गोगटे, विश्वास दत्तात्रेय
पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्र या विषयात एम.एस्सी. व डॉक्टरेट संपादन करून विश्वास दत्तात्रेय गोगटे काही काळ पुणे विद्यापीठातच अध्यापन करत. ते १९७८ मध्ये डेक्कन महाविद्यालयात पुरातत्त्व विभागात काम पाहू लागले व तेथूनच २००७ मध्ये निवृत्त झाले. पुरातत्त्वीय संशोधनात निरनिराळ्या वैज्ञानिक पद्धतींच्या वापराचे महत्त्व प्रा. ह. धी. सांकलियांनी ओळखले होते. त्यांच्या या विचारांमधून पुण्यात डेक्कन महाविद्यालयात पुरातत्त्व विभागात जागतिक दर्जाच्या अनेक संशोधन प्रयोगशाळा निर्माण झाल्या. त्यात पुरातत्त्वीय रसायनविज्ञान (Archeological Chemistry) या विषयाला वाहिलेली प्रयोगशाळा वाढवण्याचे महत्त्वाचे काम विश्वास गोगटे यांनी केले.
आपल्या जवळजवळ तीस वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी पुरातत्त्वीय रसायनविज्ञानाच्या अनेक पैलूंवर संशोधन केले. पुरातत्त्वीय रसायनविज्ञान व प्राचीन तंत्रज्ञान या संबंधात त्यांचे भारतीय व परदेशांतील नियतकालिकांत ४५ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.
प्राचीन नाण्यांचा रासायनिक अभ्यास करणे, पुरातत्त्वीय उत्खननांमध्ये मिळणार्या काचेच्या बांगड्या, मणी व काचपात्रे यांच्या तौलनिक रासायनिक विश्लेषणातून त्या वस्तूंच्या उगमाबद्दल निष्कर्ष काढणे व प्राचीन काळातील लोह-तांबे यांच्या निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भात अनुमाने काढणे ही त्यांच्या संशोधनाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. प्राचीन काळातील पर्यावरणात झालेल्या बदलांचा मागोवा घेण्यासाठी राजस्थानातील संशोधनात त्यांचा सहभाग होता. प्राचीन भारतात रौलुटेड वेअर या नावाने ओळखली जाणारी मृद्भांडी कोठे तयार होत व त्यांचा देशात व परदेशात कसा व्यापार चालत असे, या संदर्भात विश्वास गोगटे यांचे संशोधन महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी एक्स-रे डिफ्रॅक्शन पद्धतीचा (XRD Method) वापर करून तुर्कमेनिस्तान, थायलंड, जॉर्डन व श्रीलंका अशा निरनिराळ्या देशांमधल्या मृद्भांड्यांच्या अवशेषांचा अभ्यास केला व प्राचीन व्यापारी संबंधांविषयी महत्त्वाची अनुमाने काढली.