंद्र स्थापन केले आहे. त्याचा लाभ परिसरातील शेतकर्‍यांना होत आहे.

              आकोटकर यांनी केळी विपणन क्षेत्रातही प्रवेश केला असून, त्यांनी १९ ते २० केळी उत्पादक शेतकर्‍यांचा एक गट बनवला व त्याचे नाव ‘महालक्ष्मी केला ग्रूप’ असे ठेवले. त्या काळी व्यापारी वर्ग शेतकर्‍यांकडून केळी खरेदी करताना ६ टक्के कमिशन घेत असत, परंतु 'महालक्ष्मी केला ग्रूप' अस्तित्वात आल्यापासून कमिशनचा दर २ टक्क्यांवर आला आहे. या केंद्रामार्फत शून्य टक्के कमिशनवर केळ्यांची खरेदी-विक्री केली जाते.

             आकोटकर यांनी आपल्या परिसरातील शेतकर्‍यांना केळ्यांबरोबरीनेच आंबा, सीताफळ, पेरू, संत्रा, लिंबू या फळझाडांची लागवड करण्यास प्रोत्साहन दिलेले आहे. या लागवडीसाठी शेततळे व ठिबकसिंचन पद्धतीचा अवलंब केला जातो.

             आकोटकर फळझाडांच्या लागवडीसाठी शेतकर्‍यांना विनामूल्य मार्गदर्शन करतात आणि उत्कृष्ट केळीबाग करणार्‍या शेतकर्‍याला त्या वर्षी ११,०००/-चे पारितोषिक ते देतात. आकोटकर स्वतः केळीचे पीक ३० महिन्यांच्या कालावधीत तीन वेळा घेतात. (१ मुख्य पीक, २ पिल्ली / खोडवा पीक) तसेच दरवर्षी ते ग्रीनशेडनेट (टिश्यू कल्चर हार्डनिंग सेंटर)मध्ये चार महिन्यांच्या कालावधीत ३+३ असे सहा लाख रोपांचे संवर्धन ६० गुंठे क्षेत्रावर करतात. आकोटकर विदर्भाशिवाय मराठवाड्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतात. त्यांचे फलोत्पादन क्षेत्रात व विशेषतः केळींचे उत्पादन, सुधारित तंत्रज्ञान, निरोगी ऊती संवर्धन, रोप उत्पादन व केळी घडांच्या खरेदी-विक्री गटाचे कार्य पाहून महाराष्ट्र शासनाने त्यांना १ जुलै २००९ रोजी नागपूर येथे 'उद्यानपंडित' ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला.

             - डॉ. प्रकाश पुंडलिक देशमुख

आकोटकर, रमेश रामचंद्र