Skip to main content
x

बाब्रेकर, प्रभाकर गजानन

            प्रभाकर गजानन बाब्रेकर यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यामधील देऊळगाव राजा येथे झाला. घरची परिस्थिती हलाखीची होती; पण शिक्षणाची आवड असल्याने नागपूर येथे मामांच्या घरी राहून सर्व शिक्षण पूर्ण केले. त्यांनी १९५५मध्ये नागपूर येथील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी संपादन केली व १९६२मध्ये कृषि-रसायनशास्त्र या विषयामध्ये प्रथम श्रेणीत एम.एस्सी. पदवी संपादन केली. तसेच भा.कृ.अ.सं., नवी दिल्ली येथून १९८०मध्ये पीएच.डी. प्राप्त केली. नोकरीचा पूर्ण सेवाकाळ त्यांनी विद्यादान व संशोधनात्मक कार्य यामध्ये व्यतीत केला. त्यांनी एकूण सेवाकाळापैकी १२ वर्षे फक्त एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. बाब्रेकर यांनी मातीची सुपीकता व पिकांच्या पोषणामधील तिचे महत्त्वाचे योगदान यावर मौलिक संशोधन केले. तसेच ज्या जमिनीमधून वर्षभरामध्ये सलग ३ पिके घेतली जातात अशा जमिनींचा सखोल व विश्‍लेषणपूर्ण अभ्यास करून त्याबाबतच्या नोंदी परिपूर्ण केल्या. सेंद्रिय खते व स्फुरदयुक्त खते यांच्या योग्य मिश्रणामुळे जमिनीची सजीवता कशा प्रकारे टिकून राहते याबाबत त्यांनी महत्त्वाचे निष्कर्ष काढले. बायोगॅस निर्मिती करताना शेतीमधील ज्वारीची धसकटे, पराट्या, तुराट्या व गाजरगवत यांवर विशिष्ट प्रक्रिया केल्यास उपयुक्तता वाढीस लागते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. डॉ. बाब्रेकर यांनी महाराष्ट्राची मृदा संचयिका व भूमी उपयोगाचे नियोजन या प्रकाशनांचे मराठीत भाषांतर केले. त्यांची ‘महाराष्ट्रातील जमिनी’ व ‘महाराष्ट्रातील भूमीची झीज’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

- मिलिंद कृष्णाजी देवल

बाब्रेकर, प्रभाकर गजानन