Skip to main content
x

भांड, बाबा साळूबा

     बाबा भांड यांचा जन्म वडजी, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद येथे एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण केंद्रीय प्राथमिक शाळा, पिंपरीराजा, जिल्हा औरंगाबाद येथे, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण औरंगाबादच्या सरस्वती भुवन हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. १९६८ मध्ये ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. या परीक्षेत ते गुणवत्ता यादीतही झळकले. सरस्वती भुवन महाविद्यालय, औरंगाबाद येथून त्यांनी १९७२मध्ये बी.ए.ची पदवी प्राप्त केली. १९७५मध्ये ते मराठवाडा विद्यापीठातून इंग्रजी विषय घेऊन एम.ए. झाले. १९७९मध्ये त्यांनी उस्मानिया विद्यापीठाची बी.एड.ची पदवी प्राप्त केली.

     शालेय जीवनात बालवीर (स्काउट गाइड) चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. प्रारंभिक लेखनालाही त्याच काळात सुरुवात झाली. सहाव्या वर्गात ‘वहीतलं बालपण’ या शीर्षकांतर्गत रोजनिशी-लेखन केले. इयत्ता आठवीत असताना बालवीर चळवळीतले सर्वोच्च राष्ट्रपतिपदक डॉ.राधाकृष्णन यांच्या हस्ते १९६६मध्ये प्राप्त झाले. १९६९मध्ये जागतिक स्काउट गाइड मेळाव्यासाठी भांड यांची निवड भारत शासनातर्फे झाली आणि युवक-युवती मेळाव्यासाठी अमेरिका व कॅनडा या देशांचा प्रवास केला. त्याचनिमित्ताने इतरही अनेक देशांचा प्रवास केला. हे प्रवासवर्णन १९७५मध्ये ‘लागेबांधे’ या नावाने प्रकाशित झाले. तत्पूर्वी औरंगाबादच्या ‘कैलास’, ‘अजिंठा’, ‘जिकाय’ इत्यादींतून व ‘मनोहर’ या नियतकालिकातून सुरुवातीचे लेखन प्रकाशित झाले. १९७२-१९७३मध्ये महाविद्यालयीन जीवनात ‘स्वाती’ या काव्यविषयक मासिकाचे संपादन केले. स्काउट कार्यालयातर्फे प्रकाशित होणार्‍या ‘युवक-पत्रिका’चेही त्याच काळात संपादन केले. ‘शब्दसंगत’ या नवसाक्षरांसाठीच्या पक्षिकाचेही १९७८पासून संपादन केले. १९९३मध्ये ‘साकेत-सवंगडी’ या मासिकाचे संपादन केले. १९७५मध्ये ‘धारा प्रकाशन’ नावाची प्रकाशन संस्था सुरू केली. यातूनच पुढे १९८७ मध्ये ‘साकेत प्रकाशन’ या संस्थेचा जन्म झाला. साकेततर्फे आजवर अनेक मान्यताप्राप्त लेखकांची हजरावर पुस्तके प्रकाशित झाली असून मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील ती एक नामवंत प्रकाशनसंस्था बनली आहे. १९६८-१९७२ या काळात औरंगाबादच्या स्काउट कार्यालयात कारकून म्हणून कार्यरत होते, तर १९७३ ते १९७८ दरम्यान मराठा विद्यालय, औरंगाबाद येथे अध्यापन कार्य केले. १९७६-१९७७ दरम्यान वीटभट्ट्यांचा व्यवसायही केला. प्रारंभी बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाबांना १९९५ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘दशक्रिया’ ह्या कादंबरीने बाबा भांड ह्यांना एक दर्जेदार लेखक म्हणून मराठी साहित्यविश्वात प्रसिद्धी मिळवून दिली. अंत्यसंस्कार करणार्‍या वर्गाच्या जीवनावर ‘दशक्रिया’चे कथानक बेतले होते. याशिवाय ‘जरंगा’ (१९७८), ‘काजोळ’ (१९८४), ‘तंट्या’ (२००१) या त्यांच्या कादंबर्‍या प्रसिद्ध झाल्या आहेत.

     ‘कोसलाबद्दल’ (संपादन, १९७९), ‘पांगोरे’ (ललितगद्य, १९८१), ‘पारंब्या’ (प्रवासलेखन, १९८३), ‘कायापालट’ (कथा, १९८८) आनंदघन (ललित, २००५) हे त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले आहे.‘ंहोरपळ’ (१९९१), ‘दुष्काळ’ (१९९१), ‘पाण्यासाठी दाहीदिशा’ (२००१) हे एकांकिकासंग्रहही प्रकाशित झाले आहेत. याशिवाय त्यांचे बाल-कुमार वाचकांसाठी लिहिलेले साहित्य मोठ्या प्रमाणावर प्रकाशित झाले आहे. बाल-कुमार साहित्यासह बाबा भांड यांची एकंदरीत ७०पेक्षा अधिक पुस्तके आजवर प्रकाशित झाली आहेत. यांपैकी १० पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय-निर्मितीचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यांमध्ये ‘पांगोरे’, ‘काजोळ’, ‘दशक्रिया’, ‘तंट्या’ ह्या साहित्यकृतींचा समावेश होतो. ‘दशक्रिया’ला दमाणी साहित्य पुरस्कार, कुरुंदकर पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ह.ना.आपटे पुरस्कार इत्यादी सन्मानही प्राप्त झाले आहेत. वाङ्मयासोबतच सामाजिक कार्यातही बाबांचा लक्षणीय सहभाग आहे. १९८८साली त्यांनी वडजी येथे ‘शाहू छत्रपती सार्वजनिक वाचलानल’ सुरू केले. १९९०मध्ये शेतकर्‍यांच्या अपंग व मूकबधिर मुलांसाठी ‘आनंद मूक-बधिर विद्यालय’ ह्या संस्थेची स्थापना करून त्यांच्यासाठी मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. १९९०मध्ये ‘नाथ निवासी अपंग विद्यालय’ ह्या संस्थेचा प्रारंभ झाला. १९९५-२००० या काळात वडजी या जन्मगावी व आसपास पाणलोट क्षेत्र विकासाचे महत्त्वपूर्ण कार्य बाबा भांड ह्यांनी केले आहे.

     - डॉ. राजेंद्र नाईकवाडे

भांड, बाबा साळूबा