Skip to main content
x

देशमुख, स्नेहलता शामराव

     डॉ.स्नेहलता शामराव देशमुख यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. लहानपणापासून त्यांच्या स्वभावात जिद्द आणि मेहनती वृत्ती हे गुण आहेत. हे दोन्ही गुण त्यांना त्यांच्या आईकडून मिळाले. गाण्याची आवडही आईकडून त्यांच्याकडे आली आणि जीवनाकडे बघण्याचा सारा दृष्टिकोन आणि जीवनातील सारी ध्येये व स्वप्ने त्यांना वडिलांकडून प्राप्त झाली, असे म्हटले पाहिजे. स्नेहलताबाईंचे वडील म्हणजे डॉ. श्रीकृष्ण वासुदेव जोगळेकर. शस्त्रक्रियेची (सर्जरीची) पदवी प्राप्त केलेले उत्तम डॉक्टर. मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय व के.ई.एम. रुग्णालय येथे अधिष्ठाता म्हणून यशस्वी कारकीर्द घडवणारा एक कुशल वैद्यकीय प्रशासक. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून स्नेहलताबाईंनी यशाची आणखी उत्तुंग शिखरे पादाक्रांत केली. बाईंचे शालेय शिक्षण व इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीची मुलींची शाळा व रुइया महाविद्यालयातून झाले. त्यानंतर त्यांनी जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. एम.बी.बी.एस.ला त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम आल्या व पुढच्या शस्त्रक्रियेच्या शिक्षणासाठी हक्काने टाटा रुग्णालयामध्ये गेल्या. पण त्यांना प्रवेश नाकारण्यात आला; कारण त्या वेळी कर्करोगावरच्या शस्त्रक्रियेसाठी मुलींना प्रवेश देण्यात येत नसे. स्नेहलताबाईंनी बराच संघर्ष केला; पण त्यांना यश आले नाही. अखेरीस त्यांनी जी.एस.मध्ये अर्भकांवरच्या शस्त्रक्रियेमध्ये पुढचे शिक्षण घेतले. (आता मात्र टाटा रुग्णालयामध्ये मुलींना प्रवेश नाकारला जात नाही.)

     शिक्षण पूर्ण झाल्यावर एक विख्यात शल्यविशारद म्हणून त्यांनी ख्याती मिळवली. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातले अनेक मानसन्मानही प्राप्त झाले. त्यांतील ‘डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार’, १९९८ व ‘धन्वंतरी पुरस्कार’, २००५ हे उल्लेखनीय आहेत. वयाच्या पन्नाशीच्या आसपास त्यांनी वैद्यकीय प्रशासकाच्या क्षेत्रात पाऊल टाकायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी खास दिल्लीला जाऊन वैद्यकीय प्रशासनाचा (हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) अभ्यासक्रम पूर्ण केला. १९९० साली त्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय, म्हणजे ज्या रुग्णालयाच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या वडिलांनी ‘वैद्यकीय अधिक्षक’ म्हणून प्रशासकीय घडी बसवली होती, तिथेच त्या अधिष्ठाता म्हणून रुजू झाल्या.

     आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी रुग्णांना व डॉक्टरांना आवश्यक सुविधा निर्माण करण्याकडे विशेष लक्ष दिले. त्यांच्या कार्यकाळात तिथल्या ‘रिसर्च सोसायटी’च्या कामाला खास प्राधान्य होते. ‘स्तन्य दुधा’ची दुग्धपेढी निर्माण करण्यात त्यांचा पुढाकार होता. ज्या मातांना वैद्यकीय कारणांमुळे आपल्या नवजात अर्भकाला दूध पाजता येत नाही, त्यांना ही ‘दुग्धपेढी’ हे एक वरदान आहे.

     नवजात अर्भकांच्या पाठीवर आवाळू (एक प्रकारची गाठ) असण्याचे प्रमाण धारावीच्या झोपडपट्टीत खूप होते. स्नेहलताबाईंच्या कार्यकाळात लो. टिळक रुग्णालयामधील डॉक्टरांनी या प्रश्‍नावर काम केले व मातांच्या शरीरातील ‘फॉलिक अ‍ॅसिड’च्या कमतरतेमुळे हे घडते, असे सिद्ध केले. त्यानंतर धारावीत गर्भवती महिलांना ‘फॉलिक अ‍ॅसिड’साठीच्या गोळ्या वाटण्यात येऊ लागल्या. त्यामुळे या समस्येचे मोठ्या प्रमाणात निराकरण झाले.

     १९९५ साली मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक धडाडीचे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांतील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर त्या विद्यार्थ्याच्या किंवा विद्यार्थिनीच्या आईचे नावही लिहिणे. अनेक नवे अभ्यासक्रम सुरू झाले. त्यांतील वैद्यकीय प्रशासनासाठीचा सुरू केलेला पदविकेचा अभ्यासक्रम खास उल्लेखनीय. यानंतर स्नेहलताबाई अर्भकांना जन्मत:च येणाऱ्या व्यंगांवर संशोधन करित आहेत. कोणत्या गुणसूत्रांच्या अपकारक जोडणीमुळे अशी व्यंगे येतात, त्यांवर कोणते उपाय करायचे, यावर संशोधन सुरू आहे व असे व्यंग अर्भकामध्ये येऊ नये म्हणून गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी, याबद्दलचे ज्ञान समाजात प्रसृत करण्याचे त्यांनी जणू व्रत घेतले आहे. त्याचबरोबर, ‘ग्रहणांचा अर्भकावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही’, हे त्या सप्रमाण सांगतात व अशा अंधश्रद्धांविरुद्ध समाजात जागृती करीत आहेत.

प्रा. सुधीर पानसे

देशमुख, स्नेहलता शामराव