Skip to main content
x

भोसले, आशा

शा भोसले या जागतिक कीर्तीच्या गायिका असून जगात सर्वांत जास्त गाणी (१२,०००) गायल्याची विक्रमी नोंद त्यांच्या नावावर जमा आहे. आशा भोसले यांचा जन्म सांगली येथे झाला. मा.दीनानाथ मंगेशकर व माई मंगेशकर यांचे हे तिसरे अपत्य. लता मंगेशकर व मीना मंगेशकर (खडीकर) या त्यांच्या थोेरल्या बहिणी, तर उषा मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची धाकटी भावंडे.

आशा भोसले यांचा बालपणाचा काही काळ अतिशय सुखाचा गेला व त्या आपल्या वडिलांच्या फार लाडक्या होत्या. दीनानाथ मंगेशकर आपल्या दोन मुली लता व मीना यांना गाणे शिकवीत असत त्या वेळी आशा यांचा गायनाकडे विशेष ओढा नव्हता.

दीनानाथ मंगेशकर यांचे १९४२ साली अकाली निधन झाले. त्यामुळे थोरली बहीण लता मंगेशकर यांना मा. विनायक यांच्या कंपनीमध्ये गायिका, अभिनेत्री म्हणून काम करावे लागले. मंगेशकर कुटुंबीय पुण्याहून कोल्हापूरला आले. कोल्हापूरच्या वास्तव्यात आशा यांनी ‘माझं बाळ’ या मा. विनायकांच्या चित्रपटात प्रभात फेरीच्या प्रसंगात एक छोटीशी भूमिका केली. या प्रसंगावर ‘चला चला नवबाला’ हे गाणे चित्रित केले होते. या गाण्यात लता, मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ या सर्व भावंडांचा सहभाग होता. तसेच मा. विनायक यांच्या ‘बडी माँ’ या हिंदी चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली होती.

याच काळात मा. विनायकांनी आपली कंपनी कोल्हापुराहून मुंबईला आणली. त्या वेळी लता मंगेशकर व मीना मंगेशकर मुंबईला राहत, तर आशा, उषा, हृदयनाथ ही भावंडे माईंसह आजोळी, थाळनेरला राहत होती. त्यानंतर लता मंगेशकरांना नाना शंकरशेट चौकात घर मिळाले आणि सगळी मंगेशकर भावंडे आपल्या आईसह मुंबईत एकत्र राहू लागली.

याच सुमारास मंगेशकरांच्या ओळखीचे गणपतराव भोसले यांच्याशी आशा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या माहेरच्या मंडळींना पसंत नव्हता, त्यामुळे लग्नानंतर काही काळ त्यांचे माहेरच्या मंडळींशी संबंध दुरावले. लग्नानंतर त्या बोरिवलीला राहू लागल्या आणि त्यांच्या पतीने त्यांना गायनासाठी प्रोत्साहन दिले.

आशा भोसले यांच्यावर लहानपणासूनच संगीताचे संस्कार होते, तरी त्यांना गायनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळाले नव्हते. शास्त्रीय संगीताच्या शिक्षणासाठी त्या शंकरराव व्यासांच्या विद्यालयात शिकू लागल्या. व्यास संगीत विद्यालयात त्यांनी शास्त्रीय संगीताच्या परीक्षा दिल्या. एका परीक्षेच्या वेळी शंकररावांनी आशा भोसले यांना बडे गुलाम अली खाँ यांची ‘आए न बालम’ ही ठुमरी म्हणण्यास सांगितली. आशा भोसले यांनी अतिशय तन्मयतेने  ही ठुमरी गायली आणि त्या परीक्षेत पहिल्या आल्या. नंतर काही काळ त्या मास्टर नवरंग नागपूरकर यांच्याकडेही रागसंगीत शिकल्या.

आशा भोसले १९४८ सालापासून मराठी व हिंदी चित्रपटांत पार्श्वगायन करू लागल्या. आज ‘आशा भोसले’ या नावाला जे वलय आहे, त्यामागे त्यांची प्रचंड मेहनत, जिद्द आणि संघर्ष आहे. पार्श्वगायनाची कामे आशा भोसले यांना मिळू लागली तरी त्यांचा मार्ग सुकर नव्हता. त्या काळात मराठी-हिंदी क्षेत्रात अनेक नामवंत गायिका होत्या, तसेच त्यांची मोठी बहीण लता मंगेशकर यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यामुळे आशा भोसले यांना स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची होती. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि त्यामुळेच आज त्यांची ओळख ‘एक चतुरस्र गायिका’ अशी आहे.

गाण्यातील कोणताही प्रकार आपल्याला सहज गाता आला पाहिजे अशाच पद्धतीने त्यांनी मेहनत घेतली आहे. अस्सल रागदारीवर आधारित गाणी, नाट्यगीते, लावणी, पारंपरिक स्त्री-गीते, बालगीते, भक्तिगीते, देशभक्तिगीते, अंगाईगीते, पाश्चिमात्य ढंगाची गाणी इत्यादींचा त्यांचा गायनप्रवास थक्क करणारा आहे.

‘गोकुळचा राजा’, (संगीत : पुरुषोत्तम सोळांकुरकर), ‘स्वराज्याचा शिलेदार’ व ‘शिवा रामोशी’ (संगीत : दत्ता डावजेकर) हे त्यांचे काही सुरुवातीचे चित्रपट होत. हळूहळू मराठीमधील सारेच संगीतकार आशा भोसले यांचा आवाज प्रामुख्याने वापरू लागले.

याच सुमारास आशा भोसले यांच्या कौटुंबिक जबाबदार्‍या वाढत होत्या. हेमंत, वर्षा आणि आनंद या तीन मुलांच्या त्या आता आई होत्या आणि मुलांना वाढवत त्या एकीकडे पार्श्वगायन करीत होत्या. आपण फारसे शालेय शिक्षण घेतले नसले तरी आपल्या मुलांनी उत्तम शिक्षण घ्यावे असा त्यांचा कटाक्ष असे.

साधारणत: १९५० सालापासून त्या मराठी, हिंदी व अन्य भाषांतील पार्श्वगायनात अतिशय व्यस्त झाल्या. १९५१ सालच्या ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटापासून त्या मराठीतील अग्रगण्य संगीतकार सुधीर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनात गाऊ लागल्या. सुधीर फडक्यांनी संगीत द्यावे आणि आशा भोसल्यांनी गाऊन लोकप्रिय करावे हा सिलसिला अनेक दशके सुरू होता. सुधीर फडक्यांकडे आशा भोसले विविध प्रकारची गाणी गायल्या आहेत. ‘जगाच्या पाठीवर’मधील ‘तुला पाहते रे’, ‘सुवासिनी’ चित्रपटातील ‘जिवलगा कधी रे येशील तू’ हे रागमालिकेतील गीत, ‘जशास तसे’मधील ‘चिंचा आल्यात पाडाला’सारखी अवखळ लावणी, ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातील ‘बाई मी विकत घेतला श्याम’सारखे भक्तिगीत, ‘मुंबईचा जावई’मधील ‘आज कुणीतरी यावे’ हे आणि अनेक गीते. सुधीर फडके यांच्या संगीतदिग्दर्शनात आशा भोसले यांनी १९१ चित्रपटगीते गायलेली आहेत. आशा भोसले सुधीर फडक्यांव्यतिरिक्त वसंत प्रभू, वसंत पवार, शंकरराव कुलकर्णी, राम कदम, पु.ल. देशपांडे, श्रीनिवास खळे, दत्ता डावजेकर, आनंदघन, हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके, बाळ पळसुले, अनिल अरुण इत्यादी अनेक संगीतकारांकडे गायल्या आहेत.

‘बुगडी माझी सांडली ग’सारखी लावणी, ‘मलमली तारुण्य माझे’सारखे प्रेमगीत, ‘मामाच्या गावाला जाऊ या’, ‘नाच रे मोरा’सारखी बालगीते, ‘मागे उभा मंगेश’सारखे भक्तिगीत, ‘या डोळ्यांची दोन पाखरे’सारखे गूढ गीत, ‘सैनिक हो तुमच्यासाठी’सारखे देशभक्तिगीत, तर ‘एक झोका’सारखे अलीकडच्या काळातील गीत, इतके वैविध्य आशा भोसले यांच्या चित्रपटगीतांत आहे. त्यांनी गजाननराव वाटवे, सुधीर फडके, वसंतराव देशपांडे, दशरथ पुजारी, सुरेश वाडकर, पंडितराव नगरकर इत्यादी गायकांबरोबर अनेक द्वंद्वगीते गायली आहेत. नव्वदच्या दशकात आशा भोसले यांच्या आवाजाचा उपयोग संगीतकार आनंद मोडक यांनी केला आहे. त्यांच्या संगीत दिग्दर्शनात आशा भोसले यांना उत्कृष्ट पार्श्वगायनाचे चार पुरस्कार मिळाले आहेत.

त्यांना २००० साली ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार मिळाला. भारत सरकारने २००८ मध्ये ‘पद्मविभूषण’ या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. मध्यप्रदेश (१९८९), महाराष्ट्र (१९९९) शासनांचे ‘लता मंगेशकर’ पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

दत्ता डावजेकरांच्या संगीतदिग्दर्शनात १९४८ साली आशा भोसले प्रथम भावगीत गायल्या. पुढे १९४९ साली डावजेकरांच्याच संगीत दिग्दर्शनातील ‘कुणी बाई गुणगुणले’ हे भावगीत लोकप्रिय झाले. वसंत प्रभूंकडे १९५० साली ‘गळ्यात माझ्या तूच जिवलगा’ हे भावगीत त्या प्रथम गायल्या आणि पुढे एक तप त्या वसंत प्रभूंकडे उत्तमोत्तम भावगीते गायल्या. साठच्या दशकात यशवंत देव, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर या तीन संगीतकारांकडे त्यांची उत्तमोत्तम भावगीते, उदा. ‘विसरशील खास मला’, ‘सहज सख्या एकटाच’, ‘एका तळ्यात होती’, ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘मी मज हरवून बसले ग’, ‘चांदण्यात फिरताना’ इत्यादी आहेत.

पुढच्या काळात अनिल-अरुण या जोडीबरोबर त्यांनी काही भावगीते गायली. आशा भोसले यांचा मुलगा हेमंत भोसले यांनी काही भावगीते आपल्या आईकडून गाऊन घेतली. ‘मी अशी भोळी कशी ग’, ‘शारद सुंदर चंदेरी राती’ ही त्यांची काही गाजलेली भावगीते आहेत.

श्रीधर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनात १९९३-९४ साली आशा भोसले यांचा ‘ऋतु हिरवा’ नावाचा भावगीतांचा गीतसंच आला. यातील सारीच गीते अतिशय लोकप्रिय झाली. वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षीसुद्धा आशा भोसले यांचा आवाज तरुण आहे आणि त्यांचा गाण्याचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे.

आपल्या वडिलांच्या नावाचा;  सन्मानाचा, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारही त्यांना लाभलेला आहे.

अद्वैत धर्माधिकारी

भोसले, आशा