Skip to main content
x

गुंजीकर, रामचंद्र भिकाजी

     रा. भि. गुंजीकर म्हणजेच रामभाऊ यांचा जन्म जांबोरी (जिल्हा बेळगाव) येथे झाला. त्यांच्या वडिलांनी त्यांचा संस्कृत भाषेचा अभ्यास घरीच करून घेतला होता. मराठी प्राथमिक शिक्षण जन्मगावी तर इंग्रजी शिक्षण बेळगाव येथे झाले. १८६० साली ते पब्लिक सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण झाले व पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेले. एल्फिन्स्टन हायस्कूलमधून १८६४ मध्ये ते प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. महाविद्यालीन शिक्षणासाठी त्यांनी नाव नोंदविले, परंतु परिस्थितीमुळे ते उच्च शिक्षणापासून वंचित राहिले.

     ज्या एल्फिन्स्टन हायस्कुलात ते शिकले, तेथेच १८६६ पासून २२ वर्षे त्यांनी अध्यापक म्हणून काम केले. पदोन्नती करीत रामभाऊ असिस्टन्ट डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर झाले. मराठी, संस्कृत, इंग्रजी यांखेरीज बंगाली, उर्दू, कानडी व गुजराती ह्या भाषाही त्यांना चांगल्या अवगत होत्या. स्वभाषा-सेवा हीच स्वधर्मसेवा, असे ते मानत. ‘मित्रोदय’ वर्तमानपत्रात ते लिहीत. ‘विविधज्ञानविस्तार’ मासिक १८६७ मध्ये निघाले. श्री. नाडकर्णी हे त्याचे जाहीर संपादक असले, तरी पहिली सात वर्षे गुंजीकर हेच त्याचे संपादन करीत.

     डेक्कन महाविद्यालयातील रघुनाथ बाळकृष्ण राजाध्यक्ष या विद्यार्थ्याने गोल्डस्मिथच्या ‘गुडनेचर्ड मॅन’चे ‘सुशील गृहस्थ’ या नावाचे केलेले भाषांतर गुंजीकरांनी वाचून त्यात योग्य त्या सुधारणा केल्या. इंग्रजी शिक्षित तरुण उत्कृष्ट परदेशी वाङ्मयकृतींचे मराठीत भाषांतर करीत, तेव्हा गुंजीकर, म. गो. रानडे प्रभृती त्यांना प्रोत्साहन देत. श्री बा. ना. देव म्हणतात, ‘गुंजीकरांच्या मित्रमंडळींत मराठी वाङ्मयाचे अनेक रसिक भक्त, भोक्ते, वाचक व लेखक होते. त्यांच्यात कित्येकदा अनेक लौकिक विषय, प्रचलित लोककार्ये, सार्वजनिक संस्था, सभा, व्याख्याने, वादविवाद ह्यांवर विचारविनिमय होऊन काही उपयुक्त कार्ये निपजली. त्यांतील एक ‘दंभहारक’ हे मासिक होय.’ गुंजीकरांच्या कर्तृत्वाविषयी, ‘गुंजीकरांच्या वाङ्मयावरून, त्यांच्यामध्ये विविधतेप्रमाणे अपूर्वता, स्वाभिमानाबरोबर सत्यप्रेम, शास्त्रीय संशोधक दृष्टी, तशीच आकर्षक सुबोधता, संयमाबरोबर निर्भीडपणा वगैरे गुण आपल्याला दिसून येतात.’  हा अ. का. प्रियोळकरांचा अभिप्राय पुरेसा बोलका आहे. 

     ‘सरस्वतिमंडळ’ या पुस्तकात गुंजीकरांनी महाराष्ट्रातील चित्पावन ब्राह्मणांवर तिखट टीका केली होती. या पुस्तकाने खूप खळबळ उडवून दिली होती. 

     निबंधमालाकार चिपळूणकरांनी गुंजीकरांच्या लेखांची प्रशंसा केली होती. गुंजीकरांनी मराठी भाषिकाला ‘लाघवी लिपी किंवा अतित्वरेने लिहिण्याची युक्ती’ (१८७४) हे पुस्तक लिहून लघुलेखनाची ओळख करून दिली. गुंजीकरांची प्रमुख ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे आहे. ‘मोचनगड’ (कादंबरी १८७१), ‘अभिज्ञानशाकुंतल’ (भाषांतर १८७०), ‘रोमकेतू विजय’ (शेक्सपिअरच्या ‘रोमियो ज्युलिएट’चे भाषांतर १८६९), ‘कौमुदी महोत्साह’ (१८७८-१८७९), ‘सरस्वतिमंडळ’ व ‘भ्रमनिरास’ (१८८४), ‘सौभाग्यरत्नमाला’ (१८८६), ‘विद्यावृद्धीच्या कामी आमची अनास्था’ (व्याख्यान, १८८७), ‘सुबोधचंद्रिका’ (भगवद्गीता टीका, मूळ व भाषांतर), ‘बंगाली व्याकरण’, ‘कानडी भाषा’ (लेख) व इतर अनेक स्फुट लेख, ग्रंथ परीक्षणे.

     स्वभाषेची सेवा हीच स्वधर्मसेवा असे मानणार्‍या मराठी वाङ्मयसेवकांपैकी रा.भि. गुंजीकर हे एक होत.

- वि. ग. जोशी

गुंजीकर, रामचंद्र भिकाजी