Skip to main content
x

अमरापूरकर, सदाशिव दत्तात्रय

     लनायक म्हणून सर्वपरिचित असणारे, तसेच आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी व त्यातील आत्मीय सादरीकरणामुळे आणि विशिष्ट लकबीतील संवादफेकीमुळे सर्वसामान्य प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिलेले एक महत्त्वाचे अभिनेते म्हणजे सदाशिव अमरापूरकर. त्यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव रमाबाई होते, तर त्यांचे वडील द.ना. तथा दादासाहेब अमरापूरकर हे अहमदनगर शहरातील यशस्वी, प्रतिष्ठित व्यावसायिक, तसेच स्वातंत्र्यसैनिक आणि समाजकार्यकर्ते होते. त्या काळात म्युनिसिपाल्टीचे काऊन्सिलर म्हणूनही ते निवडून आले होते. सदाशिव अमरापूरकर यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर येथे आणि पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठात झाले. त्यांचा अभिनयप्रवास खऱ्या  अर्थाने सुरू झाला तो शालेय जीवनापासूनच. पण त्यांच्या अभिनयातील प्रगल्भता महाविद्यालयीन जीवनातच जाणवू लागली. या काळात त्यांनी युवक महोत्सवांमधून नाटके, एकपात्री नाटिका सादर केले. त्यासाठी त्यांना अनेकानेक पारितोषिकेही मिळाली. अभिनयाबरोबरीनेच त्यांनी कथाकथनामध्ये सहभागी होत ते क्षेत्रही पादाक्रांत केले.

     सदाशिव अमरापूरकर १९७६ मध्ये मुंबईला आले आणि त्यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमध्ये कामे करण्यास सुरुवात केली. त्या वेळेस त्यांनी ‘छिन्ह’, ‘यात्रिक’, ‘कन्यादान’, ‘मी कुमार’, ‘सूर्याची पिल्ले’, ‘हँड्स अप’, ‘अकस्मात’, ‘बखर एका राजाची’ या नाटकांचे दिग्दर्शन करून त्यात अभिनयही केला व आपल्या कामाचा ठसा मराठी रंगभूमीवर सक्षमपणे उठवला. त्यांनी केलेल्या या नाटकांच्या दिग्दर्शनालाही उत्तम प्रतिसाद मिळाला.

      रंगभूमीवरील कारकीर्द गाजत असतानाच त्यांना नचिकेत व जयू पटवर्धन दिग्दर्शित ‘२२ जून १८९७’ (१९७९) या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ती त्यांनी स्वीकारली आणि त्या संधीचे सोने केले. या चित्रपटात त्यांनी साकारलेली लोकमान्य टिळकांची भूमिका त्यांच्या अभिनय कारकिर्दीला कलाटणी देऊन गेली. त्यानंतर त्यांना अनेकानेक मराठी चित्रपटांमध्ये कामे मिळाली. ‘खिचडी’, ‘सावरखेड एक गाव’, ‘झेड पी’, ‘पैंजण’, ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘आरं आरं आबा’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘तांबव्याचा विष्णू बाळा’, ‘आई पाहिजे’, ‘आघात’, ‘कुंकू झालं वैरी’ या चित्रपटांमधून सदाशिव अमरापूरकर सातत्याने प्रेक्षकांच्या समोर आले. पण ते प्रेक्षकांच्या लक्षात राहिले ते ‘खलनायक’ म्हणून. खलनायक साकारण्यासाठी लागणारा दुष्ट प्रवृत्तीचा अभिनय अमरापूरकर आपल्या आंगिक अभिनयातून यथार्थपणे सादर करतात. अर्थात यामागे त्यांचा या विषयाचा अभ्यास असलेला जाणवतो. हा अभ्यास त्यांनी ‘अभिनयाचे प्राथमिक सहा पाठ’ या ग्रंथात शब्दबद्ध केलेला आहे. अभिनयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि शिक्षक यांना हा ग्रंथ मार्गदर्शक ठरतो.

     सदाशिव अमरापूरकर म्हणजे खलनायक असे समीकरण जरी झाले असले, तरी त्यांनी वेगळ्या धाटणीच्या भूमिकाही केलेल्या आहेत. ‘कदाचित’ या अश्‍विनी भावे निर्मित चित्रपटातील त्यांची भूमिका सुहृद पित्याची आहे, लहान मुलीच्या साक्षीवर विश्‍वास ठेवून न्यायालयाने दिलेली शिक्षा संपवून आलेल्या बापाबद्दलचा गैरसमज चित्रपट संपताना दूर होतो, पण बाप असणारा हा मनस्वी कलाकार शेवटच्या दृश्यात खऱ्या अर्थाने हरलेल्या बापाचा अभिनय तत्कालीन भावनेशी समरस होऊन तन्मयतेने रंगवतो. या व्यक्तिरेखेला अभिप्रेत असणारे सुहृदपण सदाशिव अमरापूरकर यांनी नेटकेपणाने व नेमकेपणाने व्यक्त केलेले आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘होऊ दे जरासा उशीर’ या चित्रपटातही त्यांनी भूमिका केली. हा चित्रपट ऑस्करसाठी गेला होता. तसेच चित्रपटाचा १०० वर्षांचा इतिहास उलगडून दाखवणाऱ्या ‘बॉम्बे टॉकीज’ या चित्रपटातही अमरापूरकर यांना अभिनय करण्याची संधी मिळाली. 

     मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतही अमरापूरकर ओळखले जातात ते खलनायकी भूमिकांसाठी. हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवता ठेवता ‘अर्धसत्य’ या चित्रपटातील खलनायकी भूमिकेसाठी ‘फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड’ पटकावणारे अमरापूरकर विनोदी ढंगातील अंतर्यामी खलप्रवृत्ती असणाऱ्या भूमिकाही तितक्याच ताकदीने उभ्या करतात. याचा प्रत्यय ‘इश्क’, ‘कुली नं १’, यांसारख्या चित्रपटांवरून येतो. ‘सडक’ या हिंदी चित्रपटातील तृतीयपंथीय महाराणीची त्यांनी साकारलेली भूमिकाही पुरस्कारप्राप्त ठरली. तसेच ‘कालचक‘ आणि ‘आखरी रास्ता’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही लक्षणीय होत्या.

     नाटक, हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या सदाशिव अमरापूरकर यांनी दूरदर्शन मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाचे दर्शन घडवले आहे. ‘भारत एक खोज’, ‘राज से स्वराज’, ‘शोभा सोमनाथ की’ या मालिकांमध्ये त्यांनी काम केलेच, पण त्याचबरोबरीने त्यांनी ‘भाकरी आणि फूल’, ‘कुलवधू’ या मराठी मालिकांतही काम केलेले आहे.

     रंगमंच, मोठ्या पडदा यावर सहजपणे वावरणाऱ्या या अभिनेत्याकडे असलेले लेखनकौशल्य त्यांनी लिहिलेल्या ‘किमयागार’ या हेलन केलरच्या जीवनावर आधारलेल्या नाटकातून व्यक्त होते. अपंग असणारी हेलन केलर व तिची शिक्षक असणारी अ‍ॅना सुलेवन यांच्या नातेसंबंधावर आधारलेल्या या नाटकातील घटना-प्रसंगांच्या मांडणीतून सदाशिव अमरापूरकर यांच्याठायी असणारी संवेदनशीलता दृग्गोचर होते, तर ‘पैंजण’ या चित्रपटाची पटकथा लिहून त्यांनी पटकथा लिखाणातले आपले कौशल्यही दाखवून दिले आहे.

     सदाशिव अमरापूरकर यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे सामाजिक कार्यकर्त्याची. उपजत असलेल्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी सामाजिक कृतज्ञता निधी उभारण्यात मोलाचे योगदान दिले, तर नर्मदा बचाव आंदोलनात सक्रियपणे सहभागी होत समाजाप्रती असणारी ऋणाची भावना व्यक्त केली आहे. समाजपरिवर्तनासाठी आवश्यक असणारी प्रबोधनाची गरज लक्षात घेऊन त्यांनी सामाजिक विषयांवर गावोगावी व्याख्याने देत असत. साहित्य व सामाजिक विषयांवरचा त्यांचा अभ्यास लक्षात घेऊनच त्यांना चर्चेसाठी प्रसारमाध्यमांकडून सातत्याने बोलावणे यायचे.

    दोनशेहून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये काम करणार्‍या सदाशिव अमरापूरकर यांना फिल्मफेअर, क्रिटिक अ‍ॅवार्ड, पॉप्युलॅरिटी अ‍ॅवार्ड, सर्वोत्तम चरित्र अभिनेता पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले होते. लेखन, अभिनय, सामाजिक चळवळी यांमध्ये सक्रिय असणारे चतुरस्र व्यक्तिमत्त्व म्हणून आपल्या सदाशिव अमरापूरकर यांच्याकडे पाहता येईल.  

- डॉ. अर्चना कुडतरकर

अमरापूरकर, सदाशिव दत्तात्रय