Skip to main content
x

बाळ, दत्तात्रेय वामन

    डॉ.दत्तात्रेय वामन बाळ यांचा जन्म आणि शालेय शिक्षण मुंबईत झाले. त्यांनी १९३० साली बी.एस्सी. आणि १९३३ साली एम.एस्सी. (प्राणिशास्त्र) मुंबई विद्यापीठातून प्राप्त केली. १९३८ साली सर मंगळदास नथुभाई तांत्रिक शिष्यवृत्ती घेऊन ते इंग्लंडला गेले आणि १९४० मध्ये लिव्हरपूल विद्यापीठाची मत्स्योद्योग विज्ञानातील पीएच.डी. संपादन केली. १९४४ साली डॉ. बाळ भारतात परतले आणि ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबई येथे प्राध्यापक म्हण्ाून रूजू झाले. १९४७ सालापर्यंत तिथे काम केल्यावर १९४७ ते १९५१ या कालावधीत ते भारत सरकारच्या अन्न आणि कृषी मंत्रालयात मत्स्य आणि मत्स्योद्योग सर्वेक्षण अधिकारी होते. १९५१ साली परत ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख म्हण्ाून नियुक्त झाले. १९५६ सालापर्यंत विभागप्रमुख म्हण्ाून काम केल्यानंतर त्यांना त्याच संस्थेचे संचालक म्हण्ाून बढती मिळाली. संचालक म्हणून त्यांनी १९६४ सालापर्यंत काम केले. याचवेळी १९६१-१९६२ साली ते भारत सरकारच्या अन्न आणि कृषी मंत्रालयाच्या मध्यवर्ती मत्स्योद्योग शिक्षण संस्थेचे (मुंबई) संचालक होते.

     निवृत्तीनंतर १९६५ ते १९६८ या काळात ते भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान परिभाषेच्या जीवशास्त्र समितीचे सदस्य होते. १९६८ सालापासून १९७३ सालापर्यंत त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या योजनेखाली विज्ञान संशोधन केले. तर १९७४ ते १९७७ सालापर्यंत ते औरंगाबाद येथील विज्ञान संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी होते.

     आपल्या संशोधनामुळे त्यांनी देशात परदेशांत अनेक महत्त्वाची पदे भूषविली. युनेस्कोच्या सागरी विज्ञान विषयक आंतरराष्ट्रीय समितीचे सल्लागार, लोकसेवा आयोगाचे सल्लागार, मुंबई विद्यापीठाच्या विद्वतसभेचे सदस्य, राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्था समितीवर परीक्षक व सल्लागार, १९८६ साली जैतापूर, जि. रत्नागिरी येथील एकविसाव्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाचे अध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असताना त्यांनी आपला ठसा उमटविला. सागर संपत्तीचा अभ्यास करताना त्यांनी भारताच्या किनारपट्टीचा सखोल अभ्यास केला. भारताला तिन्ही बाजूंनी समुद्रकिनारा लाभला आहे, शिवाय पश्चिम किनार्‍याला भूखंडाचा सागरात विस्तारीत जाणारा जो भाग (कॉन्टीनेन्टल शेल्फ) हे सर्व अभ्यासून भारतात सागरी मत्स्यसंपत्तीच्या विकासाला मोठा वाव आहे, हे त्यांनी दाखवून दिले. विस्तृत सागरी किनारा लाभलेल्या आपल्या देशातील लोकांच्या आहारात मासे असणारच. त्याचे प्रमाण वाढवून ते इतर धान्योत्पादनास पूरक बनवणे, मत्स्योत्पादन वाढविणे, माशाला अपायकारक ठरणारे आणि समुद्रास येऊन मिळणारे सांडपाणी, कारखान्याचे दूषित पाणी, भूगर्भातील तेल, नैसर्गिक वायू, समुद्रातील अनेक जिवाण्ाूंचा, खार्‍या पाण्याचा, लाकडावर होणारा परिणाम इत्यादी अनेक विषयावर डॉ.बाळ यांनी संशोधन केले. भारताच्या पूर्व -पश्चिम किनार्‍यांचे वेगळेपण, तिथले मत्स्योत्पादन, त्यामधील पश्चिम किनार्‍याचा मोठा वाटा, त्याची कारणे, माश्यांच्या विविध जाती, निर्यातक्षम कोलंबी, अशा विषयांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता.

     मत्स्यसंशोधन त्यांच्या रोमातच भिनले होते. वरील सर्व व्याप सांभाळत असतानाच त्यांनी मासे, मत्स्योद्योग आणि सागरी जीवशास्त्र यावर संशोधन करून शंभराहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले. एम.एस्सी. आणि पीएच.डी.साठी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

     मत्स्योद्योगाशी संबंधीत कोळी समाजाचाही त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यात कोळ्यांची लोकसंख्या एक टक्का असून सर्व जाती धर्म, पंथाचे लोक हा व्यवसाय करतात; त्यांचा शैक्षणिक, आर्थिक दर्जा अत्यंत कमी असून त्यांच्याजवळ अत्याधुनिक साधने नाहीत; फक्त लहान बोटी, ट्रॉलर्स यांच्या सहाय्याने १५ लाख टनांचे मत्स्योत्पादन ते करतात. त्यांना सुविधा पुरवल्या. त्यांची स्थिती सुधारली, तर मत्स्योद्योगाचा विकास होऊन परकीय चलनही मिळेल, हे त्यांनी सुचवले. कोळी स्त्रिया किनार्‍यावर आणलेल्या माशांची विक्री आणि देखभाल करतात. त्यांच्या ठायी शिक्षणाचा अभाव दिसून येतो. म्हण्ाूनच त्या दलालांच्या सापळ्यात सापडतात. कोळ्यांची घरेही अत्यंत लहान जागेत दाटीवाटीने असतात. हे विदारक सत्य त्यांनी मांडले.

     हरितक्रांती, धवलक्रांती यांकडे सरकारने जसे लक्ष घातले तसेच लक्ष घालून मत्स्योद्योगक्रांती घडून यावी, अशी त्यांची फार इच्छा होती आणि म्हण्ाूनच त्यांनी आपले सर्व आयुष्य या विषयाशी बांधून ठेवले. वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी त्यांनी ‘महाराष्ट्रातील मत्स्योद्योग’ हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळासाठी मराठीतून पुस्तक लिहिले. त्यांनी श्री. के.व्ही. राव यांच्याबरोबर ‘मरीन फिशरीज’ हा संदर्भ ग्रंथ इंग्रजीत लिहिला. तो टाटा-मॅकग्रॅ हिल, नवी दिल्ली या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध  केला.

     भारताची लोकसंख्यावाढ आणि सागरी संपत्तीची निर्मिती यांचे प्रमाण व्यस्त असल्याने अधिकाधिक सागरी संपत्ती भारताने मिळविली पाहिजे असे, त्यांचे मत होते. मत्स्यसंपत्ती ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी असून त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून निकृष्ट अपुर्‍या अन्नाऐवजी प्रथिनयुक्त मत्स्य व कोलंबी यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न भारताने करावा, असे त्यांचे प्रतिपादन होते.

मृणालिनी साठे

- दिलीप हेर्लेकर

बाळ, दत्तात्रेय वामन