Skip to main content
x

बालापोरिया, जाल कैखुश्रू

हाराष्ट्रात प्रचलित असलेल्या पलुसकर पठडीतील गायकीपेक्षा आगळ्या-वेगळ्या ढंगाची, निसार हुसेन खाँसाहेबांपासून शंकर पंडितांपर्यंत आलेली, ग्वाल्हेरी पारंपरिक ग्वाल्हेर घराण्याची गायकी जपणारे गायक जाल कैखुश्रू बालापोरिया यांचा जन्म सूरत येथे झाला. बाळापूरचे म्हणून ते बालापोरिया. वडील कैखुश्रू सोलापूरमध्ये रेल्वे गार्ड होते. त्यांच्या आईचे नाव हिराबाई कोहिना. वडील निवृत्त झाल्यावर बलसाड जवळील बिलिमोरा या गावात ते स्थायिक झाले. वडिलांना गाण्याची आवड होती व ते चांगले गात.

वयाच्या सहाव्या वर्षीच कैखुश्रूंनी जालजींना रागावर आधारित गाणी शिकवायला सुरुवात केली. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचेे शिक्षण बिलिमोराला झाले. त्यानंतर सूरतमधूनच त्यांनी विद्युत अभियांत्रिकेत पदविका अभ्यासक्रम केला. ते १९४८ च्या सुमारास मुंबईला आले. त्यांनी काही वर्षे इंडियन ऑक्सिजन या कंपनीत काम केले. नंतर ३० वर्षे एअर इंडिया वर्कशॉपमधील इलेक्ट्रॉनिक पार्ट्स यातील देखभाल विभागात नोकरी केली. जाल १९६० मध्ये विवाहबद्ध झाले.

वयाच्या चौदाव्या वर्षी, शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांचे रागदारी गायनाचे शिक्षण एकनाथ पंडितांचे सुपुत्र सीताराम पंडितांकडे सुरू झाले. एकनाथ पंडित हे कृष्णराव शंकर पंडितांचे चुलते होत. सीताराम पंडित हे बिलिमोरात संगीताचे वर्ग चालवीत. त्यानंतर सूरतमध्ये पंडित कृष्णराव मुळे यांचे शिष्य हरेन्द्र घाणेकर यांच्याकडे ते शिकले. त्यानंतर मुंबईला आल्यावर त्यांनी एकनाथ पंडितांचे शिष्य डॉ. हरिहर गंगाधर मोघे यांच्याकडे शिकण्यास सुरुवात केली. डॉ. मोघे हे दातांचे डॉक्टर होते. त्यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्यातील इतर गायकांपासून आलेल्या बंदिशींचाही मोठा साठा होता. कृष्णराव मुळ्यांचे शिष्य विनायक जोगळेकर यांचेही मार्गदर्शन जाल यांना लाभले. विनायक जोगळेकरांकडून त्यांना सांगीतिक  सौंदर्यदृष्टी, तालाविषयीची वैचारिक दृष्टी लाभली.

जाल यांनी आपल्या गायन शिक्षणात ग्वाल्हेर घराण्याची कास सोडली नाही. श्रोता म्हणून त्यांनी आपली दृष्टी खुली ठेवली होती, तरी आपली अष्टांगप्रधान असलेली ग्वाल्हेरी गायकी मात्र कुठलीही भेसळ न करता शुद्ध राखली.

जाल यांच्या संग्रहात विविध रागांतील ख्याल, ख्यालनुमा, टप्पा, तराना, होरी, चतुरंग, अष्टपदी, त्रिवट असे बहुविध संगीत प्रकार असून तिलवाडा, झपताल, आडाचौताल, सवारी, पश्तो अशा विविध तालांतील रचना होत्या. पारंपरिक बंदिशींचा फार मोठा खजिनाच त्यांच्याकडे होता. याशिवाय मुलतानी, जुनी पंजाबी, मराठी, संस्कृत, हिंदी, जौनपुरी, फारसी अशा विविध भाषांतील रचना असून त्यांचे सादरीकरणही जाल नेमकेपणाने करत. बंदिशीच्या अंगाने रागविस्तार, बंदिशीतील शब्द, स्वर, ठेका यांतून विस्तार, गाण्यात नेमकेपणा व आटोपशीरपणा, अर्थपूर्ण शब्दोच्चारांवर भर, लहान लहान स्वर-वाक्यांनी, नियंत्रित अलंकरणाने व संयमित भाव ठेवून केलेले त्यांचे सादरीकरण असे.

मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात ते जवळजवळ २५ वर्षे शिकवत होते. ते २००० साली निवृत्त झाले. १९९७ साली त्यांना सूरसिंगार समितीचा ‘सूरमणी’ हा किताब मिळाला, तर संगीत रिसर्च अकादमी आणि म्युझिक फोरम यांच्यातर्फे १९९७ साली त्यांना पुरस्कार देण्यात आला. त्यांना १९९८ साली महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कारही लाभला.

जाल बालापोरियांकडे शांता गोखले, रोशन शहानी, नीला भागवत, अनिल दिघे, रमेश पांचाळ, शर्मिला शहा इत्यादींनी संगीत शिक्षण घेतले आहे. मुंबई विद्यापीठातून शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ झाला आहे. त्यांचे मुंबई येथे निधन झाले.

माधव इमारते

बालापोरिया, जाल कैखुश्रू