देशपांडे, वासुदेव नरहर
वासुदेव नरहर देशपांडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील वरूड या गावी झाला. त्यांच्या वडिलांची शेती वाडेगाव येथे होती. मॅट्रिक झाल्यावर पुढील शिक्षणासाठी त्यांनी विदर्भ महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे ते स्वातंत्र्यलढ्यात उतरले, त्यांना तुरुंगवासही झाला. त्यांनी १९४४-१९४५ या काळात शिक्षकी पेशा स्वीकारला.
देशपांडे यांनी शेतीत अनेक प्रयोग व नव्या सुधारणा केल्या. त्यांनी १९७५ मध्ये शेतकरी-शेेतमजूर ही संघटना स्थापन केली व त्या संस्थेचे ते पहिले अध्यक्ष झाले. १९८० नंतर ही संघटना त्यांनी शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत विलीन केली. त्यांनी प्राचार्य हि.ब. ऊलेमाले यांच्याबरोबर महाराष्ट्र संत्रा बागायतदार संघ स्थापन केला. त्यांनी या संघामार्फत विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या समस्या, अडचणी व विक्रीचे प्रश्न वेळोवेळी शासनाला कळवून, त्या संदर्भात चर्चा करून ते प्रश्न सोडवण्याचे अथक प्रयत्न केले. त्यांनी संत्रा फवारणी, विक्री व परदेशी निर्यात हे प्रश्न यशस्वीपणे हाताळले.
केंद्र व राज्य सरकार यांच्याशी चर्चा करून राष्ट्रीय लिंबवर्गीय संशोधन केंद्र (एन.आर.सी.सी.) नागपूरला आणण्यात त्यांना यश मिळाले. त्यांनी १९७० पासून संत्रा परदेशात निर्यात करण्याचे प्रयत्न सुरू केले आणि १९९६-१९९७ या काळात संत्रा निर्यात केंद्र (सिट्रस किंग मँडारीन ऑरेंज संस्था) त्यांनी वरूड येथे उभारले व त्याचे संचालक म्हणून त्यांनी काम सांभाळले. या केंद्रामार्फत त्यांनी इराण, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर या देशांत संत्र्याची निर्यात केली. देशपांडे यांनी १९७५ नंतर एच ४ कपाशी, संकरित ज्वारी सी.एस.एच. १, बाजरी, ज्यूट इत्यादी संकरित बियाण्यांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यांनी सामूहिक बीजोत्पादनाचा कार्यक्रम ५०० एकर जमिनीवर लोकसहभागातून यशस्वीरीत्या राबवला. त्यांनी १९६३-१९६४ मध्ये प्रा. एन.गोपालकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली द्राक्ष लागवड सुरू केली. हा प्रयोग विदर्भात नवीन होता. संत्र्यावरील कोळशी रोग निर्मूलनासाठी १९७९-१९८०मध्ये साबुदाणा भुकटी, तंबाखूचा अर्क व गोमूत्र यांसारख्या सेंद्रिय कीडनाशकांचा वापर करणारे ते पहिलेच शेतकरी होते. त्यांनी १९७१ मध्ये शेती अभ्यासासाठी रशियाचा दौरा केला. त्यांनी संकरित एरंड, सूर्यफूल, गहू, हरभरा इ. पिके यशस्वीरीत्या घेतली. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना १९९८ मध्ये कृषिपंडित ही पदवी मिळाली. तसेच त्यांना वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानतर्फे कृषी निर्यात पुरस्कारही देण्यात आला.