Skip to main content
x

हळदणकर, गजानन सावळाराम

           बॉम्बे स्कूलची यथार्थदर्शी वास्तववादी चित्रपरंपरा मुंबईतील १९३६ नंतरच्या प्रयोगशील कालखंडाच्या काळातही नेटाने पुढे नेण्याचे कार्य करणार्‍या प्रमुख चित्रकारांत गजानन सावळाराम हळदणकर यांचा उल्लेख करावाच लागेल. रेखाटन व रंगलेपन या दोन्ही बाबतींत, जलरंग व तैलरंग या दोन्ही माध्यमांत ते अत्यंत धाडसी व जोमदार पद्धतीने काम करीत असत. त्या सोबतच या माध्यमाची वैशिष्ट्ये व तरलताही ते जपत. किंबहुना, बॉम्बे स्कूलच्या त्यांच्या पूर्वीच्या चित्रकारांपेक्षा रंगलेपनात ते घेत असलेले स्वातंत्र्य व ब्रशचा हळुवार व जोशपूर्ण वापर हे त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य होते.

             गजानन हळदणकर हे बॉम्बे स्कूलचे ख्यातनाम चित्रकार सा.ल. हळदणकर यांचे द्वितीय चिरंजीव. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी होते. लहानपणापासून त्यांच्यावर वडिलांच्या पाश्‍चिमात्य यथार्थदर्शी अभिजात कलेचे संस्कार घडले. कलाशिक्षणासाठीही त्यांनी इतर कोणत्याही कलासंस्थेत न जाता त्यांच्या वडिलांनी १९०८ मध्ये सुरू केलेल्या ‘हळदणकर फाइन आर्ट इन्स्टिट्यूट’ येथे शिक्षण घेतले. त्यानंतर ते त्याच कलासंस्थेत शिकवू लागले. सर्व जण त्यांना ‘भाई’ या नावाने हाक मारत. साहजिकच त्यांच्या कलानिर्मितीवर त्यांच्या वडिलांच्या कलाशैलीचा व खास करून जलरंगाच्या हळुवार हाताळणीचा प्रभाव होता. परंतु या सोबतच गजानन हळदणकरांनी वेगळ्या प्रकारे, धाडसी पद्धतीने आपली चित्रशैली विकसित करण्याचे प्रयत्न आयुष्यभर सुरू ठेवले.

             ख्यातनाम असलेल्या सा.ल. हळदणकर यांच्यासारख्या गाजलेल्या व यशस्वी ठरलेल्या कलावंताची कला व गजानन या त्यांच्या मुलाची कला यांत त्या काळात कळत नकळत नेहमीच तुलना होत असणार. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम गजानन हळदणकर यांच्या स्वभावावरही झाला असण्याची शक्यता आहे. ते अत्यंत मृदू व मितभाषी होते आणि प्रत्यक्ष व्यवहारात काहीसा कमी आत्मविश्‍वास असलेले वाटत. पण रंगलेपन करताना मात्र त्यांचा आत्मविश्‍वास, जोम व सामर्थ्य झपाटून टाकणारे असे. परंतु त्या सोबतच त्यांचा स्वभाव लहरी होता व त्यांच्यात एक प्रकारची निष्क्रियताही होती. त्यामुळे त्यांनी एखादे व्यावसायिक काम सुरू केल्यावर ते बराच काळ रेंगाळत राही. त्यामागे गिर्‍हाईक पैसे देणार म्हणून मी माझे स्वातंत्र्य गमवायचे की काय? अशी विचारधाराही असे. परंतु ते आपली मते स्पष्टपणे कधीच व्यक्त करीत नसत.

             ते आयुष्यभर अविवाहित राहिले. त्यांच्या गरजाही अत्यंत कमी होत्या. मध्यम अंगापिंडाच्या, गव्हाळ वर्णाच्या भाईंची राहणी अत्यंत साधी होती. ते पांढर्‍या रंगाचा झब्बा-पायजमा व त्यावर काळे किंवा गडद निळे जाकीट वापरीत. अत्यंत संकोची, बुजरे व मितभाषी असलेले गजानन हळदणकर बोललेच तर हळुवार भाषेत, मृदू आवाजात बोलत. मनस्वी स्वभावामुळे स्वत:चे समाधान होईपर्यंत चित्र रंगवीत बसत. त्यामुळे दीर्घ काळ त्यांची चित्रे पूर्णच होत नसत. त्यांना त्यात सतत काहीतरी सुचत राही व त्यानुसार ते वारंवार पूर्ण होत आलेल्या चित्रातही धाडसाने बदल करीत. अशा वेळी चित्र खराब झाले किंवा तोपर्यंत साधलेला परिणाम पुसला गेला तरी त्यांना त्याची फिकीर नसे.

             वास्तवदर्शी चित्रशैलीच्या मर्यादेत त्यांनी घेतलेले स्वातंत्र्य खरोखरीच खास नोंद घेण्याच्या योग्यतेचे होते. आधुनिक प्रयोगशील चित्रनिर्मितीच्या काळात त्यांची फारशी दखल घेतली गेली नाही. १९३७ नंतरच्या काळात मुंबईत जोमाने वाहू लागलेल्या प्रयोगशील व नवकलेच्या वादळात गजानन हळदणकर वास्तववादी कलेच्या मर्यादेत करीत असलेल्या जोमदार आविष्काराची व प्रयोगशीलतेची उपेक्षाच झाली.

             गजानन हळदणकर यांच्या कलानिर्मितीची व त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची व्यवस्थित नोंद उपलब्ध नाही. परंतु एकूण उपलब्ध पुराव्यांवरून असे दिसून येते, की ते त्यांच्या वडिलांसोबत त्या काळात भारतात भरणार्‍या अनेक प्रदर्शनांमधून आपली चित्रे पाठवीत व या चित्रांचा दर्जा आणि यथार्थदर्शनाच्या मर्यादेत असलेली त्यातील प्रयोगशीलता यांमुळे त्यांना पारितोषिकेही मिळत. त्यांनी केलेल्या व्यावसायिक व्यक्तिचित्रांत सर्वोच्च न्यायालय, मुंबईचे उच्चन्यायालय, दादर येथील डॉ.आंबेडकरांचे तसेच बॉम्बे आर्ट सोसायटीचे सचिव बॅरिस्टर व्ही.व्ही. ओक यांचे व्यक्तिचित्रे विशेष उल्लेखनीय आहेत. या व्यक्तिचित्रांतून प्रयोगशील व सामर्थ्यपूर्ण ब्रशच्या फटकार्‍यांसोबतच त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व साकार होत असताना, जणूकाही त्या कॅनव्हासवर प्रत्यक्ष त्रिमिती स्वरूपात ती व्यक्ती विराजमान झाल्याचा भास होतो. यासाठी त्यांनी वापरलेले रंग, त्यांचे इम्पॅस्टो पद्धतीचे लेपन व रंगांच्या छटांमधील विरोधी रंगभावाचा खेळ विस्मयचकित करणारा आहे.

             जलरंगात, त्यांनी रंगविलेल्या व्यक्तिचित्रांत ते मुक्त व हळुवार आविष्काराच्या कमाल सीमारेषांमध्ये विहार करीत. परंतु हे करीत असतानाच ते रंगवीत असलेल्या व्यक्तीचे साधर्म्य व व्यक्तिमत्त्व समर्थपणे व्यक्त करीत. त्यांची ड्राय पेस्टल माध्यमातील व्यक्तिचित्रेही अत्यंत प्रभावी असून छायाप्रकाशाचा विलक्षण खेळ त्यातून अनुभवता येतो. त्यांची निसर्गचित्रे ही समोरच्या दृश्यांची नोंद करीत नसत, तर क्षणोक्षणी बदलणार्‍या निसर्गाचे स्पंदन चित्रांकित करण्याचा त्यात प्रयत्न दिसे. साहजिकच काही वेळा ते अत्यंत यशस्वी होत, तर काही वेळा अत्यंत प्रगल्भ आविष्काराच्या खुणा मागे ठेवत त्यांचे चित्र अपुरे राही. त्यांनी काही ऐतिहासिक व सामाजिक विषयांवरील प्रसंगचित्रेही रंगविली.

             पूर्ण झालेल्या चित्रावर ते ‘ग.सा.ह.’ अशी आपल्या नावाची आद्याक्षरे असलेली सही आयुष्याच्या उत्तरार्धात करीत, तर आयुष्याच्या पूर्वार्धात ‘जी.एस. हळदणकर’ ही सही इंग्रजीत करीत. परंतु बर्‍याचदा त्यांच्या चित्रांवर सही नसे व त्यामागे काही कारणे असत. ही कारणे चित्र अपुरे आहे येथपासून ते ‘हे चित्र मी रंगवले नाही.. माझ्याकडून कोणातरी अज्ञात शक्तीने रंगवून घेतले’ या स्वरूपाचेही कारण असे. उष्ण व शीत रंगाचा छायाप्रकाशासाठी उत्कृष्ट वापर करीत असतानाच अचानक ते अशा रंगांची जागा बदलत व त्यातून मिळणार्‍या प्रयोगात रममाण होत.

             विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, स्वातंत्र्योत्तर काळात मुंबईतील कलाजगत अधिकाधिक प्रयोगशील, जागरूक व संवेदनशील होऊ लागले होते. त्यातून यथार्थदर्शी, वास्तववादी चित्रणाशी फारकत घेऊन, जे जुने आहे ते त्यागून मुक्त आविष्काराचा अंगीकार हेच दृश्यकलेतील प्रगल्भतेचे द्योतक मानले जाऊ लागले. पण गजानन हळदणकरांना अशा आविष्कारांचे व आधुनिक कलाप्रवाहांचे कधीच आकर्षण वाटले नाही. साहजिकच त्यांची कलानिर्मितीही वेगळ्या मार्गावर गेली नाही व वेगळ्या दिशांनी विकसित होऊ शकली नाही. कदाचित, त्यांची पिढी ज्या संक्रमणकाळातून जात होती, त्यातील आकस्मिकतेच्या, पूर्वायुष्यातील संस्कारांच्या व नवीन प्रयोगांच्या संघर्षात भांबावली असण्याचीही शक्यता आहे. ते ज्या प्रकारे शिकले, ज्या प्रकारे कलानिर्मिती करत जगले, त्याची ती अपरिहार्यताही असू शकेल. परंतु या सर्व पार्श्‍वभूमीवर  त्यांच्या पिढीची निष्ठा व त्यातून निर्माण झालेल्या कलानिर्मितीतून त्यांनी या संक्रमणकाळातील मावळत्या, पण एका कसदार कलाप्रवाहाचे प्रतिनिधित्व केले हे निर्विवाद. मात्र आज पुराव्यांअभावी त्याची पद्धतशीर मांडणी व विश्‍लेषण होऊ शकत नाही.

             - सुहास बहुळकर

हळदणकर, गजानन सावळाराम