Skip to main content
x

भिडे, बाळकृष्ण त्र्यंबक

       प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक पदापर्यंत पोहोचलेले कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणजे  बाळकृष्ण त्र्यंबक भिडे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातल्या पाले या गावी झाला. कुटुंबाचा व्यवसाय हा शेती होता. वडील त्र्यंबक हरी भिडे हे पोस्टात कार्यालय अधिक्षक (ऑफीस सुपरीटेंडंट) होते. आईचे नाव गंगाबाई होते. भिडे बारा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले. घरची हलाखीची परिस्थिती शिक्षण घेण्यात अडचणी निर्माण झाल्या. परंतु परीक्षेत पहिला क्रमांक सतत मिळवत गेल्यामुळे मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमांतून त्यांना शिक्षणासाठी खर्च करणे सोपे गेले. त्यांची वक्तृत्वकलाही चांगलीच फुलली असल्यामुळे विविध बक्षिसे मिळवत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. भिडेंचा १९५१ साली शालान्त परीक्षेत ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून ठाणे केंद्रात पहिला नंबर आला.

        नंतर त्यांनी नारायण टोपीवाला महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु ते महाविद्यालय बंद पडल्यामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी १९५२ साली पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात यावे लागले. १९५३ साली इंटरला ते फर्ग्युसन महाविद्यालयातून ते विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. कला-विज्ञान शाखेतही गणितात प्रथम येण्याचे बक्षीस त्यांना मिळाले. १९५६ साली ते पुण्याच्या सी.ओ.ई.पी मधून बी.ई.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर डिसेंबर १९५६ मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. ते संपूर्ण भारतातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. परंतु त्यांच्यासमोर शारिरीक चाचणीचे संकट उभे राहिले. परंतु त्यांनी नियमित व्यायाम करून तब्येत सुधारली आणि १९५८ साली त्यांची रेल्वेत नियुक्ती झाली.

      प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९६० साली पहिल्यांदा त्यांची इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई येथे नियुक्ती झाली. सहाय्यक कार्य व्यवस्थापक या पदावरून त्यांनी  कारकीर्दिला सुरवात केली. त्यांचे सर्व अहवाल हे काटेकोर बिनचूक असत. काम वेळेत आणि अगदी व्यवस्थित होत असे. १९६७ साली भारतीय रेल्वेने १२ जणांचा एक गट अभ्यासासाठी जर्मनीला पाठवायचे ठरवले अणि त्यात भिडेंची निवड करण्यात आली. जर्मनीत अनेक ठिकाणी त्यांनी अभ्यास केला. नीट अभ्यास करता यावा यासाठी त्यांनी जर्मन भाषाही अवगत केली. १४ महिने अभ्यास करून भारतात परत आल्यानंतर त्यांनी जर्मनीतील तंत्रज्ञान भारतीय रेल्वेचे डबे बनवण्यात वापरण्याचा प्रयत्न केला. या वेळी नवीन निर्माण केलेल्या मीटर गेजच्या डब्यात एक मोठी समस्या उभी राहिली. त्या डब्यांची चाके अल्पावधीत झिजत असल्याचे दिसून आले. या प्रश्नाचा विचार करून ज्या चुकीच्या कार्यप्रणालीमुळे हे घडत होते. त्याचे मूळ शोधण्यात आले व निरनिराळ्या रेल्वेकडे जावून योग्य ती सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन केले. अशाप्रकारे एक मोठा प्रश्न सुटला.

       याच काळात त्यांनी “आयसीएफ मधील उत्पादन व पुनरावलोकनाची अवश्यकता” हा निबंध लिहीला. याला ‘रेल्वे मिनिस्टर्स अ‍ॅवॉर्ड ’ मिळाले आणि १९७१ साली त्यांची ‘ब्युरो ऑफ पब्लिक इंटरप्रायजेस’च्या संयुक्त संचालकपदी नेमणूक करण्यात आली. भिडे यांनी व्यवस्थापनविषयक भरपूर संशोधन करून वेगवेगळे निबंध व छोटी-मोठी पुस्तके लिहिली आहेत. देखभाल, इन्सेटिव्हज आदी विषयावर वेगवेगळे सुधारणात्मक कार्य केले.

            याच कालावधीत पश्चिम बंगालमधील कामगार  संघटनांच्या भूमिकेमुळे व स्वार्थी व्यवस्थापनामुळे कोलकाता येथील इंडिया मशिनरी कंपनी डबघाईला आली होती. तिचे व्यवस्थापन केंद्र सरकारने आपल्या हातात घेतले व भिडे यांची त्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केली. अशा परिस्थितीत भिडेंनी तब्बल तीन वर्षे या ठिकाणी पाय रोवून कार्य केले. पूर्णत: डबघाईला आलेल्या या कंपनीला भिडेंनी आर्थिक संकटातून बाहेर काढले.  पश्चिम बंगालचे उद्योगमंत्री डॉ.कन्हाईलाल भट्टाचार्य यांनी त्यांचे काम पाहून त्यांना याच पदावर कायम राहण्याची विनंती केली. पण भिडे यांनी ती स्वीकारली नाही.

      पुढे ते रेल्वे सेवेत परत आले नंतर पूर्व रेल्वे, दक्षिण रेल्वेत विभागीय व्यवस्थापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. नंतर १९९०च्या मे महिन्यात त्यांची नेमणूक चेन्नईच्या कोच फॅक्टरीत महाव्यवस्थापक म्हणून झाली. भिडेंनी याच ठिकाणी सर्वांत कनिष्ठ पदावरून आयुष्याची सुरुवात केली होती. त्याच ठिकाणी त्यांना सर्वोच्च पदावर बसण्याचा बहुमान मिळाला.

        निवृत्तीनंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सल्लागार म्हणून काम केले. ‘पॅलेस ऑन व्हिल्स’ ही राजस्थानातील महत्त्वपूर्ण रेल्वे बनवण्याचेही महत्त्वाचे काम त्यांनी केले. रेल्वेत चौकशी अहवालासाठीही त्यांनी निवृत्तीनंतर महत्त्वाचं काम केले. सध्या ते पुण्यातच निवासाला असतात.

- दत्ता कानवटे

भिडे, बाळकृष्ण त्र्यंबक