Skip to main content
x

गायकवाड, व्यंकट विश्वनाथ

        व्यंकटराव विश्वनाथराव गायकवाड यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे झाला. त्यांचे वडील विश्वनाथराव गायकवाड हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे मूळ गाव उमरगा तालुक्यातील आष्टा जहांगीर हे होय. विश्वनाथराव गायकवाड यांनी वकिलीचे शिक्षण घेतलेले असले तरी त्यांचा ओढा शिक्षण क्षेत्राकडे होता. मराठवाड्यात एक आदर्श शिक्षण संस्था म्हणून गणल्या गेलेल्या उमरगा येथील भारत शिक्षण संस्थेच्या स्थापनेत त्यांचा प्रमुख सहभाग होता.

      घरी शेतीवाडी भरपूर असली तरी त्यात त्यांचे मन रमत नव्हते. त्यामुळेच ते पत्नी झिंगुबाईसह आष्टा जहांगीर या खेड्यातून पुणे-हैदराबाद महामार्गावर असणाऱ्या उमरगा या तालुक्याच्या गावी वास्तव्यास आले. त्या वेळी एकत्र कुटुंबपद्धती होती. व्यंकटराव गायकवाड यांच्यासोबत त्यांची भावंडे, चुलत भावंडे असा मोठा परिवार होता. घरात शिक्षणाचे वातावरण होते. वडील स्वत:च भारत शिक्षण संस्थेत होते. आजूबाजूच्या परिसरातील नातेवाइकांची मुले शिक्षणासाठी ते आपल्या घरी आणून ठेवत आणि त्यांचा राहण्या-जेवण्याचा खर्च करीत.

      व्यंकटरावांच्या शिक्षणाचा ओनामा एका खाजगी शाळेतून झाला. मालतीबाई नावाच्या एक ब्राह्मण महिला ती खाजगी शाळा चालवत. त्या शाळेतून त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. पुढे तिसरीला त्यांनी भारत विद्यालयात प्रवेश घेतला. व्यंकट गायकवाड लहानपणापासून हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. चौथीच्या बोर्डाच्या परीक्षेत तालुक्यात त्यांनी पहिला क्रमांक पटकावला. तो यशाचा आलेख कायम ठेवत त्यांनी १९६६मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी भारत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्रवेश घेतला.

      त्या वेळी मॅट्रिकनंतर प्री-युनिव्हर्सिटी कोर्स म्हणजेच पीयुसीचा बारावी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बी.एस्सी. प्रथम वर्षाला प्रवेश मिळायचा. त्यानंतर मग पुढे वैद्यक किंवा अभियांत्रिकीला जाता येत असे. सत्तरच्या दशकात मराठवाड्यात अनेक धरणांची कामे चालू होती. या धरणांची कामे करणारे मराठवाड्याचेच मारुतीराव शिंदे हे पाटबंधारे खात्यात अधीक्षक अभियंता होते. त्यांचे गावही उमरगा तालुक्यातच होते आणि ते व्यंकट गायकवाडांचे मामा होते. मारुतीराव शिंदे ते जेव्हा गावी येत, तेव्हा त्यांच्यासोबत प्रचंड मोठा फौजफाटा असे. सरकारी गाडी, नोकर-चाकर आणि त्यांना मिळणारा सन्मान हे बघून व्यंकटरावांच्या मनात त्या वेळी पहिल्यांदा महत्त्वाकांक्षा चमकून गेली की, आपणही शिंदे साहेबांसारखे इंजिनिअर व्हावे. त्यात व्यंकटरावांचा गणित विषय आवडीचा आणि पक्का होता. अनेकदा त्यांना शंभरपैकी शंभर गुण मिळत त्यामुळे त्यांनी पुढे अभियांत्रिकीला जाण्याचा निर्णय घेतला.

      छत्रपती शिवाजी महाविद्यालयात बी.एस्सी. प्रथम वर्ष उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीला प्रवेश घेतला आणि १९७२मध्ये बी.ई. होऊन ते बाहेर पडले. पुढे एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण होऊन मारुतीराव शिंदे यांच्यासारखे मोठे अधिकारी व्हावे असे त्यांचे स्वप्न होते. परंतु त्या वेळी एम.पी.एस.सी. परीक्षेला बसण्यासाठी एकवीस ते सव्वीस वर्षांची अट होती. त्या निकषात न बसल्यामुळे त्यांना ताबडतोब ती परीक्षा देता आली नाही.

        व्यंकटरावांचे मामा मारुतीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ते पाटबंधारे खात्यात कनिष्ठ अभियंता म्हणून १६जून१९७२ रोजी जायकवाडी प्रकल्प मंडळ, औरंगाबाद येथे आरेखन (डिझाइन) विभागात रुजू झाले. दरम्यानच्या काळात एम.पी.एस.सी.चा अभ्यासही त्यांनी चालू ठेवला. १९७४मध्ये ते एम.पी.एस.सी. उत्तीर्ण झाले आणि सहायक अभियंता-श्रेणी-१ म्हणून त्यांची निवड झाली. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, की त्याच वर्षी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी शून्याधारित अर्थसंकल्प (झीरो बजेट) जाहीर केला होता. पुढे त्यातून मार्ग निघून १९७६मध्ये त्यांची विदर्भात अप्पर पेनगंगा प्रकल्पात नेमणूक झाली. व्यंकट गायकवाड हे सुरुवातीपासून धाडसी आणि झोकून देऊन काम करणारे व्यक्तिमत्त्व असल्याने अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. पुढे व्यंकटरावांची बढती होऊन ते जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाले. त्या वेळी जायकवाडीच्या उजव्या कालव्याचे काम सुरू होते. परंतु गेवराईजवळच्या जातेगावाजवळ कठीण खडकामुळे काम रखडले होते. अधिकारी वैतागून गेले होते. ते अधिकारी रजेवर गेल्यामुळे वरिष्ठांनी ती जबाबदारी व्यंकटराव यांच्यावर सोपविली. व्यंकटरावांनी अवघ्या तीस दिवसांत ते काम पूर्ण करून दाखवले. तेव्हापासून त्यांच्या नावाची प्रशंसा पाटबंधारे खात्यात सुरू झाली.

        १९८३मध्ये व्यंकटरावांची बदली नांदेडला विष्णुपुरी प्रकल्पात कार्यकारी अभियंता म्हणून झाली. विष्णुपुरी प्रकल्प म्हणजे आशिया खंडातील सर्वांत मोठी उपसा सिंचन योजना म्हणून तिचा गवगवा झाला होता. इतके मोठे काम पूर्वी महाराष्ट्रात झाले नसल्याने पाटबंधारे खात्यापुढेच प्रश्न निर्माण झाला होता. ते आव्हान व्यंकट गायकवाड यांनी समर्थपणे पेलले आणि अतिशय मेहनत घेऊन त्यांनी विष्णुपुरी प्रकल्प पूर्णत्वास नेला. विष्णुपुरी  प्रकल्पम्हणजे पाटबंधारे खात्यातला एक मैलाचा दगड ठरला आहे.

        पुढे राजकीय घडामोडी घडल्या आणि डॉ.पद्मसिंह पाटील राज्याचे पाटबंधारे मंत्री झाले. त्या वेळी उस्मानाबाद जिल्हा सर्वांत जास्त दुष्काळग्रस्त जिल्ह्यांपैकी एक होता. कमी पाऊस, कमी नद्या असलेला भाग असल्याने पाणी साठवण करणे अवघड होते. परंतु आव्हानांचा सामना करणे हा व्यंकटरावांचा स्वभाव  असल्यानेत्यांनी आपल्या चांगल्या अधिकाऱ्यांचा एक गट तयार केला. सांघिक कामावर त्यांचा भर होता. भौगोलिक असमतोलावर मात करून त्यांनी एकेकाळी सर्वांत जास्त दुष्काळग्रस्त असणारा उस्मानाबाद जिल्हा टँकरमुक्त केला. छोट्या छोट्या ओढ्या-नाल्यांवर कोल्हापुरी बंधारे घालून पाण्याचा थेंब नि थेंब अडवून जिल्ह्याचा कायापालट केला. अडचणींचा डोंगर उभा राहिला, पण प्रशासनाचे कौशल्य पणाला लावून व्यंकटराव आणि त्यांच्या अधिकारीवर्गाच्या चिवटपणामुळे लोअर तेरणा, माकणी यांसारखी अनेक मोठी धरणे व अनेक साठवण तलाव निर्माण झाले. दिडशेहून अधिक पाझर तलाव आणि एक हजाराहून जास्त कोल्हापुरी बंधारे या जिल्ह्यात निर्माण झाले. त्यामुळे आजही हा जिल्हा टँकरमुक्तच आहे.

        पुढे व्यंकटरावांना अधीक्षक अभियंतापदी पदोन्नती मिळाली. त्या वेळी त्यांच्याकडे लातूर व बीड जिल्ह्यांचा कारभार होता. तेथेही त्यांनी अनेक प्रकल्पांची उभारणी केली. दरम्यानच्या काळात १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले आणि राजकीय बदलाचे वारे वाहिले. अनेक धोरणात्मक बदल घडून आले. कृष्णा खोऱ्याच्या  पाण्याचा वापर कालबद्ध कार्यक्रम आखून सन २००० पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय झाला. याची अंमलबजावणी व्यंकटरावांनी केली. त्यासाठी खाजगी क्षेत्रातून निधी संकलन करणे आणि चांगल्या अधिकाऱ्यांचा गट तयार करणे अशी प्रशासकीय कौशल्याची कामे त्यांनी केली.

कृष्णा खोरे विकास महामंडळात अधीक्षक अभियंता म्हणून त्यांची पुण्याला बदली झाली. पश्चिम महाराष्ट्रातही त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात असते. ते पाणी धरणात अडवून त्याचे पूर्वेकडील सखल भागात कालव्याचे जाळे निर्माण करण्याचे नियोजन व्यंकटरावांनी केले. त्यांनी आपले प्रशासकीय कौशल्य पणाला लावले. डिंबे धरणाचे रखडलेले काम पूर्ण करून येडेगाव तळ्यात पाणी सोडले. या त्यांच्या प्रशासकीय कामाची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन त्यांना ब्रिज असोसिएशन ऑफ इंडियाचा पुरस्कारही मिळाला.

        कृष्णा खोरे विकास महामंडळात असताना त्यांनी सीना-भीमा या दोन नद्यांना जोडणाऱ्या कालव्याचे काम केले. या नद्या जोडण्यासाठी २० कि.मी. लांबीचा बोगदा तयार करण्याची कल्पना त्यांनी मांडली, त्या वेळी अनेकांनी त्यांची टर उडविली. पण हा २० कि.मी. लांबीचा आशियातील सर्वांत लांब बोगदा तयार करून सीना आणि भीमा नद्या जोडण्याचा उपक्रम त्यांनी यशस्वी करून दाखवला. आज राष्ट्रीय पातळीवर नद्याजोड प्रकल्पांची चर्चा अजून सुरू आहे. परंतु १५-१६ वर्षांपूर्वीच व्यंकटरावांनी ते करून दाखविले आहे. दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यातली वर्षातले दहा महिने कोरडी असणारी सीना नदी बारमाही पाण्याने भरलेली दिसते.

        मुख्य अभियंतापदी पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले. सन २००० मध्ये महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या कोयना प्रकल्पावर त्यांची नियुक्ती झाली. भूकंपग्रस्त असलेल्या कोयना धरणाच्या मजबुतीकरणाचा प्रश्न अनेक दिवस रेंगाळला होता. कारण त्यासाठी धरणालगत सुरुंग घ्यावे लागणार होते. कुणी अधिकारी हे धाडस करीत नव्हते. परंतु व्यंकटरावांनी ते धाडस दाखवून मजबुतीकरणाचे काम यशस्वी केले. त्याचबरोबर त्यांनी मांजरा नदीवर असेच सात बांध घालून वाहून जाणारे पाणी अडविले आहे. पुढे व्यंकट गायकवाड गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक झाले. या वेळी त्यांनी मराठवाड्यातील अनेक रेंगाळलेल्या प्रकल्पांना गती दिली. विशेषत: गोदावरी नदीवर जायकवाडी धरणाच्या खाली नदीत जमा होणारे पावसाचे पाणी वाहून आंध्रप्रदेशात जात होते. ते पाणी अडविण्यासाठी गोदावरीवर अकरा ठिकाणी बांध घालून ते पाणी अडविण्याच्या खास योजनेवर व्यंकटरावांनी अतिशय मेहनत घेतली. त्याचे नियोजन आणि अंमलबजावणी त्यांच्या कार्यालयातच झाली. पुढे त्यांची मंत्रालयात जलसंपदा विभागाच्या मुख्य सचिवपदी नेमणूक झाली, तरी गोदावरीवरील अकरा बंधारे त्यांनी पूर्ण करून घेतले. त्या अकरा बंधाऱ्यांमुळे गोदावरीच्या ४२० कि.मी.च्या पात्रात बारमाही पाणी साठून राहिले आहे. त्यांच्या हातून घडलेले हे आणखी एक ऐतिहासिक कार्य आहे.

        एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी जलसंपदा खात्यात जे काही निर्णय घेतले, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला. मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असताना त्यांच्या असे लक्षात आले होते, की या खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या अनेक वर्षे रखडल्या होत्या. रिक्त झालेल्या जागा भरल्या जात नव्हत्या. त्यामुळे विकास कामांना खीळ बसत होती. त्यांनी पदोन्नत्यांचे आणि बदल्यांचे प्रश्न मार्गी लावून विकासाला गती प्राप्त करून दिली. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना राज्यपालांच्या हस्ते ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ देण्यात आला. त्याचप्रमाणे सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अ‍ॅण्ड पॉवरचा ‘आयपी सिन्हा पुरस्कार’, पुणे इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचा ‘रावबहादूर पुरस्कार’, तसेच प्रेरणा फाउण्डेशनचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.

        त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत शासनाने त्यांच्यावर अनेकदा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. औरंगाबाद येथील वाल्मी संस्थेचे ते अध्यक्ष होते. आर्बिट्रेटर इंडियन काउन्सिलचे सदस्य, भारतीय जलसंपदा संस्था, कोलकाता या संस्थेचे सदस्य अशा विविध शासकीय संस्थांवर त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. ३१ ऑक्टोबर २००९ रोजी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा खात्याच्या सचिव पदावरून ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतरही ते शासनाच्या जलसंपत्ती नियमन प्राधिकरणावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

- विजयकुमार मोरे

गायकवाड, व्यंकट विश्वनाथ