Skip to main content
x

देशपांडे, पुरुषोत्तम यशवंत

     पुरोगामी वृत्तीचे व कृतीचे पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांचा जन्म अमरावतीला झाला. त्यांनी १९२५ साली मुंबई विद्यापीठाची एम.ए. व पुढच्याच वर्षी नागपूर विद्यापीठाची एल्एल.बी. पदवी संपादन केली. १९२५ च्या मे महिन्यात देशपांडे ह्यांचा विवाह विमल दिगंबर कोल्हटकर ह्यांच्याशी झाला. त्या वेळी झालेला हा प्रीतिविवाह भरपूर गाजला. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनीही त्यांचे अभिनंदन केले होते. जीवनातील घटनांचा ज्यांच्या मनावर मूलगामी परिणाम होऊन आपल्याला आलेल्या अनुभवांचे स्वतंत्र दृष्टीकोनातून मूल्यमापन करून त्यांचा मुक्तपणे आविष्कार करण्यास प्रवृत्त झालेल्या त्या वेळच्या नूतन लेखकांपैकी पु. य. देशपांडे हे एक होते. १९२७ साली लिहिलेल्या ‘बंधनाच्या पलीकडे’ या त्यांच्या पहिल्या कादंबरीत एक उत्कट, आत्मनिष्ठ पण विचारशील व्यक्तिमन व ठरावीक सामाजिक आदर्श ह्यांमधील संघर्षाचे चित्रण आहे. त्यांचे समकालीन लेखक श्री. के. नारायण काळे यांनी ‘ज्ञानप्रकाश’मध्ये या कादंबरीवर मार्मिक, वस्तुस्थितीचा यत्किंचितही विपर्यास न करणारे परीक्षण लिहिले.

‘असहकारा’च्या (१९२१) व ‘छोडो भारत’च्या (१९४२) चळवळीत भाग घेऊन देशपांडे यांनी कारावास भोगला होता. वर्‍हाडच्या यूथ लीगचे ते अध्यक्ष होते (१९३१). नंतर प्रांतिक काँग्रेस कमिटीचे चिटणीस झाले. १९४८-१९५२ या काळात देशपांडे मध्य प्रदेशच्या इंटक शाखेचे अध्यक्ष होते. १९३३ ते १९४२ या काळात त्यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव असूनही त्यांची गांधीजींवरील निष्ठा कमी झाली नाही. ‘भवितव्य’ साप्ताहिकाचे संपादन, वकिलीचा व्यवसाय करता-करता त्यांनी वैदिक वाङ्मयाचा व विशेषतः बौद्ध साहित्याचा व्यासंग जोपासला होता. विद्यार्थीदशेत रामकृष्ण परमहंस, स्वामी रामतीर्थ व स्वामी विवेकानंद यांच्या वाङ्मयाचा त्यांच्या मनावर चांगलाच ठसा उमटला.

आधुनिक विचारप्रणालीच्या व्यासंगी देशपांड्यांची वृत्ती अंतर्मुख असून चिंतनशीलता हा त्यांचा स्वभाव होता. ‘गांधीजीच का?’ (१९४४) या ग्रंथात त्यांनी गांधीजींच्या माहात्म्याची मीमांसा केली आहे. ‘सुकलेले फूल’ व ‘सदाफुली’ या त्यांच्या कादंबर्‍या विशेष महत्त्वाच्या आहेत.

‘अनामिकाची चिंतनिका’मध्ये जीवनविषयक चिंतन आहे. या पुस्तकाला साहित्य अकादमीचे (१९६२) पारितोषिक मिळाले. एक प्रकारची बंडखोर पण चिंतनशील स्वच्छंदतावादी प्रवृत्ती त्यांच्या सर्व कादंबर्‍यांत प्रत्ययाला येते. देशपांडे यांचे वाङ्मयविषयक विचार वाङ्मय मंडळांतून, साहित्य संमेलनांतून केलेल्या भाषणांत तसेच ‘नवी मूल्ये’ या निबंधसंग्रहात व्यक्त झाले आहेत. ‘अनुभवामृत रसरहस्य’ तीन खंड (१९६२-१९६५) हे संत ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभववर लिहिलेले निरूपण आहे. ‘द ऑथेंटिक योग’मध्ये पतंजलीच्या योगसूत्रांवर एक अभिनव भाष्य आहे. याचा जर्मन अनुवाद १९७६ साली जर्मनीत प्रसिद्ध झाला. शिवाय ‘भारतीय संस्कृतीला आव्हान’ व ‘सोव्हिएट रशिया आणि हिंदुस्थान’ हे ग्रंथ उल्लेखनीय आहेत.

पॅरिस येथे १९५२मध्ये ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स फॉर कल्चरल फ्रीडम’ या बैठकीला भारतीय संस्कृती मंडळाचे प्रतिनिधी या नात्याने देशपांडे उपस्थित होते. भारतीय प्रतिनिधी म्हणून ते ताश्कंद येथे झालेल्या आफ्रो-आशियाई लेखक परिषदेला गेले होते. विदर्भ साहित्य संघ व इतरही वाङ्मयीन संस्थांचे अध्यक्षपद त्यांना लाभले होते.

- वि. ग. जोशी

देशपांडे, पुरुषोत्तम यशवंत