Skip to main content
x

गिंडे, केशव लक्ष्मण

बासरीवादक

 

        केशव लक्ष्मण गिंडे यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण बेळगाव, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्गसन महाविद्यालय येथे झाले. १९६४ मध्ये त्यांनी वालचंद कॉलेज, सांगली येथून अभियांत्रिकी पदवी संपादन केली. पन्नालाल घोष यांचे पट्टशिष्य पं. हरिपद चौधरी आणि पं. देवेंद्र मुर्डेश्वर यांच्याकडून पन्नालाल घोषांची वादनशैली त्यांनी गुरुकुल पद्धतीने  शिकून आत्मसात केली.

        वेणुवादन हे समृद्ध, परिपूर्ण व सौंदर्यपूर्ण असावे यासाठी बासरीचे मूळ स्वरूप बिघडू न देता काय करता येईल, याविषयी त्यांचा सतत अभ्यास, संशोधन चालू असते.

         बासरीचे स्वरसप्तक हे बासरीच्या दोन भागांत विभागलेले असते. मुखरंध्रापासून खालील तीन स्वररंध्रे ‘सारेगम’ आणि त्याखाली बासरीची खालील तीन छिद्रे ‘पधनिसा’ अशी असतात. खर्ज तीव्र मध्यमापासून मध्यमापर्यंत गायन, वादनातील तानप्रक्रिया गमक, मींड, स्युंत, घसीट, खटक्या, मुरक्या सहज जमतात. परंतु, पंचम स्वर हा सहा छिद्रे बंद केल्याखेरीज वाजतच नाही आणि पंचम स्वरापासून स्वरानुक्रम खालच्या सहाव्या छिद्रापासून तुटकपणे सुरू होतो. यावर उपाय म्हणून पं. गिंडेंनी बासरीच्या सहा स्वररंध्रांपैकी सर्वांत वरच्या स्वररंध्राच्या वर अंगठ्याने वाजविता येईल असे पंचम स्वराचे स्वररंध्र संशोधिले. पंडितजींनी स्वतंत्र ‘खर्ज’, ‘अतिखर्ज’ बासरी निर्माण केली, जिचे नामकरण त्यांनी ‘श्रीकृष्ण वेणू’ असे केले आणि अतिखर्ज धैवतापर्यंत रागविस्तार जमू लागला. या बासरीची लांबी १२० सें.मी. आणि अंतर्व्यास ३.२ सें.मी. आहे.

          साडेतीन सप्तके एकाच बासरीवर वाजणारी, १२ छिद्रांची, १०७ सें.मी. लांब व २.५ सें.मी. अंतर्व्यासाची ‘केशव वेणू’ बनवली. याची लिम्का बुक ऑफ रेकॉडर्स आणि गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडर्सने दखल घेतली.

         स्व. घोषांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९८९ मध्ये पं. गिंडे यांनी ‘अमूल्यज्योती’ न्यास स्थापन केला. या संस्थेमार्फत गुणी बासरीवादकांना प्रतिवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते.  ‘केशव वेणू’ वादनपद्धती, तसेच पं. घोष यांची वादनशैली येथे विनाशुल्क शिकविली जाते.

          पं. केशव गिंडे यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांपैकी ‘वेणू विद्वान’ पुरस्कार (जगद्गुरू शंकराचार्य, शृंगेरी पीठातर्फे ), ‘वेणू गंधर्व पुरस्कार’ (औंध संस्थानातर्फे), ‘जीवन गौरव पुरस्कार’ (सहारा ग्रूपतर्फे) हे पुरस्कार महत्त्वाचे आहेत.

          पं. गिंडे यांच्या अनेक ध्वनितबकड्या प्रकाशित झाल्या आहेत. देशविदेशांतील विद्यापीठांतून त्यांचे सप्रयोग ‘केशव वेणु’वादनाचे कार्यक्रम झाले आहेत.

शशिकांत चिंचोरे

गिंडे, केशव लक्ष्मण