Skip to main content
x

भैद, उमाकांत यशवंत

      यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा या गावचे यशवंतराव भैद यांचे कुटुंब हे एक प्रतिष्ठित व सधन कुटुंब होय. उमाकांत यशवंत उपाख्य बाबूराव भैद हे त्यांचे एकुलते पुत्र होत. लहानपणापासून अतिशय चिकित्सक बुद्धिमत्ता लाभलेल्या बाबूरावांनी मॅट्रिकची परीक्षा लाहोर येथून उत्तीर्ण केली. नंतर जवळपास एक हजार एकर वडिलोपार्जित जमीन सांभाळण्याची जबाबदारी वडिलांनी त्यांच्या खांद्यावर टाकली. पुढे १९४४मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी शेतीशी आपले नाते जोडले. शेती करत असतानाच त्यांना फोटोग्राफीचा छंद लागला. ते स्वतः एक उत्कृष्ट चित्रकार होते. त्यांच्या चित्रकलेच्या प्रतिकृती आजही जिवंत वाटतात. त्यांनी हळूहळू फोटोग्राफी हा व्यवसाय म्हणून स्वीकारला. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी परिचय झाला. या विचारसरणीकडे ते इतके आकृष्ट झाले की, फोटोग्राफीचा व्यवसाय पूर्णपणे बंद करून त्यांनी संघकार्य स्वीकारले. त्या वेळी दारव्हा तालुका म्हणजे आजचे दारव्हा, दिग्रस आर्णी व नेर मिळून फार मोठा तालुका होता. संघप्रसाराकरता त्यांनी ‘बैलजोडीने जुंपलेला छकडा’ या वाहनाने भ्रमण सुरू केले. दारव्हा तालुक्यातील जवळपास २५० खेड्यांपैकी १५० खेड्यांमध्ये फिरून संघाच्या १५० शाखा स्थापन केल्या. आपल्या कार्यक्षेत्राची ओळख म्हणून दारव्हा तालुक्याचा मोठा नकाशा स्वतः तयार करून शाखा स्थापन केलेल्या गावांवर खुणेसाठी म्हणून भगवा झेंडा काढून ठेवला. त्यांच्या या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे, निःस्वार्थ सेवेमुळे व उत्कृष्ट वक्तृत्वशैलीमुळे संघाच्या वरिष्ठ मंडळींमध्ये बाबूराव भैद यांचे अग्रस्थान होते.

पिढ्यान्पिढ्या  शेतीचा व्यवसाय करणारा शेतकरी दरिद्री, परावलंबी व लाचार होता. आपले रक्त आटवून तो जे पिकवी, त्याचे दाम किती मिळावे याचा त्याला अधिकार नाही ही खंत बाबूरावांना होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी एक संघटना असावी ही भावना त्यांच्या मनामध्ये जागृत झाली. अखेर १९६९मध्ये त्यांनी दारव्हा येथील त्यांच्या राहत्या घरी काही सुशिक्षित व जाणकार शेतकरी मित्रमंडळींना एकत्र करून ‘भारतीय किसान संघा’ची स्थापना केली. त्यांना या कामात विदर्भातील प्रामुख्याने अनंत काणे, बळवंत बापट व मधुकर एकबोटे या संघकार्यकर्त्यांची मदत मिळाली. हळूहळू शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देऊन त्यांनी भारतीय किसान संघामध्ये सामील करून घेतले. त्यांच्या कार्यविस्ताराचा झपाटा व जनमानसाकडून मिळणारा पाठिंबा पाहून संघातील श्रेष्ठींनी त्यांच्या मदतीसाठी बाळाभाऊ पांडे यांच्या रूपाने एक पूर्ण वेळ कार्यकर्ता दिला. किसान संघाचे वाढते रूप पाहून बाबूरावांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य किसान संघाकरता वेचण्याचा विडा उचलला. या कामात त्यांना जागतिक कीर्तीचे मजदूर पुढारी व थोर तत्त्वचिंतक दत्तोपंत ठेंगडी यांची साथ मिळाली. सुरुवातीला विदर्भापुरता मर्यादित असलेला हा भारतीय किसान संघ आज भारतातल्या प्रत्येक प्रांतात कार्यरत आहे. भैद यांनी १९४४ ते १९७० असा दीर्घकाळ शेतीचा अतिशय चिकित्सक दृष्टीने सखोल अभ्यास केला. हवामान व निसर्ग यांना वाकवता आले नाही तरी त्यांच्या लहरीचा अभ्यास करून, त्यानुसार शेतीचे वेळापत्रक आखणे, जमिनीवर, पिकांवर व कामावर होणारे भिन्न-भिन्न परिणाम, हवामानाची स्थित्यंतरे लक्षात घेऊन अभ्यासपूर्वक पाठपुरावा करणे हा त्यांचा नित्यक्रम होता. त्यांचे हवामानविषयक वाचन व लिखाण अचूक होते. कोणत्या वर्षी हवामानाचा संचार कसा होता, कोणत्या वर्षी पाऊस कोठे व कसा झाला याची किमान २५ ते ३० वर्षांची सविस्तर माहिती त्यांच्याजवळ होती. त्यावरूनच ते हवामानाच्या वर्तनाचा हिशोब मांडत असत व पावसाचे सकारण तारीख, वार वेळापत्रकही सांगत. त्यांनी तरुण भारत या दैनिकाद्वारे जवळपास २५ वर्षे हवामानाचा अचूक अंदाज वर्तवला. त्यांच्या हवामानाच्या अंदाजाचे हे रेकॉर्ड हैदराबाद येथील इक्रिसॅट नावाच्या जागतिक संस्थेने अभ्यासासाठी स्वतःजवळ ठेवले आहे. त्यांच्या अभ्यासात्मक निरीक्षणाचा हा गौरवच होय.

बाबूराव यांनी पारंपरिक शेतीमध्ये सुधारणा करून शेतीच्या कारभाराची पुनर्रचना केली. शेतीची योजना व अंदाजपत्रक तयार करणे, योजनेची वक्तशीर अंमलबजावणी करणे, पिकांची अधिक उत्पन्नासाठी फायदेशीर रचना करणे असे शेतीच्या कारभारातील अनेक बदल त्यांनी शेतकऱ्यांना शिकवले. त्यांच्या या अभ्यासाचे इतर शेतकरी वर्गाला मार्गदर्शन मिळावे म्हणून त्यांनी ‘शेतीचा कारभार’ नावाचे पुस्तक लिहिले. पुण्याच्या किर्लोस्कर प्रकाशनाने या पुस्तकाच्या हजारो प्रती काढून शेतकरी वर्गाला फायदा करून दिला. त्यांच्या या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्याची जबाबदारी त्यांचे मित्र महाराष्ट्र राज्याचे कृषी-संचालक कृ.गो. जोशी यांनी आपणहून स्वीकारली. त्यांच्या शेतीविषयक अभ्यासाची हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात कीर्ती पसरू लागली व महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिसंचालक कळमकर, डॉ.पं.दे.कृ.वि.चे त्या वेळचे कुलगुरू गोपाळकृष्ण, किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंदराव किर्लोस्कर या सर्वांनी त्यांच्या शेतीला भेटी दिल्या. आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत बाबूरावांनी स्वतःला संघकार्यासाठी वाहून घेतले. संघकार्याला शेतकरी संघटनेचा नवा आयाम देऊन तो स्थापित करून दिला. आयुष्यात कधीही उच्चपदाची व नावलौकिकाची अभिलाषा न ठेवता ते कार्य करत राहिले. 

डॉ. पं.दे.कृ.वि.च्या स्थापनेनंतर त्या विद्यापीठात कृषि-हवामानशास्त्र या नवीन व महत्त्वाच्या विषयाचा अंतर्भाव व्हावा म्हणून त्यांनी सतत पाठपुरावा करण्याचे काम केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्यामुळेच विद्यापीठाने २००० सालापासून कृषी-हवामानशास्त्र हा विषय शिकवण्यास सुरुवात केली. म्हणून भैद यांच्या मुलांनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ.पं.कृ.वि.तील कृषी-हवामानशास्त्र या विषयामध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी रोख रकमेचे पारितोषिक दिले जाते.

- संपादित

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].