Skip to main content
x

अंकलीकर-टिकेकर, आरती उदय

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील महत्त्वाच्या गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर येथे झाला. त्यांचे बालपण मुंबईत गेले. आई सरला व वडील मोहन अंकलीकर या संगीतप्रिय पालकांनी त्यांच्या गानकौशल्यास प्रोत्साहन दिले. संगीत शिक्षणाबरोबरच त्यांनी पोद्दार महाविद्यालयातून एम.कॉम. ही पदवीही प्राप्त केली.
पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे आरती अंकलीकर यांचे पायाभूत संगीत शिक्षण झाले. नंतर त्यांनी गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं. उल्हास कशाळकर व पं. दिनकर कायकिणी यांसारख्या दिग्गज कलाकारांचे मार्गदर्शन घेऊन आग्रा व जयपूर परंपरेची खासियत आत्मसात केली. एकूण आग्रा, ग्वाल्हेर तसेच जयपूर- अत्रोली घराण्याची गायकी  त्यांनी आत्मसात केलेली आहे.
लहान वयापासूनच त्या मैफली गाजवू लागल्या व त्यांना पं. वसंतराव देशपांडे यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांचे आशीर्वाद व प्रोत्साहन लाभले. पुढे १९७८ साली ‘नाट्यदर्पण रजनी’तील त्यांच्या गायनाने त्या प्रकाशझोतात आल्या.
पती उदय टिकेकर हे अभिनेते, तर सासू सुमती टिकेकर या संगीत-नाट्य अभिनेत्री व सासरे श्रीकृष्ण टिकेकर हे आग्रा घराण्याचे मर्मज्ञ असल्याने लग्नानंतरही या कलासंपन्न कुटुंबात आरती अंकलीकर-टिकेकरांची संगीत कारकीर्द उत्तमरीत्या चालू राहिली. आपल्या सुरेल, मोकळ्या, घुमारेदार, ढंगदार आवाजाची जादू मैफलीत पसरविणाऱ्या आरती अंकलीकर स्वरांचे सूक्ष्म दर्जेही ताकदीने ऐकवितात. बंदिशीची मांडणी त्या रेखीव आणि डौलदार करतात. या गायकीतील पुकार तीव्र आणि परिणामकारक आहे. स्वरात रमण्यापेक्षा तालक्रीडा, लयकारी, लयीच्या अंगाने रचना यांवर त्या भर देतात. अत्यंत प्रभावी, जोरकस, गणिती, अचूक, तयारीची लयकारी या गायकीत आहे. अत्यंत चैतन्यपूर्ण अशी अभिव्यक्ती या गाण्यात आहे. चपळ आणि सुरेल तान आहे. बंदिशींचे वैविध्य हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. अनेक वाग्गेयकारांच्या उत्तमोत्तम बंदिशी त्या आवर्जून सादर करतात व त्यामुळे त्यांची गायकी समृद्ध झाली आहे. या गायनातून प्रखर आत्मविश्वास, बुद्धिमत्ता, आक्रमकता प्रतीत होते. ख्यालाइतकीच ठुमरीही रंगविणाऱ्या काही गायिकांपैकी आरती अंकलीकर एक आहेत. त्यांनी सर्व गानप्रकार गाऊन विपुल व्यावसायिक यश कमविले आहे.
ट्विन कंपनीने १९८३ साली ‘प्रोडिजी इन क्लासिकल म्युझिक’  ही त्यांची पहिली ध्वनिफीत प्रकाशित केली व त्यानंतर त्यांचे ध्वनिमुद्रण विपुल प्रमाणावर प्रसिद्ध झाले आहे. श्रीनिवास खळे, वनराज भाटिया, अशोक पत्की, श्रीधर फडके, आनंद मोडक अशा अनेक संगीतकारांच्या ध्वनिफिती व चित्रपटांसाठी त्यांनी मराठी व हिंदी रचना गायल्या आहेत. ‘तेजोमय नादब्रह्म’, ‘रागरंग’, ‘भक्तिरंग’, अशा अनेक ध्वनिपटांत त्यांनी गायलेली ‘मी राधिका’सारखी गीते गाजली आहेत. कविता महाजन यांच्या ‘कुहू’ या बहुमाध्यम कादंबरी (मल्टिमीडिया बुक) साठी त्यांनी चैतन्य कुंटे यांच्यासह संगीतकार म्हणून रचनाही केल्या.
त्यांना केंद्र सरकारची शिष्यवृत्ती (१९७५ ते १९८०) तसेच केसरबाई केरकर पाठ्यवृत्ती (१९८० ते १९८२) मिळाली होती. आकाशवाणीच्या संगीत स्पर्धांमध्ये त्यांना ख्याल, ठुमरी व गझल या गायनासाठी १९८३ व १९८४ साली सर्वोत्तम प्रस्तुतीबद्दल पारितोषिक मिळाले होते.
‘महापौर’ पुरस्कार (२००१), मध्य प्रदेश सरकारचा ‘कुमार गंधर्व’ पुरस्कार (२००६) इ. अनेक पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना लाभले आहेत. ‘सरदारी बेगम’ (१९९६) या हिंदी व ‘अंतर्नाद’ (२००६) या कोकणी चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचे राष्ट्रीय पारितोषिकही मिळाले. त्यांना २००८ साली ‘दे धक्का’ या मराठी चित्रपटातील लावणीसाठी महाराष्ट्र सरकारचे पारितोषिक, ‘म.टा. सन्मान’, तसेच ‘व्ही. शांताराम’ पुरस्कारही देण्यात आले.२०१३ साली ‘संहिता’ चित्रपटातील गीतासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

एक लोकप्रिय कलाकार असल्याने त्यांनी भारतातील सर्वच महत्त्वाच्या रंगमंचांवरून, संगीत महोत्सवांतून, तसेच आकाशवाणी, दूरदर्शनसारख्या माध्यमांतून त्यांनी गायन केले आहे. शिवाय अन्य देशांतही त्यांचा मोठा रसिकवर्ग असल्याने त्यांनी सातत्याने मैफलींसाठी विदेश दौरेही केले आहेत.
पुण्यातील प्रसिद्ध असा ‘सवाई गंधर्व-भीमसेन संगीत महोत्सव’, दिल्ली येथील ‘मल्हार उत्सव’ , ग्वाल्हेर येथील ‘तानसेन महोत्सव’ अशा प्रसिद्ध संगीत महोत्सवात आरती अंकलीकर यांनी आपली कला सादर केली आहे.

शुभदा कुलकर्णी / आर्या जोशी

 

अंकलीकर-टिकेकर, आरती उदय