Skip to main content
x

दाबके, दत्तात्रेय दामोदर

     त्नागिरी जिल्ह्यातील आसोद हे दत्तात्रेय दामोदर दाबके यांचे मूळ गाव. परंतु त्यांचे वास्तव्य बनारसाला असल्यामुळे त्यांना उर्दू, हिंदी भाषा अवगत होत्या. मॅट्रिकमध्ये असतानाच त्यांना नाटकात भूमिका करायची ओढ लागली. याच काळात त्यांनी उर्दू नाटकांमध्ये कामे केली. नाटकांमध्ये कामे करण्याच्या निमित्ताने ते मुंबईत आले. मुंबईत आल्यावर त्यांना समजले की दादासाहेब फाळके मूकपट काढायच्या खटपटीत आहेत. दाबके नाटकाचा विचार सोडून लगेच फाळकेंना भेटले. फाळकेंनी त्यांची शरीरयष्टी पाहून त्यांना ‘राजा हरिश्चंद्र’मध्ये हरिश्चंद्राची भूमिका दिली. परंतु त्यानंतर फाळके यांच्या लक्षात आले की दाबके यांच्यामध्ये दिग्दर्शनाची क्षमता आहे. त्यामुळे त्यांना साहाय्यक दिग्दर्शक म्हणून नेमले.

     दाबकेंनी दिग्दर्शन व छायालेखन या दोन्ही क्षेत्रात फाळकेंच्या हाताखाली पाच वर्षे उमेदवारी केली. नंतर त्यांनी फाळकेंची साथ सोडली. १९२२ मध्ये त्यांनी द्वारकादास संपन यांच्या कोहिनूर फिल्म कंपनीत दिग्दर्शक व छायालेखक म्हणून नोकरी धरली. नट होण्यासाठी दत्तात्रेय दामोदर दाबके चित्रपटात आले, पण उत्तम छायाचित्रकार म्हणून त्यांनी नाव मिळवले. ट्रिक फोटोग्राफी हा त्यांचा हातखंडा विषय ठरला.

- श्रीराम ताम्रकर

दाबके, दत्तात्रेय दामोदर