Skip to main content
x

बेलसरे, केशव विष्णू

बेलसरे बाबा

     बाबा बेलसरे म्हणजेच केशव विष्णू बेलसरे हे ‘संतश्रेष्ठ श्री ब्रह्मचैतन्य महाराज’ यांच्या अंतरंगातील अत्यंत प्रिय शिष्य होते. त्यांचा जन्म सिकंदराबाद येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील न्यायाधीश होते. त्यांना एक भाऊ व पाच बहिणी होत्या. बाबांच्या घरातील वातावरण फार सनातनी होते. जीवनाची सर्व धार्मिक अंगे अति कडकपणे पाळली जात. त्यामुळे घरातील वातावरण कडक शिस्तीचे होते. घरातील पुस्तकांचे कपाट काव्य, निबंध, नाट्य व तत्त्वज्ञान यांवरील मराठी, हिंदी, संस्कृत व इंग्रजी पुस्तकांनी भरलेले होते. त्यामुळे लहानपणीच बाबांचे चतुरस्र वाचन झाले. अगदी लहानपणापासून त्यांना तीव्र स्मृतीचे वरदान होते. लहानपणीच त्यांनी एका आठवड्यात गीतेचे सातशे श्लोक पाठ केले होते. तसेच, शाळेत असतानाच एका मित्राकडून ज्ञानेश्वरी आणून त्यांनी ती वाचून काढली. बाबांचे शालेय शिक्षण हैद्राबाद येथे झाले. बाबांचा स्वभाव मूळचाच कल्पनाप्रधान होता. तारुण्यात पदार्पण केल्यावर त्यांच्या बुद्धीला एक नवे तेज चढले. धर्म, ईश्वर, वेदान्त, मृत्यू, जीवन यांच्याबद्दल अनेक शंका त्यांना भंडावून सोडायच्या. याच काळात चांगल्या मित्रांच्या संगतीने त्यांना काव्य, संगीत, विनोद व चित्रकला यांमध्ये अतीव गोडी निर्माण झाली. खरी रसिकता जागी होऊन तिच्या पायी संस्कृत व मराठी अभिजात काव्य आणि नाटके यांचा त्यांनी अगदी मनापासून अभ्यास केला. महाविद्यालयामध्ये असताना ते महाविद्यालयाच्या मागे असलेल्या डोंगरावर जाऊन एकटे नामस्मरण करीत तासन्तास बसून राहत. वडिलांच्या इच्छेप्रमाणे बाबांनी सायन्सला प्रवेश घेतला होता. परंतु, या विषयात त्यांना गोडी नव्हती. या विवंचनेत असताना एका शनिवारी बाबा मारुतिरायाच्या दर्शनास गेले व नामस्मरण करीत बसले. तेवढ्यात ‘तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा’ अशी मोठ्या जोराने आतून प्रेरणा झाली. तिचा प्रभाव इतका जबरदस्त व विलक्षण होता, की घरातील वडीलधार्‍या मंडळींचा विरोध न जुमानता ते स्वेच्छेने मुंबईस आले व एल्फिन्स्टन कॉलेजात महाविद्यालयात होऊन त्यांनी तत्त्वज्ञानाचा रीतसर अभ्यास सुरू केला. एम.ए. करण्यासाठी त्यांनी प्रबंध लिहिला. त्यामुळे संशोधन करण्यासाठी जी पद्धत (Research Method) आत्मसात करावी लागते, ती त्यांना उत्तम अवगत होती.

     आपल्या साधनेला व अभ्यासाला मोकळा वेळ मिळावा व उत्तम ग्रंथ हाताशी असावेत म्हणून त्यांनी अनुक्रमे शाळा व महाविद्यालयामध्ये नोकरी केली. आठ वर्षे मॅट्रिकच्या वर्गाला इंग्रजी शिकवल्याने त्यांचा पायाभूत इंग्लिशचा उत्तम अभ्यास झाला व सोपी इंग्रजी भाषा त्यांना बोलता येऊ लागली. ते प्रथम खालसा महाविद्यालयामध्ये शिकवीत व नंतर सदतिसाव्या वर्षी सिद्धार्थ महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून बाबांची नेमणूक झाली. त्यांनी आपल्या सेवेच्या काळात प्रामुख्याने तर्कशास्त्र (Logic), तत्त्वज्ञान (Philosophy),आणि मानसशास्त्र (Psychology), हे विषय शिकविले. ते एम.ए.च्या वर्गाला शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान व रामानुजांचे तत्त्वज्ञान शिकवीत असत. पूर्ण तयारी करून, अत्यंत मनापासून शिकवल्याने त्यांची व्याख्याने (lectures) फार परिणामकारक होत असत. विषय कितीही कठीण असला तरी तो वर्गातील सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्यापासून अगदी हुशार विद्यार्थ्यापर्यंत प्रत्येकाला समजला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळे त्यांचे वर्ग विद्यार्थ्यांनी ओसंडून वाहत असत. सन १९७३ साली बाबा महाविद्यालयामधून निवृत्त झाले. सनातन तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना भारतीय व युरोपियन तत्त्वज्ञान या दोन्हींचा त्यांनी प्रचंड अभ्यास केला होता. त्यांनी अभ्यासलेल्या अनेक पुस्तकांपैकी १) स्टेबिंगचे नवीन तर्कशास्त्र, २) रसेलचे ‘सायंटिफिक मेथड’ व ३) व्हाइटहेडचे ‘सायन्स अ‍ॅण्ड दि मॉडर्न वर्ल्ड’ हे तीन ग्रंथ त्यांच्या विशेष आवडीचे होते. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात थोर जर्मन तत्त्वचिंतक ‘लायबनिज’ यांच्या ग्रंथात ‘फिलॉसॉफिया पेरिनीज’ म्हणजे सनातन तत्त्वज्ञान हा शब्द सापडल्याक्षणी त्यांना इतका आनंद झाला, की त्याच्या उन्मादाने त्यांना रात्रभर झोप लागली नाही. याच तत्त्वज्ञानाला वेदान्त किंवा परमार्थ म्हणतात.

     बाबांना माणसांच्या जीवनात घडणार्‍या सत्य घटना वाचण्यास फार आवडत असत. ‘तुम्ही जीवन नीट पाहा. तत्त्वज्ञान हे आपल्या जीवनातून निर्माण झाले पाहिजे व ते आपल्या आचरणात आले पाहिजे,’ असा त्यांचा आग्रह होता. ‘अथातो जीवन जिज्ञासा’ असे बाबांच्या ‘आनंद साधनेचे’ प्रथम सूत्र होते. बाबांचे तरुणपण निजामाच्या हैद्राबादमध्ये गेल्यामुळे त्यांना उर्दू स्वाभाविकच उत्तम येत असे. ते उर्दू शायरी वाचीत असत. त्यांत त्यांना मिर्झा गालिब, मीर व जौक हे कवी अधिक आवडत असत.

     ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटिस बाजारातून मित्राबरोबर फिरत असताना त्याला म्हणाला, ‘‘मित्रा, मला या बाजारातली एकही वस्तू हवीशी वाटत नाही.’’ बाबांची अशीच संन्यस्त वृत्ती होती. त्यांचे सर्व लक्ष साधना, ग्रंथ अभ्यास यांवर केंद्रित झालेले होते. आयुष्यात मोठे ध्येय मिळविण्यासाठी सर्व प्रलोभने सोडून संन्यस्त वृत्तीच अंगी बाणवावी लागेल, असे ते म्हणत. त्यांच्या पत्नी इंदिराबाई या सात्त्विक व सुशील असून त्यांनी बाबांना लिखाणामध्ये मोलाची मदत केली. ऐहिक व पारमार्थिक जीवनातही त्या सदैव बाबांच्या बरोबर राहिल्या. बाबांना दोन मुलगे होते. मोठे चिरंजीव लहानपणीच वारले. धाकटे चिरंजीव प्रा. श्रीपाद केशव बेलसरे यांनी बाबांची आज्ञा जन्मभर पाळली व प्राणापलीकडे आई-वडिलांना सांभाळले. बाबांना तीन नाती आहेत. सगळ्या नाती उच्चविद्याविभूषित आहेत. साधी व स्वच्छ राहणी, निर्मळ व शुद्ध मन, तर्कशुद्ध विचार आणि वैराग्यपूर्ण विवेक असे बाबांचे व्यक्तिमत्त्व होते. Accuracy and Perfection या गोष्टी त्यांना फार आवडत असत. बाबांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा कलाटणी देणारा भाग म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, ज्यांच्यामुळे त्यांचे जीवन आमूलाग्र बदलून गेले. बाबांची व श्री महाराजांची पहिली भेट १९३१ मध्ये झाली. मुंबईतील बाबांचे चुलत काका यांनी बाबांना प्रथम श्री महाराजांकडे नेले. पहिल्या भेटीतच श्री महाराजांनी बाबांना ‘सध्या काय वाचन चालू आहे’ असे विचारले. बाबा त्या वेळी ज्ञानेश्वरी वाचत होते. श्री महाराजांनी त्यांना ज्ञानेश्वरीवर प्रवचन करण्यास सांगितले व नेहमी येत जावे असे ते म्हणाले. त्या दिवसापासून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबांनी निरूपणे केली. श्री महाराज व बाबा यांचा संबंध घनिष्ठ होत गेला. त्याचे सद्गुरू व सत्शिष्य असे प्रेमात रूपांतर झाले. श्री महाराजांनी बाबांच्या जीवनाची सूत्रे कायमची हातात घेतली.

     श्री महाराजांनी परमार्थातील अनेक गुह्य गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या. परमार्थातील अनेक अभ्यास (अमानित्व, अदंभित्व वगैरे) श्री महाराजांनी बाबांकडून करून घेतले. बाबांच्या स्वभावातील दोषांचे श्री महाराजांनी गुणांत रूपांतर केले. त्यांचा मूळ स्वभाव पूर्णपणे बदलून टाकला. याला ’Metamorphosis’ असे म्हणतात. हा आमूलाग्र बदल असतो.

     श्री महाराजांच्या सर्व आज्ञा बाबांनी तंतोतंत पाळल्या. ‘गुरुआज्ञा प्रमाण’ हा तर त्यांच्या साधनेचा प्राण होता. श्री महाराजांनी त्यांना ‘नामस्मरणाचा’ मार्ग सांगून प्रवचने करण्याची आज्ञा दिली. सुमारे ६४ वर्षे ते सतत प्रवचने करीत होते. त्यांच्या प्रवचनांमध्ये कायम ताजेपणा होता. श्रोते प्रवचनांमध्ये तल्लीन होऊन जात. अगदी अडाणी माणसांपासून विद्वान माणसांपर्यंत सर्वांना त्यांचे निरूपण समजत असे. विषय सोपा करून सांगण्याची त्यांची हातोटी वादातीत होती. तत्त्वज्ञान सोपे करून सांगताना त्यांच्या वाणीला बहर येई. ऐकणार्‍यांच्या अंगांवर रोमांच उभे राहत असे.

     बाबांनी फार मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली; पण त्याअगोदर शारदेला वंदन म्हणून त्यांनी प्रथम ‘श्री सद्गुरूंचे’ सविस्तर चरित्र लिहिले. ग्रंथ लिहिताना आपले सर्वस्व त्यात ते ओतीत असत. ते लिखाण पुन्हा पुन्हा तपाशीत असत. अनेक पुस्तके त्यांनी दहा-दहा वेळा लिहिलेली आहेत. श्री महाराजांच्या आज्ञेप्रमाणे आपला प्रपंच बाबांनी खर्‍या अर्थाने श्री महाराजांवर सोपविला. श्री महाराजांची बाबांना शेवटची आज्ञा होती : ‘‘येणारा काळ कठीण आहे. तुम्ही लोकांना नामाला लावा आणि धीर द्या.’’ श्रींच्या आज्ञेप्रमाणे बाबा स्वत: रोज पहाटे अत्यंत तीव्रतेने व एकाग्रतेने नामस्मरण करीत. साधना करत असताना साधनेच्या आड जे-जे काही आले, ते-ते सर्व त्यांनी अत्यंत कठोरपणे बाजूला सारले. दिवसेंदिवस ते खूप अंतर्मुख होत गेले. त्यांना श्री महाराजांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन असे व त्यांचे श्रींशी संभाषणही होत असे. ‘मी पांढर्‍या कपड्यांतला संन्यासी आहे,’ असे ते म्हणत असत. सर्व वेळ ते नामस्मरणात घालवीत असत. हजारो लोकांना ईश्वरसन्मुख करून नामाला लावले. प्रवचनांद्वारे श्री महाराजांचा निरोप लोकांपर्यंत पोहोचवण्याचे फार मोठे काम त्यांनी केले. बाबांवर लोकांनी प्रेमाचा वर्षाव केला. बाबांना कधी अहंकाराचा स्पर्श झाला नाही. आपली श्री महाराजांशी असलेली शरणागती त्यांनी कधी सोडली नाही. आपल्यामधील आध्यात्मिक अधिकार त्यांनी झाकून ठेवला. ‘‘मी तुमच्यातलाच एक आहे,’’ असे ते सर्वांना म्हणत. श्री महाराज म्हणायचे : ‘‘माणसाची खरी परीक्षा दारिद्य्र आणि देहदु:खात होते. आपल्या शेवटच्या आजारात बाबांनी देहदु:खाची खरी परीक्षा अत्यंत शांतपणे व प्रसन्नतेने देत बाबा श्री महाराजांच्या चरणी विलीन झाले.

शोभना बेलसरे

बेलसरे, केशव विष्णू