Skip to main content
x

गायतोंडे, सुरेश भास्कर

तबलावादक

 

भाई तथा सुरेश भास्कर गायतोंडें यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली या गावी झाला. त्यांचे वडील हे व्यवसायाने डॉक्टर असून संगीतप्रेमी होते. ते तबला व हार्मोनिअम वाजवीत असत. अर्थातच भाईंच्या शिक्षणाचा श्रीगणेशा त्यांच्या वडिलांकडेच झाला.

भाईंच्या वडिलांनी १९४२ साली कोल्हापूरला स्थलांतर केले, त्या वेळी भाईंचे वय केवळ १० वर्षे होते. त्या काळी कोल्हापूर हे शास्त्रीय संगीताचे माहेरघर म्हणून ओळखले जात होते. भाईंचे वडील संगीतप्रेमी असल्याने कोल्हापुरातील मोठमोठ्या कलाकारांचे त्यांच्या घरी नेहमी येणेजाणे असे. यांमध्ये पं. सुधाकरबुवा डिग्रजकर, पं. रमाकांत बेडगकर, उस्ताद बाळूभाई रुकडीकर इ.सारख्या कलाकारांच्या सतत मिळणार्‍या सहवासामुळे व अमूल्य मार्गदर्शनामुळे भाईंना तबलावादनातील अनेक गोष्टींचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळाले.

सर्व संगीत जगतास गुणिदास’ (गुनिदास) म्हणून परिचित असणार्‍या पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडून भाईंना तालीम मिळाली. भाईंची तालीम गुणिदासबुवांकडे कोल्हापुरातील देवल क्लब येथे सुरू झाली. अखंड आणि डोळस रियाजामुळेच नादसौंदर्य, हाताची तयारी, स्पष्टता, निकासातील सच्चेपणा या बाबतींंत भार्ईंची तबला जगतात एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली.

भाईंची ही तालीम पं. जगन्नाथबुवांच्या निधनापर्यंत म्हणजेच जवळजवळ तब्बल सोळा वर्षे चालली. नंतर भाईंना महान तबलावादक उस्ताद अहमदजान थिरकवा यांच्याकडे तीन वर्षे, तसेच पं. विनायकराव घांग्रेकर यांच्याकडे जवळजवळ दहा वर्षे शिकण्याची संधी मिळाली. पं. विनायकरावांकडून भाई गायतोंडें यांना त्रितालेतर तालातील स्वतंत्र वादनाची तालीम मिळाली. याशिवाय त्यांना पं. लालजी गोखले यांच्याकडेही २००२ पर्यंत शिकण्याची संधी मिळाली. विविध महान गुरूंकडून मिळालेली तालीम, चिंतन, मेहनत, घराणेदार बंदिशींचा खजिना यांमुळे भाईंचे वादन अत्युच्च दर्जाचे बनले.

बहुतेक सर्व बाजांच्या बंदिशींचा समावेश भाईंच्या वादनात दिसून येतो; पण भाईंचे जास्त प्रेम फरूखाबाद घराण्यावर असल्याचे त्यांच्या वादनातून प्रतीत होते.  भाईंच्या वादनातून अर्थातच फरूखाबाद व लखनौचे गततोडे, चक्रदार व परण इ.चा प्रचंड खजिना दिसून येतो.

भाईंच्या वादनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वादनादरम्यान दायाँ बायाँवर कोठेही जबरदस्ती केल्याची पुसटशी शंकाही येत नाही. तबला हे प्रचंड ताकदीचे वाद्य; पण भार्ईंच्या सहजसुंदर वादनातून हे नेहमी प्रतीत होते, की बोलांना ताकद लावून वाजवायचे नसते, तर बोलांमध्ये ताकद असावी लागते. वादनादरम्यान व इतर वेळीही नेहमी प्रसन्न, हसतमुख असणारी मुद्रा हे भाईंचे खास वैशिष्ट्य होय.

व्यवसायाने इंजिनिअर असूनही भाईंनी तबल्याच्या प्रचार व प्रसारासाठी फार मोठे योगदान दिलेले आहे. संपूर्ण भारत, तसेच सिंगापूर, नेपाळ, इंग्लंड, अमेरिका इ. ठिकाणी त्यांनी आपल्या वादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. तबल्यावरील विविध परिसंवाद, चर्चासत्रे, शिबिरे इ.मध्ये त्यांनी संपूर्ण भारतामध्ये विविध विषयांवर सप्रयोग व्याख्याने दिली आहेत.

भाईंनी अनेक महान कलाकारांबरोबर साथसंगत केलेली आहे. यांमध्ये उ. बडे गुलामअली, पं. कुमार गंधर्व, पं. राम मराठे, पं. रत्नाकर पै, पं. यशवंतबुवा जोशी, पं. शरच्चंद्र आरोलकर इ. नावे उल्लेखनीय आहेत.

भाई गायतोंडे यांना सुरसिंगार संसदकडून तालविलास’ (१९९२), स्वरसाधना समितीकडून स्वरसाधना रत्न’ (१९९३), कोकण कला अकादमीकडून कोकण कलाभूषण’, हिंदुस्थानी संगीत कलाकार, बंगळुरू यांच्याकडून नादश्री’ (१९९८), ‘संगीत नाटक अकादमी अवॉर्ड’ (२००३), अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाकडून मानद संगीताचार्य (२००४), संगीत कला केंद्र, आग्र यांच्याकडून संगीत कलारत्न पुरस्कार’ (२००६) असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

आमोद दंडगे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].