Skip to main content
x

डांगे, श्रीपाद अमृत

    श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म मुंबई येथे झाला. श्रीपाद डांगे हे दोन वर्षाचे असतानाच त्यांच्या आईला देवाज्ञा झाली. त्यानंतर त्यांची काकी दगूताई यांनी त्यांचा सांभाळ  केला. दगूताई विधवा झाल्यावर त्यांनी नाशिकला प्रयाण केले ते सात वर्षाच्या लहानग्या श्रीपादबरोबरच. त्यामुळे डांगे यांच्या वयाच्या सातव्या वर्षापासून काकीबरोबर नाशिकला त्यांचे वास्तव्य होते.

डांगे यांचा बालपणीचा काळ सुखात गेला. मात्र आईचे छत्र लहानपणीच हरपल्यामुळे आणि काकीला मूलबाळ नसल्याने त्यांची अतिशय काळजी घेतली जात असे व साहसी गोष्टींपासून त्यांना दूर ठेवले जात असे. काकी त्यांच्या खेळापेक्षा त्यांच्या अभ्यासाची अधिक काळजी करीत असत.

मुंबईला असताना वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी टिळकांची मिरवणूक पाहिली होती. इ.स. १९०८ साली लोकमान्य टिळकांना मंडालेच्या कारागृहात पाठवण्यात आले व स्वदेशी चळवळ दडपली गेली. इ.स. १९१० साली नाशिकमध्ये अनंत कान्हेरे या तरुणाने जॅक्सन या कलेक्टरला गोळी घालून त्याचा वध केला. या प्रमुख तीन घटनांचा डांगे ह्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला. याचाच परिणाम म्हणजे डांगे यांचे पहिले-वहिले महाविद्यालयीन आंदोलन. डांगे विल्सन महाविद्यालयात शिकत असताना बायबलचा तास अनिवार्य करण्यात आला. मात्र धर्मनिरपेक्ष डांगे यांना हे मान्य नव्हते. त्यांनी व त्यांच्या बारा सहाध्यायींनी याविरोधात हरताळ पाळला. याचा परिणाम म्हणून त्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले.

इ.स. १९१९ साली All India Trade Union (आयटक) संस्था स्थापन करण्याचे ठरवले होते व डांगे यांनी त्याचे सर्व काम बघावे, अशी टिळकांची इच्छा होती. डांगे यांनी सुरुवातीपासूनच अनेक चळवळींमध्ये हिरिरीने सहभाग घेतला. त्यातील एक महत्त्वाची चळवळ म्हणजे असहकार चळवळ.  इ.स. १९२२ साली असहकाराची चळवळ मागे घेतल्यावर झारिया येथे आयटकचे अधिवेशन झाले ज्यात डांगे यांचा सहभाग होता. त्याच वर्षी डांगे यांनी कामगार किसान पक्षाची स्थापना करण्यास सुरुवात केली. भारतात स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना झालीच पाहिजे, असे डांग्यांचे स्पष्ट मत होते. १९२२नंतर डांगे यांनी मागे वळून पाहिलेच नाही. एकापुढे एक आंदोलने, अनेक चळवळीतील सक्रिय सहभाग यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य भारले होते.

अन्यायाविरुद्धची चीड हे त्यांच्या राजकारणातील  सहभागाचे मूळ कारण होते. त्याच प्रेरणेने त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला, संप केले, तसेच त्यांनी त्याकरिता तुरुंगवासही भोगला, मात्र स्वत:च्या तत्त्वांना कधीही मुरड घातली नाही. त्यांच्या संपूर्ण जीवनात त्यांनी अनेक संस्थांची महत्त्वाची पदे भूषवली. उदाहरणार्थ, १९५२ साली आयटकचे सरचिटणीस, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते, तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष इत्यादी. अशा प्रकारे डांगे यांचे राजकीय जीवन अनेक महत्त्वाच्या घटनांनी भरलेले होते. त्यांनी कामगारांची साथ आजन्म सोडली नाही. काही काळाने कम्युनिस्ट पक्षाच्या बदलत्या धोरणांमुळे त्यांचा स्वत:चा असा डांगे मतप्रवाह स्वतंत्रपणे उदयास आला, ज्याला ‘डांगे लाईन’ असे संबोधले जाऊ लागले.

डांगे  यांना सोवियत संघाचे राष्ट्रपती निकोलॉय पॉडगोर्नी यांच्या हस्ते सोवियत संघाचा Order  of Lenin हा सर्वोच्च पुरस्कार, तर बल्गेरियातर्फे ‘दिमित्रो लॅरिट’ हा पुरस्कार देण्यात आला.

अगदी सुरूवातीच्या काळातच डांगे यांच्या लेखनाला प्रारंभ झाला. इ.स. १९२१ साली अवघ्या बाविसाव्या वर्षी त्यांचे ‘गांधी विरुद्ध लेनिन’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले व चांगलेच गाजले.

त्यानंतर इ.स. १९२२ मध्ये त्यांनी ‘सोशलिस्ट’ हे इंग्रजी वर्तमानपत्र काढले, तर इ.स. १९२७ मध्ये कानपूर खटल्यामध्ये चार वर्षाचा सश्रम कारावास भोगल्यानंतर कारागृहातील अनुभवांवर आधारित ‘Hell Found’हे पुस्तक प्रकाशित केले. लहानपणापासूनच भाषा आणि इतिहास या विषयांची आवड असणाऱ्या डांगे यांनी देवळीच्या व नंतर नाशिकच्या तुरुंगात ‘भारत: प्राथमिक साम्यवाद ते गुलामगिरी’ या नावाचे,  तर मार्क्सवादी दृष्टीकोनातून ‘प्राचीन इतिहासाची रूपरेषा’ या उपशीर्षकाचे पुस्तक इंग्रजीतून लिहिले, जे १९४९ साली प्रकाशित झाले. १९५५ पर्यंत या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघाल्या.

डांगे यांचे बरेच लेखन अजून अप्रकाशित असल्याचा उल्लेख डॉ. अशोक चौसाळकर यांनी डांगे यांच्या विषयीच्या त्यांच्या पुस्तकात केला आहे. अशा प्रकारे डांगे यांचे ९२ वर्षांचे जीवन हे भावनिक, राजकीय व वैचारिकदृष्ट्या समृद्ध व प्रगल्भ असल्याचे दिसून येते. त्यांचे संपूर्ण जीवन  समाजासाठी वाहिलेले असून लोकसेवेचा वसा त्यांनी कधीही टाकला नाही. दूरदृष्टी असणार्‍या अशा नेत्यांबाबत कवी नारायण सुर्वे म्हणतात-

घनतमात जळता तुम्ही ठेविला दीप

तो अमर जाहला इथे क्रांतीचा स्तूप

शिल्पकार तुम्ही नव्या युगाचे श्रीपाद

कंठात घुमतो अखंड तव जयनाद।

— भावना भालचंद्र बालते

डांगे, श्रीपाद अमृत