भिडे-देशपांडे, अश्विनी
अश्विनी भिडे यांचा जन्म मुंबईत एका कलाप्रेमी कुटुंबात झाला. त्यांचे वडील मोहन भिडे हे तबला- वादन शिकले होते, आत्या मुक्ता व सरला भिडे याही गायिका, तर आई माणिक भिडे या किशोरी आमोणकर यांच्या ज्येष्ठ शिष्या होत. अर्थातच अश्विनीताईंना घरातूनच संगीताचा समृद्ध वारसा मिळाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण पं.नारायणराव दातार यांच्याकडे झाले. त्यानंतर आई माणिक भिडे व पं.रत्नाकर पै यांच्याकडे अश्विनी भिड्यांनी जयपूर गायकीचे शिक्षण घेतले. सरला भिडे व डॉ.अनिता सेन यांच्याकडून त्यांनी ठुमरीसाठी मार्गदर्शन घेतले. सोळाव्या वर्षीच त्यांनी ‘संगीत विशारद’ ही पदवी मिळवली, तसेच १९७७ साली आकाशवाणी संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे राष्ट्रपतिपदकही प्राप्त केले. सूक्ष्मजीवशास्त्रामधून एम.एस्सी. (मुंबई विद्यापीठ) व भाभा अणू संशोधन संस्थेतून जैवरसायनातील डॉक्टरेट मिळवूनही डॉ.अश्विनी भिडे-देशपांडे यांनी गायन हाच व्यवसाय म्हणून पत्करला.
आपल्या सुरेल, मोकळ्या आवाजाने श्रोत्यांवर क्षणातच काबू मिळविणार्या अश्विनी भिडे या उत्तम मैफली गायिका म्हणून मान्यता पावल्या . आत्मविश्वास आणि वैचारिक स्पष्टता हे गुण त्यांच्या गायनातही जाणवतात. स्पष्ट, तरीही रसमय स्वरोच्चारण करत, अतिशय चुस्तपणे आणि खुमारीने बंदिश मांडून त्या बढत करतात. जोशपूर्ण, चपळ, दाणेदार, खास जयपूरच्या लयबंधांची तानक्रिया त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य आहे. किशोरी आमोणकर यांच्या गायनशैलीला त्यांनी समर्थपणे अंगिकारले आहे व जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका म्हणून त्या प्रस्थापित झाल्या आहेत.
एच.एम.व्ही., म्यूझिक टुडे, सोनी इ.अनेक कंपन्यांनी त्यांच्या रागसंगीत, ठुमरी, भक्तिसंगीताच्या ध्वनिफिती प्रकाशित केल्या असून त्या लोकप्रिय झाल्या आहेत. भारत व विदेशांतल्या सर्वच महत्त्वाच्या रंगमंचांवरून, संगीत महोत्सवांतून, तसेच आकाशवाणी, दूरदर्शनसारखी माध्यमे यांतून त्यांची गायनकला सातत्याने रसिकांना ऐकावयास मिळते व त्यांच्या कलाकौशल्यास मोठ्या प्रमाणात कलाप्रेमींनी दाद दिली आहे. तरुणवर्ग त्यांचे अनुकरण करू पाहतो.
अश्विनी भिडे-देशपांडे या वाग्गेयकारही आहेत. ‘रागरचनांजली’ हे त्यांच्या बंदिशींचे पुस्तक ध्वनिमुद्रिकेसह दोन भागांत, २००४ व २०१० साली प्रकाशित झाले आहे. या पुस्तकातील बंदिशी आणि त्यांचे स्वनिर्मितीबाबतचे विचार त्यांची बुद्धिमत्ता आणि उत्कट संवेदनशीलता दर्शवितात. या दोन्ही पुस्तकांत त्यांनी काही नवीन रागरूपेही मांडली आहेत.
त्यांनी अनेक प्रचलित व अप्रचलित रागांत व मत्तताल, साडेसात, साडेनऊ मात्रांच्या तालांसारख्या कंठसंगीतात कमी वापरल्या जाणार्या तालांतही बंदिशी रचल्या आहेत. याखेरीज त्यांनी ठुमरी-दादरा शैलीतीलही रचना केल्या आहेत. अनेक संतांची हिंदी, मराठी भजने, अभंग, संस्कृत स्तोत्रे स्वरबद्ध करून त्यांचेही कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. संजीव अभ्यंकर या मेवाती घराण्याच्या गायकासह त्या ‘जसरंगी जुगलबंदी’चाही अनोखा प्रयोग करतात.
सानिया पाटणकर, रेवती कामत, श्रुती आंबेकर, धनश्री घैसास, सायली ओक, शिवानी हळदीपूर, इ. शिष्यांना त्यांनी शिकवले आहे. या भरघोस कार्याबद्दल ‘पं. जसराज’ पुरस्कार, मध्य प्रदेश शासनाचा ‘पं. कुमार गंधर्व’ पुरस्कार (२००५), दूरदर्शनचा ‘संगीतरत्न’ पुरस्कार (२०१०), महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार (२०११) असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.