हत्तंगडी, राघवेंद्र व्ही.
मराठी व्यंगचित्रकलेच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे साधारणपणे १९३५-४५ या कालावधीत मध्यमवर्गीय, पांढरपेशा कुटुंबामध्ये अनुभवाला येणार्या प्रसंगांवर आणि त्यांमधील पात्रांच्या संवादांतून व्यक्त होणार्या सोज्ज्वळ, सुसंस्कृत विनोदांवर आधारलेली; थोडक्यात, चुटके चित्रित करणारी व्यंगचित्रे काढली जात. या पार्श्वभूमीवर या परिघाबाहेरची, पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रांतील आणि मुख्य म्हणजे प्रत्यक्ष चित्राच्या रूपाने बोलणारी व्यंगचित्रे हत्तंगडी यांनी मराठीमध्ये आणली हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य तर आहेच; पण त्यांना लाभलेल्या जन्मजात प्रतिभेचा पुरावाही आहे. विशेषत:, १९०९ साली जन्मलेल्या हत्तंगडींना समकालीनांहून वेगळे काही सुचावे हे लक्षणीय आहे.
राघवेंद्र व्ही. हत्तंगडी यांचा जन्म मुंबई येथे झाला. विल्सन महाविद्यालयामधून रीतसर शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी अनेक खाजगी कंपन्यांमधून नोकर्या केल्या. त्या करत असताना त्यांनी खेळ आणि संगीत हे त्यांचे विलक्षण आवडते छंद जोपासले. पश्चिम भारताचे ते टेनिस चॅम्पियनही होते. प्रख्यात अभिनेते पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर माटुंगा जिमखान्यावर टेनिस खेळताना अनेक वेळा त्यांना पाहिल्याचे त्यांचे चिरंजीव आठवण म्हणून सांगतात. शास्त्रीय संगीताचीही त्यांना अशीच विलक्षण आवड होती. ते स्वत: हार्मोनिअम वाजवायचे अन् यामध्ये गोविंदराव टेंबे यांना ते गुरू मानत. स्वत:च्या घरीही ते अनेक मैफली आयोजित करीत.
या वेगवेगळ्या क्षेत्रांतील वावरामुळे आणि मुख्यत: जन्मजात मोकळ्या, उमद्या आणि निर्मळ विनोदी स्वभावामुळे हत्तंगडींना आयुष्यातील आणि आजूबाजूच्या अनुभवांकडे खेळकर आणि निर्भेळ दृष्टीने पाहणे शक्य झाले.हत्तंगडी यांच्या अनेकानेक व्यंगचित्रांचे विषय संगीत, संगीतकार, गायक, वादक आहेत, आणि विविध खेळाडूही आहेत.
हत्तंगडी यांच्या व्यंगचित्रांतील रेखाटने त्यांचा रेखाटनकलेचा अभ्यास दर्शवणारी आहेत. मानवी शरीररचनाशास्त्र (अॅनॅटॉमी) आणि चित्रचौकटीमधील संरचना (कम्पोझिशन) त्यांच्या व्यंगचित्रांच्या संदर्भात बिनचूक आढळतात आणि चित्रांमधील पात्रांच्या चेहर्यांवरील व एकूण हावभाव अचूक भावार्थ पोहोचवणारे असतात. त्यांच्या अनेक व्यंगचित्रांमध्ये मजेने, हसतखेळत रेखाटावे, अशा प्रकारची उत्स्फूर्त रेषा वापरून केलेले चित्र दिसून येते. अनेक वेळा ते प्रथम पेन्सिलने चित्र काढून ते इंक न करता, थेट शाईने कागदावर फेअर म्हणून काढीत. उत्स्फूर्त, आधी फार विचार न करता बोलता बोलता गिरगिरटलेली रेषा हत्तंगडींच्या खुल्या, मोकळ्या, खिलाडू दृष्टिकोनाचा प्रत्यय द्यायलाही मोठी मदत करते.
‘अॅटम’, ‘ब्लिट्झ’, ‘बॉम्बे क्रॉनिकल’, ‘टाइड’, ‘करंट’ या इंग्रजी मासिकांतून त्यांची व्यंगचित्रे मोठ्या प्रमाणात प्रकाशित झाली. ही बहुसंख्य राजकीय टीकाचित्रे होती, तर ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘आवाज’साठी त्यांनी काढलेली हास्यचित्रे होती.त्यांच्यासारख्या नवीन वाट दाखवणार्या, प्रतिभावान व्यंगचित्रकाराचा मराठीत एकही संग्रह नाही हे खेदजनक वास्तव आहे.
- वसंत सरवटे