Skip to main content
x

दस्तूर, फिरोझ बेजनजी

         फिरोझ बेहरामजी दस्तूर यांचा जन्म मुंबईत, एका पारसी कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव जेरबाई असे होते. फिरोझ यांचे मूळ नाव फर्दुनजी असे होते. वडील बेजनजी यांना संगीताची आवड व जाणही चांगली होती. ते बिलिअर्डगृह चालवीत असत. आपला पुत्र फर्दुनजी याने उत्तम गायक व्हावे व नावलौकिक मिळवावा अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यानुसार त्यांनी फर्दुनजी यांना गाण्याच्या नियमित शिक्षणासाठी  पं. कृष्णराव जावकर यांच्याकडे पाठविले.
    
देखणे रूप व मधुर आवाज लाभलेल्या फर्दुनजी यांना त्या वेळचे चित्रपटनिर्माते जे.बी. वाडिया यांनी १९३२ साली आपल्या चित्रपटांतून भूमिका करण्यासाठी पाचारण केले व मूळचे फर्दुनजी असलेले आता फिरोझया चित्रपटसृष्टीतील नावाने ओळखले जाऊ लागले. त्या वेळी त्यांचे वय तेरा वर्षांचे होते.
   त्या काळी पार्श्वगायनाचे तंत्र विकसित झालेले नसल्याकारणाने व फिरोझ दस्तूर यांचा आवाज अत्यंत मधुर असल्यामुळे वाडिया यांच्या अनेक ऐतिहासिक व पौराणिक चित्रपटांतून उदा. लाले-यमन (१९३३), गुल--बकावली (१९४८), वामन अवतार इ. चित्रपटांतून त्यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. या विविध चित्रपटांतून त्यांनी गायलेल्या गीतांपैकी काही गीते त्या वेळी फारच लोकप्रिय ठरली होती. एकूण चित्रपटसृष्टीने त्यांना बालवयातच खूप लोकप्रियता मिळवून दिली.
    चित्रपटसृष्टीत नाव कमविल्यानंतरही त्यांच्यातला गायक त्यांना स्वस्थ बसू देईना. परिणामी, आपल्या व वडिलांच्याही स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने त्यांनी रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्वांसारख्या किराणा घराण्याच्या एका महान व अत्यंत लोकप्रिय गायकाकडून शास्त्रीय संगीताची तालीम घेण्यास सुरुवात केली. रामभाऊंनी त्यांना सुमारे पाच वर्षे पक्की तालीम दिली व फिरोझजीही स्वतंत्र कार्यक्रम करू लागले. सवाई गंधर्व यांना १९४२ साली अर्धांगवायूचा झटका आला व १९५२ साली त्यांचे पुणे येथे निधन झाले. त्यानंतर फिरोझ दस्तूर यांना पं. बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी यांच्याकडूनही काही काळ मार्गदर्शन प्राप्त झाले.
    अशा रितीने प्रथम श्री. जावकर, त्यानंतर सवाई गंधर्व व शेवटी पं. कपिलेश्वरी बुवा या तीन मातब्बर गानगुरूंकडून त्यांना शास्त्रीय संगीताची तालीम प्राप्त झाली. हे तिघेही गुरू उ. अब्दुल करीम खाँ साहेबांचेच शिष्य होते. . अब्दुल करीम खाँ यांची आठवण ते आपल्या गायनातून, विशेषतः ठुमरीच्या आर्त स्वरोच्चारांतून करून देत. सवाई गंधर्व संगीत महोत्सवातील त्यांचे दरवर्षीचे गायन गोपाला मेरी करुणा क्यूं नहीं आवेया भजनाच्या फर्माइशीशिवाय पूर्ण होत नसे.
    मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात त्यांनी सलग ३६ वर्षे किराणा घराण्याचे प्राध्यापक गुरू म्हणून काम केले होते. त्याशिवाय त्यांच्या निवासस्थानीही विद्यार्थी-विद्यार्थिनींना ते शास्त्रीय संगीत शिकवीत असत. त्यांनी विविध रागांत रचलेल्या सुमारे पन्नास चिजा, तसेच दुर्गामल्हार व चंद्रमुखी या दोन स्वतंत्र रागांची निर्मिती त्यांच्या सर्जनशीलतेची साक्ष देणार्या आहेत.
   भारतात, तसेच परदेशांतही त्यांचे कार्यक्रम झाले. कराची येथे १९३९ साली त्यांची प्रथम मैफल झाली. ते १९३३ ते १९९५ पर्यंत आकाशवाणीवर नियमितपणे गायन करत. अच्युत अभ्यंकर, सुधा दिवेकर, श्रीकांत देशपांडे, मिलिंद चित्ताल, गिरीश संझगिरी, चंद्रशेखर वझे इ. शिष्यवर्गही त्यांनी तयार केला.
    पं. फिरोज दस्तूर यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताबद्दलचा १९८७ चा संगीत नाटक अकादमीपुरस्कार, मध्य प्रदेश सरकार पुरस्कृत तानसेन सन्मानपुरस्कार, दक्षिण गुजरात विद्यापीठ, सुरत यांच्यातर्फे सन्माननीय डॉक्टरेटसन्मान हे दोन्ही १९८८ साली, तसेच महाराष्ट्र गौरवपुरस्कार असे सन्माननीय  पुरस्कार प्राप्त झाले. अविवाहित असलेल्या पं. फिरोझ दस्तूर यांचे मुंबईत निधन झाले. त्यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांनी त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले.

अच्युत अभ्यंकर

संदर्भ
संदर्भ :
नाडकर्णी, मोहन; ‘द ग्रेट मास्टर्स, प्रोफाइल्स इन हिंदुस्थानी
क्लासिकल व्होकल म्यूझिक’; हार्पर कॉलीन्स पब्लिशर्स, इंडिया;
१९९९.
दस्तूर, फिरोझ बेजनजी