देशपांडे, बाळकृष्ण गंगाधर
डॉ.बाळकृष्ण गंगाधर देशपांडे हे जगभर ‘बी.जी.’ देशपांडे म्हणून प्रसिद्ध होते. अखेरच्या दिवसापर्यंत कार्यमग्न असलेल्या डॉ.देशपांडे यांना विश्रांतीची गरज कशी भासत नाही, याचे त्यांच्या सहकाऱ्यांना आश्चर्य वाटत असे. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे एम.एस्सी.पर्यंतचे शिक्षण पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात झाले. प्राध्यापक क.वा. केळकर हे त्यांचे गुरू. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली बी.जीं.नी एन.सी.सी.तली शिस्त अंगी बाणवली, त्याचप्रमाणे पुढे ‘गुजरातेतील भूजलाची समस्या’ या विषयावर डॉक्टरेटही मिळवली. ते १९३४ साली एम.एस्सी. झाले, तर १९५२ साली त्यांना पीएच.डी. मिळाली.
एम.एस्सी. झाल्यानंतर ते ‘जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ या संस्थेमध्ये संग्रहालय साहाय्यक म्हणून रुजू झाले. पुढे याच संस्थेत ते भूशास्त्रज्ञ म्हणून काम करू लागले. भूशास्त्रीय सर्वेक्षणाद्वारे भूजलाचे साठे शोधण्यात त्यांनी प्रावीण्य मिळवले. त्यांचे या संस्थेतले कार्य पथदर्शक मानले जाते. त्यांनी सिंध, बलुचिस्तान आणि आताच्या पाकिस्तानातील फार मोठ्या भूभागात भूजल संशोधनाचे कार्य केले. याशिवाय भिलाईच्या पोलाद कारखान्यासाठी लागणारी लोह खनिजे शोधण्याच्या मोहिमेचे ते नेते होते. पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये भूजलाची समस्या सोडविण्याच्या कार्यातही त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला होता.
भारतीय भूसर्वेक्षण विभागातून ते भारतीय खाण विभागात (इंडियन ब्यूरो ऑफ माइन्स) गेले. या संस्थेत काम करताना खनिज कोळसा-ज्याला आपण दगडी कोळसा म्हणतो-त्या कोळशाच्या अभ्यासानिमित्त ते ऑस्टे्रलियात गेले. १९५५ साली जेव्हा ‘तेल व नैसर्गिक वायू आयोगाची’ (ऑइल अॅण्ड नॅचरल गॅस कमिशन ऊर्फ ओ.एन.जी.सी.) स्थापना झाली, तेव्हा बी.जी. ओ.एन.जी.सी.त गेले. त्या वेळी या संस्थेत फारच थोडे भारतीय शास्त्रज्ञ होते, त्यांतील बी.जी. हे एक.
ओ.एन.जी.सी.मध्ये बी.जी. त्यांच्या धडाडीमुळे आणि कार्यक्षमतेमुळे नावाजले गेले. खंबायत, आसाम आणि मुंबईजवळ अरबी सागरामधील खनिज तेलक्षेत्रे शोधून त्यांचा विकास करण्याचे श्रेय बी.जीं.ना दिले जाते. त्यांच्या आग्रहामुळे बडोद्याजवळ तेल शुद्धीकरण कारखाना निर्माण केला गेला. इथे जवळपास तेल सापडणारच हा त्यांचा विश्वास आणि त्यासाठी तेल शुद्धीकरण कारखान्याची आवश्यकता भासेल ही दूरदृष्टी, यांमुळे या भागात तेल सापडताच, त्याच्यावर लगेचच प्रक्रिया सुरू करणे भारताला शक्य झाले. या तेल शुद्धीकरण कारखान्याभोवतीच्या औद्योगिक वसाहतीमुळे गुजरात राज्याच्या औद्योगिकीकरणास चालना मिळाली. ओ.एन.जी.सी.च्या शास्त्रीय सेवाप्रमुख पदावरून बी.जी. इ.स. १९७० साली निवृत्त झाले.
निवृत्तीनंतर त्यांनी पुणे विद्यापीठात भूशास्त्र विभागाचे प्रमुखपद भूषविले. या विभागाच्या विकासाची जबाबदारी उचलल्यावर विभागातील संशोधनास गती मिळाली. भूजल संशोधन, हवाई छायाचित्रांच्या साहाय्याने भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण, तसेच उपग्रहांनी घेतलेल्या प्रतिमांद्वारे भूशास्त्रीय अभ्यास आदी ज्ञानशाखांची सुरुवात त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. त्यांनी स्वत: भूजल संशोधनात महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच विद्यार्थी पीएच.डी. झाले.
निवृत्त होण्याच्या काही काळ आधी बी.जीं.नी कोयनेच्या भूकंपासंबंधी भूकंपपीडित भागात जाऊन एक अहवाल तयार केला. निवृत्तीनंतर ते ज्या तडफेने क्षेत्रपरीक्षण करीत, त्याच तडफेने त्याआधीही ते अत्यंत अवघड जागी कोयनेच्या खोऱ्यात फिरत गेले, तेव्हा बी.जी. निवृत्तीनंतर काय करणार हा प्रश्न ज्यांच्या मनात आला, त्यांना त्यानंतरच्या काळात त्यांनी क्षेत्रपरीक्षणाच्या निमित्ताने केलेल्या भ्रमंतीने उत्तर मिळाले. ‘भूशास्त्रज्ञ हा खुर्चीत दिसता कामा नये, तो कायम फिरता हवा,’ असे ते म्हणत. १९९३-९४ सालांत ते लातूर भागात भूकंपापासून बचाव कसा करावा हे सांगायला स्वखर्चाने हिंडत होते, त्या वेळी ते कृतीनेच उक्ती सिद्ध करतात, हे दिसून आले.
इ.स. १९७१ साली बी.जी. इंडियन सायन्स काँग्रेसच्या भूशास्त्र आणि भूगोलविषयींच्या सत्राचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले, त्या वेळी त्यांनी ‘खनिज तेल आणि भारत’ या विषयावर अध्यक्षीय भाषण केले होते. वेगवेगळ्या निमित्ताने त्यांनी अनेक देशांचा प्रवास केला होता. पुणे विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर ते टांझानियात गेले. दार-एस-सलाम विद्यापीठात त्यांनी भूशास्त्र आणि भूजलशास्त्र विभागांचा विकास केला होता.
इ.स. १९८३ साली बी.जी. पुण्यात परत आले. यानंतर त्यांनी महाराष्ट्र विज्ञानवर्धिनीत भूकंपाचे भाकीत करण्याविषयी संशोधन सुरू केले. ‘प्राण्यांच्या वर्तणुकीचा आणि भूकंपाच्या परस्पर संबंधाचा अभ्यास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. १९८७ साली ‘अकॅडेमिया लिनिका’ या चिनी संस्थेमधील शास्त्रज्ञांशी चर्चा करण्यासाठी ते चीनला गेले. या अभ्यासामधून ‘अर्थक्वेक्स’, ‘अॅनिमल अॅण्ड मॅन’ हे महत्त्वपूर्ण लेखन त्यांच्या लेखणीतून साकारले. यानंतर ते भूकंपाचे स्वरूप समजावून सांगणारी व्याख्याने देत महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांतून हिंडले.
‘महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस’चे ते संस्थापक सदस्य होते. इंडियन सायन्स अकॅडमीचे फेलो असलेल्या बी.जीं.चे नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, सर्व्हे ऑफ इंडिया, बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉटनी, वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी आदी अनेक संस्थांशी जवळचे संबंध होते. केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान खात्याच्या अखत्यारीतील आघारकर संशोधन संस्था या पुण्यातील संस्थेचे ते आजीव सदस्य होते आणि तिथेच ‘प्रोफेसर एमेरिटस’ म्हणून कार्य करीत होते.
वयाच्या सत्तरीत आल्यावर ते संगणक वापरायला शिकले. हिंदी, इंग्रजी आणि मराठीवर त्यांचे प्रभुत्व होते. संगणकयुगात वावरायचे, तर संगणकाचा उपयोग आणि भाषांवरचे प्रभुत्व यांचा उपयोग करून विज्ञान प्रसार करायला हवा, असे ते सांगत असत.
भूज येथे २६ जानेवारी, २००१ रोजी झालेल्या भीषण भूकंपाच्या आदल्या दिवशी या महान भूशास्त्रज्ञाचे निधन झाले.