Skip to main content
x

चौबळ, विनायक वासुदेव

        विनायक वासुदेव चौबळ यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे वडील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ज्ञातीतील पहिले पदवीधारक होते. बी.टी. (बॅचलर ऑफ टीचिंग) ही पदवी त्यांनी घेतली होती. तसेच एम.एड.(मास्टर ऑफ एज्युकेशन) ही पदवीही त्यांनी मिळवली होती.  मुंबईच्या तत्कालीन शिक्षण विभागात कुलाबा (रायगड) जिल्ह्याचे  ते शिक्षणाधिकारी होते.

       विनायक चौबळ यांचे शिक्षण नाशिक, एलफिन्स्टन विद्यालयात व विल्सन महाविद्यालयात झाले. त्यानंतर काही काळ त्यांनी महाविद्यालयातच अध्यापनाचे काम केले. नंतर मुंबई सचिवालयात ते नोकरी करू लागले. १९४८ मध्ये त्यांनी भारतीय पोलीस खात्यात प्रवेश केला. नाशिक, खेडा व धारवाड जिल्ह्यांत त्यांनी साहाय्यक पोलीस आयुक्त पदावर काम केले. नंतर पोलीस सुपरिंटेंडट म्हणून कारवार, ठाणे, सोलापूर, सातारा व अहमदाबाद येथेही त्यांनी काम केले. दरम्यान न्यायाधीश अनंतराव फडकर यांच्या कन्या पद्मजा यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

       १९५७ ते १९७२ या काळात भारत सरकारच्या गुप्तवार्ता विभागात ते काम करत होते. मुंबई, नागपूर, गोवा, दिल्ली, कोहिमा (नागालँड) व शिलाँग (मेघालय) अशा विविध ठिकाणी ते या काळात काम करत होते. नागालँड, मणिपूर, आसाम, मेघालय व मिझोराम या क्षेत्रात काम करत असताना ते  गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख होते.

        १९७४ मध्ये चौबळ यांची बदली महाराष्ट्र शासनाकडे झाली. त्यानंतर औरंगाबाद विभागाच्या उपमहानिरीक्षक पदावर त्यांची नेमणूक झाली.

       महाराष्ट्र राज्य गुप्त विभागाचे व गुन्हा अन्वेषण विभागाचे उपमहानिरीक्षक, पुण्याचे व बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त, लाचलुचपत विरोधी विभागाचे संचालक अशी विविध पदे त्यांनी भूषवली. १९७८ मध्ये महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस महानिरीक्षक (इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस) या सर्वोच्च पदावर त्यांची नेमणूक झाली. ३१ऑक्टोबर१९७९ रोजी ते या पदावरून निवृत्त झाले. सेवा काळातील उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरीबद्दल तसेच कठीण प्रदेशातील उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस पदक, राष्ट्रपतींचे सुवर्णपदक आणि इतर सात पदकांचेही ते मानकरी आहेत.

       महाराष्ट्राच्या राज्यपालांनी चौबळ यांच्या शासकीय ज्ञानाचा व उत्कृष्ट सेवेचा गौरव म्हणून १९८२ ते १९८४ या काळात त्यांची मराठवाडा कृषी विद्यापीठाचे उप कुलगुरू (व्हाईस चॅन्सेलर) म्हणून नेमणूक केली. चौबळ यांची दोन्ही मुले उच्चविद्याविभूषित असून थोरला मुलगा मिलिंद अमेरिकेत वास्तव्यास आहे. तर, धाकटा राजीव याचा अभियांत्रिकीचा व्यवसाय औरंगाबाद येथे आहे. निवृत्तीनंतर चौबळांचे वास्तव्य औरंगाबाद येथे आहे.

- वर्षा जोशी-आठवले

चौबळ, विनायक वासुदेव