Skip to main content
x

देवधर, प्रभाकर शंकर

      प्रभाकर शंकर देवधर यांचा जन्म पुण्यात झाला असून शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालय ह्या प्रख्यात शाळेत झाले. त्यांनी बी.ई. (टेलिकॉम) ही अभियांत्रिकीमधील पदवी १९५६ साली, पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकून विशेष प्रावीण्यासह मिळवली आहे. इ.स.१९५६ ते १९६२ अशी सहा वर्षे ते संशोधन क्षेत्रात काम करत होते. या दरम्यान, त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आय.सी.एम.आर.) आधिपत्याखालील प्रयोग-शाळेत मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स विभागात काम केले.

      त्यांनी १९६२ साली संशोधन आणि विकास क्षेत्रातील खासगी प्रयोगशाळा स्थापन केली. १९६४ साली तेथील संशोधनावर आधारित ऊर्जाविषयक यंत्राचे उत्पादन आणि विक्री सुरू केली. तसेच तपासणी आणि मोजमापन करणारी विजेवर चालणारी यंत्रे विकसित केली. बँकांकरिता ए.टी.एम. आणि किरकोळ व्यापार क्षेत्रातील आधुनिकीकरणासाठीची यंत्रे, अद्ययावत स्वयंचलित पेट्रोलपंप आणि केबलमधील दोष हुडकून काढणारी यंत्रे ‘अ‍ॅप्लॅब’ या त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीने विकसित केलेली आहेत. देशातच नव्हे, तर परदेशांतही या सर्व यंत्रांना चांगली मागणी आहे, ती त्या यंत्रांच्या उत्कृष्ट दर्जामुळेच. ‘अ‍ॅप्लॅब’ कंपनीचे कारखाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे यांसह देशभरात असून त्यांची वार्षिक उलाढाल जवळपास रु.१५० कोटींच्या वर आहे. ही सगळी कामगिरी देवधरांच्या नेतृत्वामुळेच साध्य झाली आहे. त्यामुळेच त्यांना भारतातील आय.ई.टी.ई. या संस्थेची विशेष फेलोशिप, तसेच आय.ई.ई.ई. या अमेरिकास्थित संस्थेची तहहयात फेलोशिपसुद्धा मिळालेली आहे. याखेरीज ते इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, इंडिया आणि इंडियन अकॅडमी ऑफ इंजिनिअर्सचे फेलो आहेत. ब्रॉडकास्टिंग इंजिनिअर्स सोसायटीनेही त्यांना मानद फेलोशिप दिलेली आहे.

     औद्योगिक क्षेत्रातील या उल्लेखनीय कामगिरीबरोबरच त्यांनी भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आयोगाचे अध्यक्षपद, १९८६ ते १९८८ या काळात भूषविले आहे. १९८८ ते १९९० सालांदरम्यान ते पंतप्रधान राजीव गांधी यांचे इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे सल्लागार होते. १९९२-९३ दरम्यान ते भारत सरकारच्या ब्रॉडकास्ट काउन्सिलचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे, ई.टी. अ‍ॅण्ड टी. या सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय उद्योगाचे ते १९८४ ते १९८९ या कालावधीत अध्यक्ष होते. महाराष्ट्र सरकारच्या मेल्ट्रॉन कॉर्पोरेशनचे अध्यक्षपद त्यांनी १९८२ ते १९८४ या काळात, तर महानगर गॅस लिमिटेड या पाइपद्वारे गॅस पुरविणाऱ्या संयुक्त क्षेत्रातील कंपनीचे त्यांनी १९९६ ते १९९९ या कालावधीत अध्यक्षपद भूषवले आहे. याखेरीज १९८२ ते १९९१ दरम्यान ते राजीव गांधींचे (खासदार ते पंतप्रधान) वैयक्तिक सल्लागार होते. त्यांनी माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात भारतातील जलद गतीने झालेल्या प्रगतीला नावीन्यपूर्ण कल्पना वापरून हातभार लावला आहे.

     १९८३ साली त्यांनी माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील ‘लायसन्स राज’ संपवायला सुरुवात करून दिली. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाची उलाढाल १९८३-८४ सालांमधील १२०० कोटींवरून १९८९-९० सालांत ९४०० कोटींपर्यंत पोहोचली. कारागिरांना प्रशिक्षण देण्याकरिता त्यांनी माहिती तंत्रज्ञान आणि दूरचित्रवाणी या माध्यमांचा वापर करायला सुरुवात केली. त्याकरिता लागणाऱ्या ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओ कॅसेट) निर्मिती त्यांनी ई.टी. अ‍ॅण्ड टी.चे अध्यक्ष असताना केली. वैयक्तिक पातळीवर संगणकाचा वापर वाढावा यासाठी, त्याच्या किमती कमी करण्याकरिता त्यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र शासनाचा मेल्ट्रॉन उद्योग १९८२ साली ३.२ कोटी रुपये तोट्यात होता, तो आपल्या कौशल्याने १९८४ साली त्यांनी २२ कोटी रुपयांच्या फायद्यात आणला. अशी त्यांची कामगिरी असल्यामुळे त्यांना अमेरिकेच्या आय.ई.ई.ई.ने ‘इंजिनिअरिंग मॅनेजर ऑफ द इयर १९९०’ या पुरस्काराने गौरवले. आजतागायत हा पुरस्कार मिळवणारे ते अमेरिकेबाहेरील एकमेव नागरिक आहेत. तसेच त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल ठाणे मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव केला आहे.

     १९९६ साली जेरुसलेम (इस्रायल) येथे भरलेल्या जागतिक मराठी परिषदेच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. तसेच जागतिक मराठी अकादमीचे ते १९९७ ते १९९९ या काळात अध्यक्ष होते. त्याच कालावधीत ते महाराष्ट्र इकनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचेही अध्यक्ष होते. १९९६ ते २००० या काळात ते नवी दिल्ली येथील ऑल इंडिया कौन्सिल फॉर एज्युकेशन टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष होते. नागपूर येथे भरलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या चौतिसाव्या विज्ञान अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे आणि २००० सालापासून ते मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. २००५ सालापासून ते भारत-चीन इकॉनॉमिक आणि कल्चरल कौन्सिलच्या अध्यक्षपदी आहेत.

     वेळोवेळी असंख्य भाषणे आणि शेकडो लेखांद्वारे प्रबोधन करणाऱ्या देवधर यांनी इलेक्ट्रॉनिक्स विषयावर १९७९ साली एक पुस्तक लिहिले आहेच; पण त्याशिवाय दिल्लीतील अनुभवावर आधारित ‘कॅपिटल पनिशमेंट’, दूरचित्रवाणीचा शैक्षणिक उपयोग करण्यासाठीचे ‘थर्ड पेरेंट’, आणि ‘इज एनिवन आउट देअर’, अशी तीन पुस्तके लिहिली आहेत. त्यांतील ‘थर्ड पेरेंट’चा मराठी अनुवादही पुस्तकरूपाने प्रकाशित झाला आहे.

दिलीप हेर्लेकर

देवधर, प्रभाकर शंकर