Skip to main content
x

दलवाई, हमीद उमर

      मीद दलवाई यांचा जन्म कोकणातील मिरजोळी येथे मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला. कोकणी मुस्लिम म्हणून मराठी भाषेतून शिक्षण झाले. पुढे मेहरुन्निसा खान यांच्याशी लग्न झाले. त्यांची भाषा उर्दू तरीही स्वतःच्या दोन्ही मुलींना मराठीतूनच शिक्षण देण्याचा आग्रह त्यांनी धरला. राष्ट्र सेवा दल, ‘साधना’ परिवार, साने गुरुजी आणि राम नारायण लोहिया यांचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यामुळे मुस्लिम धर्मातील कर्मकांडावर विचार करावासा त्यांना वाटू लागला. नुसता विचारच नव्हे, तर आचारही त्यांनी केला हे विशेष. ते पुरोगामी विचारांचे होते. स्वतःचे लग्न हुंडा न देता, न घेता नोंदणी पद्धतीने केले. कुटुंबनियोजन केले. ‘मुसलमानांची आर्थिक स्थिती सुधारली, तर जातीय तणाव खूप कमी होतील’ हे त्यांचे मत होते. मुस्लिम समाज आणि संस्कृती यांचा अभ्यास करण्यासाठी ते भारतभर फिरले आणि २२ जून १९७० मध्ये विचारांती त्यांनी ‘मुस्लिम सत्यशोधक समाजा’ची क्रांतिकारी स्थापना केली. सार्वजनिक क्षेत्रातील धर्माचे महत्त्व कमी केले पाहिजे, जबानी तलाक रद्द झाला पाहिजे, सवत बंदी कायदा हवा, समान नागरी कायदा हवा असे म्हणत त्यांनी या संस्थेतर्फे मुल्लांचा धिक्कार केला. त्यासाठी मुस्लिम महिलांचा पहिला ऐतिहासिक मोर्चा हमीद यांच्या नेतृत्वाखाली आयोजित झाला.

‘इंडियन सेक्युलर सोसायटी’चेही ते उपाध्यक्ष झाले. १९७३मध्ये तलाकपीडित मुस्लिम स्त्रियांची त्यांनी पुण्यात परिषद घेतली. ‘मुस्लिम सोशल रिफॉर्म्स’च्या सभा घेतल्या. ‘बोले तैसा चाले’ ही त्यांची वृत्ती असल्यामुळे शेवटच्या दुखण्यात त्यांनी मृत्युपत्र केले. त्यात ‘माझ्या शरीराचं दफन वा दहन करू नये. विद्युतदाहिनीत ते नष्ट करावं. कोणताही विधी करू नये,’ आदी पुरोगामी (सुधारणावादी) सूचना  त्यात होत्या. मुस्लिम समाजातील गोपाळ गणेश आगरकर’ असे त्यांचे सार्थ वर्णन करता येईल.

ते स्वतः लेखक, कलाकार होते. त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात पडले आहे. काही काळ त्यांनी ‘मराठा’मध्ये पत्रकारिता केली. ‘रेल्वे’त सेवा केली. पुढे त्यांनी संपूर्ण वेळ समाजकार्याला वाहून घेत त्या संदर्भात त्यांनी लिखाण केले. मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ हे इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिले. १९६५मध्ये लिहिलेली त्यांची ‘इंधन’ कादंबरी अनेक संदर्भात गाजली. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळवणार्‍या या पुस्तकाला मुस्लिम समाजाने फार विरोध केला. या पुस्तकाआधी त्यांनी १९६१मध्ये ‘लाट’ हा कथासंग्रह काढला. खेड्यातील मानसिकता, अंधश्रद्धा, रूढी यांचे प्रभावी आणि विचार करायला लावणारे चित्रण या कथांतून त्यांनी केले. मराठी-मुस्लिम बोलीचा खास वापर असलेले त्यांचे लेखन आगळेवेगळे ठरले. ‘मुस्लिम जातीयतेचे स्वरूप, कारणे आणि उपाय’ (१९७८), ‘इस्लामचे भारतीय चित्र’ (१९८२) अशी वैचारिक पुस्तकेही त्यांच्या नावावर आहेत. त्यांना त्यांच्या कार्याबद्दल ‘फाय फाउंडेशन’ चा सन्माननीय पुरस्कार लाभला.

आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदार्‍या (भाऊ-बहीण यांचे पोषण) पार पाडत त्यांनी लेखक, विचारवंत म्हणून ऐतिहासिक कार्य, प्रबोधन व जागरण केले. ‘आम्ही दुसरा हमीद दलवाई उभा करू शकलो नाही हे दुर्दैव’ असे त्यांच्या पत्नी मेहरुन्निसा यांनी आत्मकथनात म्हटले आहे; ते खरेच आहे. ते होणे गरजेचे आहे; इतकी हमीद दलवाई ही व्यक्ती महत्त्वाची होती.

- प्रा. सुहासिनी कीर्तिकर

दलवाई, हमीद उमर