बारवाले, बद्रिनारायण रामूलाल
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशामध्ये ज्यांनी हरितक्रांतीचा पुरस्कार करून भारतीय शेतीचा चेहरामोहरा बदलवून टाकला, अशा धडाडीच्या तरुणांमधील एक प्रमुख नाव म्हणजे बद्रिनारायण रामूलाल बारवाले हे होय. भारतीय हरितक्रांतीचे जनक डॉ.एम.एस.स्वामिनाथन यांनी ‘ग्रामीण भागातील दुर्बल घटकाला बारवाले यांनी बियाणे क्षेत्रात कामे देऊन अधिक सक्षम बनवले’, या शब्दांत बारवाले यांचे कौतुक केले, तर कृषितज्ज्ञ डॉ.नॉरमन ई. बोरलॉग यांनी ‘बियाणांचे जेनेटिक्स शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय डॉ.बारवाले यांना जाते’, असे म्हणून बारवाले यांच्या कार्याचा उचित गौरव केला आहे.
ब्रद्रिनारायण रामूलाल बारवाले यांचा जन्म विदर्भ-मराठवाडा सीमेवरील तत्कालीन निजाम अमलाखालील हिंगोली गावात एका गरीब कुटुंबात गणेशचतुर्थीला झाला. त्यांच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे साऱ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या आईवर येऊन पडली. तिनेच कुटुंबाचा सांभाळ केला. परंतु पुढे बद्रिनारायण जालना येथील बारवाले नामक एका नातेवाईकांकडे दत्तक गेलेे. त्यामुळे कागलीवाल घराण्यातील बद्रिनारायण पुढे बारवाले या आडनावाने प्रसिद्ध झाले. हे नाव त्यांच्या दत्तक वडिलांच्या राजस्थानातील ‘बार’ या मूळ गावावरून पडले आहे.
बद्रिनारायण बारवाले यांनी १९४२मध्ये जालना येथील मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. पुढील वर्षी त्यांनी निजाम राजवटीतल्या मदारसे पोकनिया सरकार ए अली या सरकारी शाळेत आठवीच्या वर्गासाठी प्रवेश घेतला. त्या वेळी देशात स्वातंत्र्य चळवळ जोमाने सुरू होती. हैदराबाद मुक्तिसंग्राम व महात्मा गांधींचे ‘चले जाव’ आंदोलन तरुणांना प्रेरित करत होते. बारवालेही स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले व विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कार्याला सुरुवात केली. विद्यार्थ्यांना अन्यायाविरोधात प्रतिकार करण्यासाठी प्रवृत्त केले. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्माण करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न केले. शालेय जीवनात केलेल्या स्वातंत्र्य चळवळींमुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. ते १९४६ला शालेय शिक्षण पूर्ण करून हैदराबादच्या निजामी महाविद्यालयात दाखल झाले. परंतु त्यांचा तो प्रवेश कागदोपत्रीच राहिला. स्वातंत्र्यलढ्यात कार्यरत राहण्यासाठी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाला रामराम ठोकला. भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला तरी मराठवाडा भारतात विलीन व्हायला १७ नोव्हेंबर १९४८ हा दिवस उजाडावा लागला. मराठवाडा संपूर्ण स्वतंत्र होईपर्यंत बारवाले या लढ्यात कार्यरत होते. त्या काळातील धकाधकीच्या वातावरणामुळे बारवाले यांना आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता आले नाही. उच्च शिक्षण नसल्यामुळे बारवाले यांनी घरचा शेती व्यवसाय करण्याचे निश्चित केले. तेव्हा त्यांनी जालन्यापासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या घाणेवाडी या जलाशयाच्या काठावरच्या मांडवा या गावात शेती करण्यास प्रारंभ केला. भारत कृषक समाजाने १९५१मध्ये दिल्ली येथे आयोजित केलेल्या जागतिक कृषी प्रदर्शनाला, तसेच भा.कृ.सं.सं.लाही बारवाले यांनी भेट दिली व त्यातून त्यांना कृषी क्षेत्राबद्दलचा नवा दृष्टिकोन लाभला. त्यांनी १९६०च्या दशकात मांडवा येथील पुसा सावनी या भेंडीच्या जातीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली व त्याची विक्रीही केली. पीक चांगले येऊनही अपेक्षित भाव न मिळाल्याने त्यांनी त्याबद्दलचा अभ्यास केला. आपण चुकीच्या वेळेस भेंडीचे पीक घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. बाजारातील मालाची आवक कमी झाली की आपला माल बाजारात आला पाहिजे तरच आपल्या मालाला योग्य तो भाव मिळेल, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्यांनी पीक उत्पादनाचे नियोजन केले. पीक नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते, हे त्यांच्या लक्षात आले. पीक नियोजनात आलेल्या यशामुळे त्यांनी बियाणे उत्पादनावर आपले लक्ष केंद्रित केले. त्या काळात भेंडीचा उपयोग तिच्यातील चिकट पदार्थामुळे गुऱ्हाळात रसातील अनावश्यक घटकांना साफ करण्यासाठी करत. त्यामुळे, पुणे, सातारा, कोल्हापुरातील वृत्तपत्रांतून जाहिरात दिल्यानंतर त्यांच्या बियाणाला महाराष्ट्रभरातून मागणी होऊ लागली. याच काळात नवी दिल्लीत भा.कृ.सं.वि.त मेक्सिकोहून आणलेल्या संकरित मूग आणि गहू यांच्या जातीवर प्रयोग सुरू झाले. या उपक्रमात देशातील तरुण शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचा त्यांचा मानस होता. त्या दृष्टीने त्यांनी बारवाले यांच्याशी संपर्क साधला व नावीन्याची आस असलेल्या या तीस वर्षीय तरुणाने हा नवा प्रयोग आपल्या शेतात करण्याचे निश्चित केले.
आयसीएआर आणि रॉकफेलर फाऊंडेशन यांच्या सहकार्याने १९६२ साली त्यांनी संकरित मका व १९६३ साली संकरित ज्वारीचे पीक आपल्या शेतात यशस्वीपणे घेतले. या प्रयोगात यशस्वी झालेल्या बारवाले यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रगत शेतीचे ज्ञान देण्यास सुरुवात केली. चीनने १९६२मध्ये भारतावर आक्रमण केले, त्या वेळेस देशभक्तीच्या भावनेतून बारवाले यांनी शेती व्यवसायातून मदत करण्याचे ठरवले. अडीअडचणींच्या काळात धान्याची कमतरता पडू नये म्हणून त्यांनी अधिक उत्पादन घेण्यास सुरुवात केली. तसेच आजूबाजूच्या गावांमधील शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेण्यास प्रोत्साहित केले. एका स्वयंसेवी संस्थेच्या साहाय्याने गावात तीस विहिरी खोदल्या, तसेच भूविकास बँकेकडून कमी व्याजदरात शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी गावातील जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणली. तसेच त्यांनी दाहोदहून संकरित मक्याचे बियाणे मागवले व ते शेतकऱ्यांमध्ये वितरित केले. बारवाले यांच्या या प्रयत्नांमुळे युद्धकाळात सदर परिसरात अन्नधान्याचा तुटवडा पडला नाही, तसेच शेतकऱ्यांचा आर्थिक विकासही साधला गेला व शेतकर्यांचा शेती करण्यातला उत्साह वाढीला लागला. शेती क्षेत्रामध्ये आपण भरीव योगदान दिले पाहिजे व आपल्या कार्याला ठोस रूप प्राप्त झाले पाहिजे या उद्देशाने बारवाले यांनी ११ नोव्हेंबर १९६४ रोजी ‘महाराष्ट्र हायब्रीड सीड्स कंपनी’ अर्थात महिको या कंपनीची स्थापना केली. ज्या काळात संकरित बियाणांचा वापर करणे ही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण गोष्ट होती. त्या काळात बारवाले यांनी संकरित शेतीचा प्रयोग केला. परिणामी त्यांच्या शेतीचे अवलोकन केलेल्या शेतकऱ्यांनीही संकरित वाणाचा वापर केला. त्यामुळे मिळालेले भरघोस उत्पादन आणि उत्तम बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला. त्यानंतर महिको कंपनीत नवनवीन वाणांवर प्रयोग झाले. प्रत्यक्ष शेतावर प्रात्यक्षिके देण्याचे काम केले. याच काळात ज्वारीचे पहिले संकरित बियाणे तयार करण्याची संधी डॉ. फ्रिमन यांच्यामुळे महिको कंपनीला मिळाली. त्या वेळेस ज्वारीच्या आणि बाजरीच्या अधिक कसदार पिकाच्या संशोधनावर चर्चा झाली. या संशोधनात बऱ्याच समस्या होत्या. एक तर उत्पादन तातडीने घ्यायचे ठरले होते. ज्वारीचे हे पीक नियमित हंगामात घ्यायचे नसून प्रतिकूल हंगामात घ्यायचे होते. तसेच या बियाणांमध्ये नर-मादी म्हणजे स्त्रीकेसर व पुंकेसर यांचे प्रमाण कमीजास्त होते. त्यांचा समतोल साधून अपेक्षित असणाऱ्या संकरित बियाणांमधून तयार होणाऱ्या कणसाला उपचार द्यावे लागणार होते. तसेच सावधगिरीचा उपाय म्हणून पुंकेसर योग्य काळाच्या आधी सोडावे लागणार होते. या साऱ्या आव्हानांचा मुकाबला करून संकरित ज्वारीचा हा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला. प्रयोग करून उत्पादनाला सिद्ध झालेले सर्व बियाणे त्यांनी विकत घेतले व एकरी साडेआठ क्विंटल ज्वारी उत्पादित करून दाखवली. ज्वारीचे हे भारतातील पहिले संकरित बियाणे ठरले. महाराष्ट्र व आजूबाजूच्या राज्यांमध्ये १९६५-६६मध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या बियाणांची लागवड केली जावी, असे धोरण शासनाने स्वीकारले होते. त्या वेळीही महिकोने गहू, तांदूळ, ज्वारी, मका अशा पिकांच्या संकरित वाणांची निर्मिती केली व शेतकर्यांनी अधिक उत्पन्न घेतले. महिकोच्या या वाणांना महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, हरयाणा, बिहार अशा राज्यांमध्येही मागणी येऊ लागली व महिकोचे नाव सर्वदूर पसरले. ऑक्टोबर १९८६मध्ये त्यांना संकरित तांदळाच्या पहिल्या जागतिक परिषदेसाठी चीनला जाण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी तांदळाचे उत्पादन, प्रक्रिया उद्योग, प्रयोगशाळा वितरण व्यवस्था या सर्व बाबींची बारकाईने माहिती घेतली. भारतात परत आल्यावर त्यांनी संकरित गहू व तांदूळ यांच्यावर आपले लक्ष केंद्रित केले.
बारवाले यांनी जैवतंत्रज्ञान क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. कपाशी पिकाच्या लागवडीसाठी पूर्वी तंतुयुक्त बियाणाचा वापर केला जात असे; परंतु महिकोमध्ये झालेल्या संशोधनानंतर त्यांनी शेतकऱ्यांना तंतुविरहित बियाणे उपलब्ध करून दिले. यामुळे बियाणांची उगवण क्षमता वाढली व प्रति एकर बियाणे वापराची मात्रा कमी झाली. त्यांचे ‘बीटी कॉटन’ या कापसाबाबत झालेले संशोधनही लक्षवेधी ठरले. ‘बीटी’ हे बॅक्टेरियावरून पडलेले नाव आहे. ‘बॅसीलस थुरीनजिएन्सीस’ या बीटी कॉटन जातीचे वैशिष्ट्य असे की, यातील ‘बीटी’ हे बॅक्टेरियाच कापसातील बोंडामध्ये असलेल्या अळीचा बीमोड करणारे कीटकनाशक तयार करते. या ‘बीटी’चे रोपण संशोधनाअंती कापसाच्या एका जातीवर केले. त्याला ‘जेनेटिक मॅन्युप्लिएशन’ म्हणतात. हे ‘बीटी कॉटन’ महाराष्ट्रात संकरित करण्याचे श्रेय महिकोलाच जाते. बीटी हे जैवतंत्रज्ञान प्रथम मोन्सँटो या कंपनीने विकसित केले होते. भारतात हे जैवतंत्रज्ञान विकसित आणि प्रसिद्ध करण्याचे काम मोन्सटोच्या सहकार्याने महिकोने केले. असेच संशोधन त्यांनी बाजरीवरही केले. पंजाबमधील बाजरीचे बियाणे भेसळयुक्त झाले होते. बाजरीच्या मादीतील स्त्रीकेसरात भेसळ झाली होती. म्हणून त्यातील पुंकेसर वेगळे करणे आवश्यक होते. प्रथम बियाण्यातील भेसळयुक्त पुंकेसर वेगळे काढून त्यावर संशोधन आणि प्रक्रिया केली व त्यातून शुद्ध संकरित बाजरीचे बियाणे तयार करण्याची किमया महिकोने केली.
महिको ही ९०० कोटींची उलाढाल करणारी भारतातील अग्रगण्य बीज उत्पादन संस्था ठरली आहे. जालना येथे वसलेले महिको रीसर्च अँड लाइफ सायन्स सेंटर, तसेच महिको सीड प्रोसेसिंग युनिट, जालना सीड प्रोसेसिंग अँड कोल्ड स्टोरेज असे विभाग महिकोच्या यशाची चिन्हे आहेत. बारवाले यांचे कार्य केवळ कृषीक्षेत्रापुरते मर्यादित नाही; तर सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि आरोग्य क्षेत्रांतही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. जालना संस्थेचे चिटणीस व जालना सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष ही पदे त्यांनी भूषवली. तसेच ते सिकॉम आणि सिडकोचे सदस्य होतेे. औरंगाबाद येथील सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि जालना शहरातील बद्रिनारायण बारवाले महाविद्यालय व गोल्डन ज्युबिली इंग्रजी माध्यमाची शाळा अशा अनेक संस्थांचे निर्माते असलेल्या बारवाले यांनी उभ्या केलेल्या जालना येथील ‘गणपती नेत्रालया’चा प्रकल्पही यशस्वी ठरला आहे. कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून उभे राहिलेले हे अत्याधुनिक नेत्र इस्पितळ आज साऱ्या भारताचे लक्ष वेधून घेत आहे. डॉ.बारवाले यांना १९६६मध्ये आयसीएआरचे सन्मानाचे आजीव सदस्यत्व मिळाले. त्यांना २००१मध्ये पद्मभूषण पुरस्कार राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते दिला. अमेरिकेतील जागतिक अन्न पुरस्कार प्रतिष्ठानतर्फे त्यांना द वर्ल्ड फूड प्राइझ हा कृषी क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला. त्यांना १९९२मध्ये ‘स्ट्रॅटेजी प्लॅनिंग कमिटीचा फेडरेशन इंटरनॅशनल ड्यू कॉज्ञर्स डेस सेमेन्सेस’ या संस्थेचा ‘फेडरेशन इंटरनॅशनल सीड्समन’ पुरस्कार मिळाला. याच वर्षी त्यांना हेग येथील भारत व नेदरलँडच्या संयुक्त व्यापार परिषदेत भाग घेण्यासाठी भारतातर्फे पाठवण्यात आले होते. मिनेसोटा येथील भारत-अमेरिका वाणिज्य परिषदेतही त्यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यांना १९९३मध्ये ‘जेन्ट्स इंटरनॅशनल अॅवॉर्ड’ने सन्मानित केले गेले. बारवाले यांना आंतरराष्ट्रीय सन्मानांबरोबरच तामिळनाडू कृषी विद्यापीठ, कोईमतूर यांनी ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या पदवीने सन्मानित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानेही त्यांना २०१० साली ‘डी. लिट’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. डॉ.स्वामिनाथन, डॉ.बोरलॉग, जॉन रॉन, डॉ.वेईन फ्रीमन, बिल गेट्स, डॉ. ब्रेंट झेर, डॉ.हरभजनसिंग या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्गजांशी बारवाले यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यांचे सुपुत्र राजेंद्र बारवाले यांच्यासह कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. डॉ.बारवाले ह्याचं २४ जुलै २०१७मध्ये मुंबई येथे निधन झालं.