Skip to main content
x

देशपांडे, हरी नारायण

हाराष्ट्राच्या संगीत रंगभूमीच्या इतिहासात ऑर्गन या वाद्यास मान मिळवून देणारे हरी नारायण देशपांडे यांचा जन्म जावळीच्या खोर्‍यातील बामणोली या खेडेगावात झाला. लहानपणी आई-वडिलांचे छत्र गेले. त्यांचे वडील नारायण हरी देशपांडे यांचा आवाज चांगला होता व ते भजन, अभंग म्हणत. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व पत्नीचे नाव मनोरमा होते.

हरिभाऊंचा आवाज गळी आणि फिरता होता. लहानपणापासून त्यांना गंधर्व कंपनीबद्दल फार आकर्षण होते. सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर, १९२३ साली ते मुंबई येथे बालगंधर्व कंपनीत दाखल झाले.

सुरुवातीस हरिभाऊंनी गंधर्व कंपनीत ‘शापसंभ्रम’, ‘विधिलिखित’, ‘आशानिराशा’, ‘मूकनायक’, ‘मृच्छकटिक’ अशा नाटकांतून छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. कंपनीत आल्यावर संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याचा फायदा पुढे मास्टर कृष्णराव यांच्या मैफलीत ऑर्गनची साथ करताना झाला. मास्तरांची शास्त्रीय संगीताची बैठक व हरिभाऊंच्या ऑर्गनची साथ असे त्या काळात समीकरण होऊन बसले.

याशिवाय मास्तरांच्या गैरहजेरीत गंधर्वांच्या नाटकांतून ते करत असलेल्या सर्व स्त्री-भूमिका व इतरही काही पुरुष भूमिका हरिभाऊ करत असत, उदा. ‘सावित्री’ (नारद), ‘स्वयंवर’ (महाराणी), ‘अमृतसिद्धी’ (मैनावती), ‘कान्होपात्रा’ (शेवंती) ‘विधिलिखित’ (कपिला), ‘एकच प्याला’ (शरद), ‘मृच्छकटिक’ (चेट विट) वगैरे. रुईकर प्रॉडक्शनच्या बाबूराव रुईकर यांनी बालगंधर्वांच्या ‘अमृतसिद्धी’ या नाटकाचे चित्रीकरण केलेले आहे. त्यामध्ये मीरेच्या सासूच्या (मैनावती) स्त्री-भूमिकेत आजही आपण हरिभाऊंना पाहू शकतो व त्यांचे गाणेही त्यात ऐकावयास मिळते.

त्यांनी १९२३ ते १९२७-२८ पर्यंत बालगंधर्वांच्या सर्व नाटकांत स्त्री व पुरुष-भूमिका केल्या. भूमिका करत असताना सोबत विंगेमधील ऑर्गनच्या सुरांवरून ते साथ करीत असत. अशा प्रकारे १९२७-२८ च्या दरम्यान त्यांची बाहेरच्या मुख्य ऑर्गनवर साथीस बसण्यास सुरुवात झाली.

मास्तर कृष्णराव यांच्याप्रमाणेच हरिभाऊंनी नटसम्राट बालगंधर्व,  गंगाधरपंत लोंढे, विनायकबुवा पटवर्धन या तिघांबरोबर  ऑर्गनची साथ केली. यांच्या काही ध्वनिमुद्रिकांतूनही हरिभाऊंची साथ आहे.

कंपनीत असताना त्यांना कृष्णाजी खाडिलकर, गणपतराव बोडस, चिंतोबा गुरव अशा दिग्दर्शकांकडून गद्य संवादांची तालीम मिळाली. गंधर्व कंपनी १९३८ साली बंद पडल्यानंतर त्यांनी पुणे येथे आपले बिऱ्हाड करून पुण्यामधील अनेक हौशी व व्यावसायिक नाट्य संस्थांना व अनेक नामांकित गायक-गायिकांना भास्करबुवा बखले, मास्तर कृष्णराव व बालगंधर्व यांच्या गायकीचे व संगीत नाटकातील गद्य व संगीताचे शिक्षण देण्यास प्रारंभ केला. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालय, पुणे, हुजूरपागा शाळा विद्यार्थिनींचे संगीत शाकुंतल व संशयकल्लोळ, नाट्यकला प्रवर्तक मंडळी, तसेच संध्या थिएटर्स (पुणे) ही त्यांतील काही संस्थांची नावे होत.

शांता मोडक, विमल कर्नाटकी, योगिनी जोगळेकर, माणिक वर्मा, शांता आपटे, इंदिराबाई खाडिलकर, वनमाला, मोहिनी निमकर, मिस लीला इ.ना त्यांनी नाट्यपदांचे मार्गदर्शन केले. न.चिं. केळकरसुद्धा काही काळ त्यांच्याकडे गाणे शिकले.

स्वतंत्र ऑर्गन वादनाची सुरुवात करणारे हरिभाऊ देशपांडे हे पहिले ऑर्गनवादक होत. वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षापर्यंत त्यांचे अनेक ठिकाणी स्वतंत्र ऑर्गनवादनाचे कार्यक्रम झाले. हरिभाऊ देशपांडे यांचे पुणे येथे त्यांच्या मुलाकडे निधन झाले. त्यांचे पुत्र चंद्रशेखर, संजय, अनिल व विष्णू हेसुद्धा ऑर्गन वादक आहेत.

          — संजय देशपांडे

देशपांडे, हरी नारायण