Skip to main content
x

डिखोळे, नामदेव बळीराम

             सातत्याने प्रदर्शने करणारे विदर्भातील निसर्गचित्रकार म्हणून नामदेव बळीराम डिखोळे प्रसिद्ध आहेत. डिखोळे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील क्रांतिकारकांची यावली, येथे झाला. आई रखमाबाईंकडून डिखोळेंना कलेचा वारसा मिळाला. त्यांनी रॉबर्टसन हायस्कूल, हिंगणघाट येथून १९४१ मध्ये मॅट्रिक झाल्यावर नागपूरच्या नागपूर स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी १९४४ मध्ये कलाशिक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण करून कीटकशास्त्र विभागात फील्डमन या पदावर नोकरी केली. त्यांनी लवकरच १९४५ मध्ये सेवासदन शाळेत शिक्षकाची नोकरी सुरू केली. १९६३ मध्ये महाराष्ट्र कला विद्यालयाची उभारणी करून त्याच शाळेचे प्राचार्यपदही त्यांनी सांभाळले. त्यातून कलेचे प्राथमिक धडे गिरविलेले अनेक विद्यार्थी, कलाशिक्षक  कलाक्षेत्रात स्थिरावलेले आहेत. या कला विद्यालयाचा १९९७ मध्ये सुवर्ण महोत्सव साजरा झाला. या काळात त्यांनी निसर्गचित्रणाचा व्यासंग सुरू ठेवला व ते सातत्याने चित्रांची प्रदर्शने करू लागले व त्यातून ‘प्रदर्शने करणारा चित्रकार’ अशी डिखोळेंची ओळख नागपूरकरांना झाली.

             मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून १९५२ मध्ये पदविका प्राप्त झाल्यावर त्यांना चित्रकार दत्तात्रेय दामोदर देवळालीकर आणि विनायक शिवराम मसोजी यांचे मार्गदर्शन मिळाले. हळदणकरांकडून रंगांची पारदर्शकता शिकत पारदर्शक शैलीत त्यांनी अनेक चित्रे काढली. पुढे वाराणसी (१९५३), कलकत्ता (१९५४, १९५८), मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी (१९५८) येथे त्यांनी प्रदर्शने केली. हैदराबाद आर्ट सोसायटीचा, १९८२ चा पुरस्कार आणि ललित कला अकादमी, दिल्लीच्या त्रैवार्षिक राष्ट्रीय कला मेळाव्यातील १९७८, १९८२, १९८६ व १९९१ मधील सहभाग डिखोळेंच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला.

             मसोजींच्या प्रभावातून केलेल्या ‘अंबाझरी’ आणि ‘नागनदी’ या चित्रांतून नागपूरचे पन्नास वर्षांपूर्वीचे स्वरूप लक्षात येते. ‘वांद्य्राचा समुद्रतट’, ‘वरळीचा डोंगर’, ‘अजिंठा’, ‘गोव्याचे चर्च’, ‘रूरकी’ इ. निसर्गचित्रे भव्यतेचा आभास देणारी आहेत.

             डिखोळेंचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रांच्या मागे तपशील, स्थळ, दिनांकांच्या नोंदी ते आवर्जून करतात. प्रवासांतील अनेक बारीकसारीक नोंदींतून त्यांचे ‘कला क्षेत्रात गेली ५५ वर्षे’ या नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. कागदाचा एकही तुकडा फुकट न घालवता त्याचा चित्र काढण्यासाठी किंवा माउण्टिंगसाठी उपयोग करावा असा डिखोळेंचा आग्रह असतो व त्याप्रमाणे ते स्वत:ही  वागतात. मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली, हैद्राबाद, जमशेटपूर, काठमांडू, पुणे, उदयपूर, वाराणसी, गोवा आणि विण्डसर (ऑस्ट्रेलिया) येथे आपल्या निसर्गचित्रांची प्रदर्शने डिखोळेंनी केली आहेत.

             ‘ऑल इंडिया फाइन आटर्स अ‍ॅण्ड क्राफ्ट’ या दिल्लीतील संस्थेने निसर्ग चित्रकार डिखोळेंना ज्येष्ठ चित्रकार (व्हेटरन आर्टिस्ट) पुरस्कार देऊन गौरविले. सुरुवातीला वास्तववादी निसर्गचित्रे करणार्‍या डिखोळेंची शैली पुढे दृक्प्रत्ययवादी झाल्याचे दिसून येते. यातूनच ‘बारादृक्प्रत्ययवादी चित्रे’, ‘पेंटिंग्ज आणि लाइनोकट’, ‘परागभूमी’, ‘चित्रकलेचे रसग्रहण’ इत्यादी पुस्तिका त्यांनी प्रकाशित केल्या.

             विदर्भातील कलावंत व कलारसिकांसाठी ‘विदर्भ आर्ट सोसायटी’ची सुरुवात त्यांनी प्रा.वसंत परब यांच्या सोबत केली. कलाक्षेत्रातील योगदानासाठी २००८ मध्ये राज्य कला प्रदर्शनाचे निमित्त साधून महाराष्ट्र शासनाने डिखोळेंचा सन्मानपूर्वक सत्कार व त्यांच्या निवडक चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते.

- विकास जोशी

डिखोळे, नामदेव बळीराम