Skip to main content
x

ढमढेरे, शिवाजी धोंडिबा

     शिवाजी धोंडिबा ढमढेरे यांचा जन्म खडकवासल्या जवळील सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या खडकवाडी या छोट्या गावात झाला. एकत्र कुटुंब असलेल्या ढमढेरे घराण्याचा शेती हाच व्यवसाय होता. शिवाजी ढमढेरे यांचे सुरुवातीचे शिक्षण व्हालेंटरी शाळेत झाले. त्यांच्या गावात चौथीपर्यंतच शाळा होती. त्यामुळे ते पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले. पुण्यात महानगरपालिकेच्या एक नंबरच्या शाळेत त्यांनी पाचव्या इयत्तेत प्रवेश घेतला. नंतर त्यांनी सरस्वती विद्यामंदिरमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. शाळेत असताना ते कब्बडीसारख्या मैदानी खेळात भाग घेत. तसेच त्यांनी एन.सी.सी. मध्येही भाग घेतला होता.

     पुढे त्यांनी मॅट्रिक झाल्यावर सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. इंटर सायन्समध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे त्यांनी शिक्षण सोडून दिले. आणि काँग्रेस सेवादल व अन्य सामाजिक कामात लक्ष घालायला सुरुवात केली. त्यांना हेच काम मनापासून आवडत होते. संचलनात भाग घेणे, बौद्धिक ऐकणे, लहान-मोठी समाजसेवेची कामे करणे या गोष्टी ते करू लागले. सेवादलातील कार्यकर्ते म्हणून त्यांच्या नावापुढे भाई ही उपाधी लागली. ते शिवाजीभाई म्हणून ओळखले जाऊ लागले. भाई 1969 साली पुणे नागरी सहकारी बँकेचे संचालक म्हणून निवडून आले. त्यांनी पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेचे संस्थापक सदस्य व अध्यक्ष म्हणूनही कार्य केले. भाईंची 1972-1974 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण समितीवर स्वीकृत सभासद म्हणून निवड झाली. त्यांनी 1974 साली नगरपालिकेची निवडणूक लढवली व ते निवडून आले. त्यांनी 1979 ते 1984 या काळात पुणे अर्बन बँक आणि महानगरपालिका या दोन्ही जबाबदार्‍या यशस्वीपणे सांभाळल्या. भाईंना 1982-1983 मध्ये पुण्याचे उपमहापौर होण्याची संधी मिळाली. त्याच काळात पुण्यातील सातारा रोडवरच्या भुलेश्वर हौसिंग सोसायटीची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. ते त्या सोसायटीचे अध्यक्षही आहेत.

     भाई 1968-1969 मध्ये सहकारी चळवळीकडे वळले. पुण्यातील धनकवडी भागातील नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते. तसेच त्यांनी अखिल भारतीय मराठा शिक्षण मंडळाच्या नियामक मंडळाचे सदस्य म्हणूनही कार्य केले. ते 1969 पासून आजतागायत पुणे नागरी सहकारी बँकेचे संचालक आहेत. अनेक वर्षे ते या बँकेच्या अध्यक्षपदीही होते.  त्यांनी 1985 ते 1990 या काळात दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालकपदी कार्य केले. ते 1978 ते 1990 या काळात पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सभासद होते. भाईंना पुण्यातील जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने 2001 सालचा ‘पुणे गौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले व जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

    - संपादित

     ढिकले, उत्तम नथुजी

     संस्थापक

     10 फेब्रुवारी 1940 

     उत्तम नथुजी ढिकले यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील विंचुर या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण विंचुर येथेच झाले. त्यानंतर त्यांनी बी. ए. ऑनर्स केले आणि एलएल. बी. ची पदवीही प्राप्त केली. ढिकले 1967 साली वयाच्या 27 व्या वर्षी नाशिक नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले. ते 1967 ते 1980 या कालावधीत नाशिक नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. त्यांची 1971 मध्ये नाशिक जिल्हा काँगेस कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. ते 1980 पर्यंत या पदावर होते. त्यांची 1974-1975, 1982-1983 व 2007-2008 या तीन वर्षात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. याच बँकेत त्यांनी 35 वर्षे संचालकपद सांभाळले. त्यांनी 1980 ला नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्षपद भूषविले. त्यांनी 1984-1990 व 1997-1998 या काळात नाशिक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. ते या कारखान्याचे 22 वर्षे संचालक होते. त्यांनी 2003 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रादेशिक निवड मंडळाचे अध्यक्षपद सांभाळले. त्यांनी 1998 ते 2003 या काळात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालकपदाचा भारही समर्थपणे पेलला. त्यांची 1995 ते 1996 या वर्षी नाशिक महापालिकेच्या अपक्ष महापौरपदी निवड झाली. ते 1992-1997 मध्ये पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांची 1999 ते 2004 या 13 व्या लोकसभेत नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना खासदार म्हणून निवड झाली. नंतर ते 2009 च्या 12 व्या विधानसभेत नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेचे आमदार म्हणून निवडून झाले.

     ढिकले यांनी केलेले सामाजिक कार्यही महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी पंचवटी सार्वजनिक वाचनालय, पंचवटी सेवाभावी संस्था, पंचवटी कला व क्रीडा मंडळ, पंचवटी नागरी पतसंस्था, पंचवटी महिला औद्योगिक सेवाभावी संस्था, पिंपरी सिद्रथ कृषी विकास संस्था या संस्थांच्या स्थापनेत लक्षणीय सहकार्य केले. नाशिक जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर ढिकले यांनी मोर्चे काढले, आंदोलने केली, सत्याग्रह केले. तसेच ते शेतकर्‍यांच्या आंदोलनात सहभागी झाले. त्यासाठी दहा दिवसांचा कारावासही त्यांना भोगावा लागला. त्यांचा आळंदी धरणाची निर्मिती करण्यात सिंहाचा वाटा होता. वालदेवी धरणासाठी ढिकले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 दिवसांचा सत्याग्रह केला. नाशिक-सिन्नर-इगतपुरी तालुक्यात ऊस लागवडीचे महत्त्व शेतकर्‍यांना पटवून देण्यासाठी त्यांनी 32 दिवसांचा पायी 950 कि.मी. प्रवास केला. तेव्हा त्यांनी 123 गावांना भेटी दिल्या. ढिकले यांनी ‘महापौर तुमच्या दारी’ हा 52 आठवड्यांचा महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविला.

     ढिकले हे नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन, नाशिक जिल्हा कबड्डी फेडरेशन व नाशिक जिल्हा तालीम संघ या संस्थांचे अध्यक्ष होते. तसेच  त्यांचा नाशिक जिल्हा ग्रंथालय चळवळीत महत्त्वपूर्ण सहभाग होता. सध्या ते नाशिक जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

     ढिकले यांनी 1975 मध्ये जपान, तैवान, थायलंड, हाँगकाँग, मलेशिया, सिंगापूर या देशांना भेटी दिल्या. ढिकले 1995 मध्ये महापौर पर्यावरण परिषदेसाठी सिंगापूरला गेले होते. त्यांनी 2000 साली  ऑस्ट्रेलिया व न्युझीलंड या देशांचे दौरे केले तर आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेसाठी ते 2003 मध्ये दक्षिण कोरियाला गेले होते. ढिकले यांना लिखाणाची आवड असल्यामुळे त्यांनी ‘यश आणि यशच’ हे आत्मचरित्र लिहिले. तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व विकासावरील ‘गल्ली ते दिल्ली’ हेही पुस्तक प्रकाशित झालेले आहे.

     ढिकले यांचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी आहे. त्यांना 1961 साली पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला यावरून याची साक्ष पटते. त्यांना 1984 मध्ये ‘जायंट इंटरनॅशनल’चा आदर्श नागरिक पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी स्थापन केलेल्या पंचवटी सार्वजनिक वाचनालयाला 1983 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. मॉडर्न इंडिया इंटरनॅशनल सोसायटीतर्फे दिल्या जाणार्‍या राष्ट्रीय रत्न शिरोमणी पुरस्काराचेही ते 2003 मध्ये मानकरी ठरले. त्यांना 2008 मध्ये गिरणा गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.

- संपादित

ढमढेरे, शिवाजी धोंडिबा