आठवले, पांडुरंगशास्त्री वैजनाथशास्त्री
योगेश्वर कृषी, वृक्षमंदिर, मत्स्यगंधा, घरमंदिर अशा एकापेक्षा एक विलक्षण सामाजिक उपक्रमांचे यशस्वी शिल्पकार, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, तत्त्वज्ञान विद्यापीठाचे संस्थापक, थोर विचारवंत, तत्त्वचिंतक पांडुरंगशास्त्री वैजनाथशास्त्री आठवले यांचा जन्म कोकणातील रायगड जिल्ह्यातील ‘रोहा’ येथे वेदशास्त्रसंपन्न घराण्यात झाला. त्यांचे वडिल रोहे येथे सरस्वती संस्कृत पाठशाळा चालवीत होते. या पाठशाळेत पांडुरंगशास्त्री यांचे वडिलांपाशीच प्रारंभिक शिक्षण झाले. दादांच्या आईचे नाव पार्वता होते. आजी सरस्वतीबाईंचा छोट्या पांडुरंगवर विशेष जीव होता. आजीचे निधन झाल्यानंतर वैजनाथशास्त्री रोह्याहून मुंबईस स्थलांतरित झाले. त्यांनी मुंबईच्या गिरगाव भागात माधवबाग येथे पाठशाळा सुरू केली आणि याच पाठशाळेत दादांचा भारतीय दर्शनशास्त्रे, वेदान्तासह भारतीय व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास झाला.
दादा एकपाठी होते. वाचनाची, अभ्यासाची उपजत आवड यामुळे अल्पकाळातच त्यांचा विद्याव्यासंग इतका दांडगा झाला, की अनेक थोर अभ्यासक थक्क होऊन जात. मराठी, संस्कृत, गुजराती, इंग्रजी, हिंदी अशा अनेक भाषांवर त्यांनी प्रभुत्व संपादन केले होते. वयाच्या केवळ बाविसाव्या वर्षी, १९४२ मध्ये त्यांनी वडिलांच्या आज्ञेने भगवद्गीतेवर पहिले प्रवचन दिले आणि त्यांच्या वाग्यज्ञाचा श्रीगणेशा झाला. त्यांनी एका नव्या दृष्टिकोनातून, नव्या समाजाला सहज पटेल, आवडेल अशा शब्दांत आपले विचार मांडले. भक्तीला सामाजिक शक्तीचे रूप दिले.
दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता, सलोख्याच्या हेतूने १९५४ साली जपान येथे झालेल्या जागतिक तत्त्वचिंतक परिषदेसाठी पांडुरंगशास्त्री यांना विशेष निमंत्रित केले गेले. तेथे त्यांनी ‘कृष्णम् वंदे जगद्गुरु’ या विषयाद्वारे भारतीय अवतार कल्पनेवर आपले उदात्त, व्यापक विचार मांडून सर्वांना प्रभावित केले. त्यांची विद्वत्ता, मानव कल्याणाची उदात्त, व्यापक भूमिका आणि नवा दृष्टिकोन अमेरिकन तत्त्वचिंतकांना इतका भावला, की त्यांनी अमेरिकन नागरिकत्वाचा प्रस्ताव दादांपुढे ठेवला; पण दादांनी भारतभूमीत राहूनच कार्य करण्याचा आपला मनोदय ठामपणे व्यक्त केला.
१९५५ साली दादांनी ‘स्वाध्याय परिवार’ या कल्पनेला मूर्त रूप देण्याच्या दृष्टीने एकोणीस स्वाध्यायींना सौराष्ट्रात पाठविले आणि कार्यारंभ केला. ‘भक्तिफेरी’ असे या अभियानास नाव दिले गेले. आता या स्वाध्यायींची संख्या कित्येक लाख झालेली आहे. ‘‘‘स्व’ला ओळखा, दुसऱ्यांच्या ‘स्व’चा आदर करा, तेजाची पूजा करा, प्रेमभाव जपा, स्वत:ला दुर्बल, शूद्र समजू नका, आपल्या हृदयस्थ देवत्वाला ओळखून आत्मगौरव संपादन करा,’’ असे सांगत स्वाध्याय परिवाराचे हे कार्य दादांनी मराठी एवढेच गुजराती बांधवांमध्ये, तेही आदिवासी, कोळी या समाजामध्ये मोठ्या आत्मीयतेने रुजविले. त्यांनी महिन्यातील एक दिवस देवासाठी, समाजासाठी समर्पित भावाने कार्य करण्यास स्वाध्यायींना शिकविले व भक्तीला पूजापाठापलीकडे नेऊन सामाजिक कार्याचा आशय प्राप्त करून दिला. यातून ‘योगेश्वर कृषी’, ‘मत्स्यगंधा’ अशा उपक्रमांचा प्रारंभ झाला व ते अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाले. स्वाध्याय परिवाराचे कार्य पाहून खुद्द विनोबा भावे यांच्यासारखे भूदान चळवळीचे प्रणेतेही चकित झाले व त्यांनी स्वत:हून पांडुरंगशास्त्रींची भेट घेऊन स्वाध्याय परिवाराच्या कार्याचे सूत्र समजून घेतले. ‘‘ ‘स्व’चा आत्मगौरव करीत परस्पर भेद, द्वेष विसरून प्रेमाने माणूस माणसाजवळ आणण्याचा स्वाध्याय हा एक बुद्धिगम्य मार्ग आहे,’’ असे दादांनी त्यांना सांगितले. या दरम्यान पांडुरंगशास्त्र्यांनी ठाणे येथे तत्त्वज्ञान विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठाचे वेगळेपण लक्षात घेऊन भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी ठाण्याला भेट देऊन तत्त्वज्ञान विद्यापीठाची पाहणी केली व दादांचे विशेष कौतुक केले. दादांनी या विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या विदेशांतही शाखा उघडल्या. हिंदू धर्मासह ख्रिश्चन, इस्लाम, हिब्रू अशा विविध धर्मांचा निकोप दृष्टीने अभ्यास करून मग तुलनात्मकदृष्ट्या हिंदुधर्म विचार किती श्रेष्ठ, उदात्त, व्यापक आहे हे विदेशांतील विद्यार्थ्यांना स्वत:च्याच अभ्यासाद्वारे त्यांनी जाणवून दिले.
गुजरात, राजस्थानच्या सतत अवर्षणग्रस्त भागांत स्वाध्यायींनी तेथील गावकऱ्यांना बरोबर घेऊन श्रमदानाने ३०० तळी खोदली व पाण्याचा बिकट प्रश्न सोडविण्यात आपले कृतिशील योगदान दिले, तसेच माधववृंद आदी उपक्रमांद्वारे दरवर्षी लाखो झाडे लावून ती चांगली जगविण्याची दक्षताही घेतली.
१९८६ साली दादांनी उत्तर प्रदेशातील गंगा-यमुनेच्या संगमस्थळी, प्रयाग येथे ‘तीर्थ मिलन’ महामेळावा घेतला. या मेळाव्यास तीन लाख स्वाध्यायी सहभागी झाले होते. या मेळाव्याच्या सर्व व्यवस्था स्वाध्यायींनी स्वत: श्रमदानाने निर्माण केल्या होत्या, तर २००१ साली दादांच्या सहस्रचंद्रदर्शनाच्या निमित्ताने गुजरातमध्ये पंधरा लाख स्वाध्यायींचा महामेळावा झाला होता.
दादांची ग्रंथसंपदाही भारतीय विचारांचे, चिंतनाचे उदात्त दर्शन आहे. ‘संस्कृती पूजन’, ‘दशावतार’, ‘वाल्मिकी रामायण’, ‘श्रीकृष्ण जीवनदर्शन’, ‘श्राद्ध’ (भाग १-२), ‘ऋषिस्मरण’ इत्यादी अनेक विचारगर्भ पुस्तके लिहून दादांनी भारतीय ऋषिचिंतनाचे तेज व ओज दाखवून दिलेले आहे. दादांची वाङ्मयसंपदा हे मराठीचे अक्षरवैभव आहे.
दादांनी भारत सोडून अन्यत्र अमेरिका, इंग्लंड या देशांत जाऊन स्थायिक होण्याचे नाकारले, यात त्यांची राष्ट्रनिष्ठा दिसते. तरीपण, त्यांनी अनेक देशांमध्ये स्वाध्याय परिवाराचे कार्य DAy-‘डे’ (Divine Association of Yogeshwar) अशी संस्था स्थापन करून विस्तारलेले आहे. अनेक देशांत त्यांच्या ‘भक्तिफेरी’ने चांगलीच जागृती केलेली आहे. दादांचे कार्य पुरस्कारासाठी नाही, तरी त्यांच्या कार्याचा विविध संस्था, संघटनांनी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. ‘महात्मा गांधी सेवा’ पुरस्कार, ‘लोकमान्य टिळक’ राष्ट्रीय पुरस्कार यांबरोबरच त्यांना ‘रेमन मॅगसेसे’ पुरस्कारही मिळालेला आहे. ‘मनुष्य ही ईश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे, तिचा गौरव करा’ या दादांच्या बोधामुळेच त्यांचा जन्मदिवस ‘मनुष्य गौरव दिन’ म्हणून स्वाध्यायी देशभर, विदेशांत साजरा करतात. २००३ मध्ये दिवाळीच्या प्रकाशोत्सवात लक्ष्मीपूजनाच्या दिनी दादांनी आपली इहलोकीची यात्रा संपविली. त्यांच्या कन्या सुश्री धनश्री तळवलकर या दादांचा वसा व वारसा पुढे चालवीत आहेत. स्वाध्याय परिवाराचे कार्य वर्धिष्णू होत आहे.