Skip to main content
x

आडारकर, विष्णु नामदेव

             हाराष्ट्र राज्याचे पहिले कलासंचालक आणि उपयोजित कलाशिक्षणाचे प्रवर्तक विष्णू आडारकर यांचा जन्म कोकणात वेंगुर्ले येथे झाला. लहानपणापासून त्यांना चित्रकलेची आवड असल्याने ते मुंबईत आले आणि त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. जे.जे.मध्ये शिकत असताना त्यांना अनेक पारितोषिके मिळाली. १९३० साली त्यांनी रंगचित्रकलेतील (पेंटिंग) पदविका संपादन केली आणि एल.. स्ट्रोनॅक अँड कंपनी या जाहिरात संस्थेत ते रुजू झाले. १९३२ ते १९३८ या काळात ते टाईम्स ऑफ इंडियाया वृत्तपत्रात ज्येष्ठ चित्रकार म्हणून काम करत होते. १९३९ साली ते सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये उपसंचालक (डेप्युटी डायरेक्टर) या पदावर नियुक्त झाले.

१९४६-४७ या काळात शिक्षणपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी ते इंग्लंडला जाऊन आले. १९४६ ते १९५८ या काळात उपयोजित कला (अप्लाइड आर्ट) या विभागाचे ते प्रमुख होते. १९५८ मध्ये सर जे.जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टही स्वतंत्र संस्था स्थापन झाली व १ जानेवारी १९६१ पासून या संस्थेचे अधिष्ठाता (डीन) म्हणून आडारकरांची नेमणूक झाली.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर १९६५ मध्ये कलासंचालनालयाचे कलासंचालक (आर्ट डायरेक्टर) म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ऑगस्ट १९६८ मध्ये ते या पदावरून निवृत्त झाले. १९६९ साली आय.आय.टी.पवई येथे आय.डी.सी. (इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) ची स्थापना झाली. पहिली पाच वर्षे आडारकर आयडीसीचे सल्लागार होते.

आडारकरांकडे कलेच्या बदलत्या स्वरूपाचा आणि तिच्या समाजाभिमुखतेचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि सर्वांना बरोबर घेऊन काम पूर्णत्वास नेण्याची हातोटी होती. प्रशासकीय अनुभवाबरोबरच सरकार दरबारी त्यांचे वजन होते. त्यामुळे जे.जे.चा उत्कर्ष झाला आणि कलावंतांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. शासकीय योजना, सामाजिक विकासाबाबतची ध्येय-धोरणे यांचा प्रसार करण्यासाठी जे.जे.सारख्या कलासंस्थांचा उपयोग करून घेतल्यामुळे चित्रकारही समाजाचा क्रियाशील घटक बनले. १९३५ साली चार्ल्स जेरार्ड यांच्या कारकीर्दीत कमर्शिअल आर्टचा  विभाग सुरू झाला खरा; पण व्यावसायिक (कमर्शिअल) आणि नंतर उपयोजित (अप्लाइड आर्ट) विभागाचे संवर्धन आडारकरांनी केले.

वाढत्या औद्योगिक उत्पादनांमुळे आडारकरांच्या काळात जाहिरात क्षेत्राचा विस्तार झाला, त्यात गुणात्मक वाढ झाली. १९६० साली सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टला पंचवीस वर्षे पूर्ण झाली त्या वर्षीच्या शिल्पांजलीच्या विशेषांकात आडारकर यांनी इंडस्ट्रिअल डिझाइन ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याचा विचार मांडला होता. प्रत्यक्षात जे.जे.मध्ये हे काही होऊ शकले नाही. महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा (वडोदरा) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एन.आय.डी) येथे अशा प्रकारचे अभ्यासक्रम सुरू झाले. त्यानंतर मुंबईत आडारकरांच्या पुढाकाराने आय.डी.सी. सेंटर सुरू झाले. या कलाशिक्षणाच्या विकासात आडारकरांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता.

आज जो  दृक्संवादकलेचा : जाहिरातकला, उपयोजित कला, संकल्पन (डिझाइनिंग) अशा क्रमाने विस्तार झाला आहे, त्याला पूरक अशा कलाशिक्षणाचा पाया आडारकरांनी घातला. आडारकर इंग्लंडला जाऊन आल्यानंतर कला शिक्षण (आर्ट एज्युकेशन)  या विषयावर त्यांनी लिहिलेला अहवाल शासनातर्फे प्रकाशित करण्यात आला. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट अँड डिझाइन, लंडन येथे ते पहिले ऑननरी लाइफ फेलोहोते. १९६५ साली त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्रीपुरस्कार मिळाला.

- रंजन जोशी, दीपक घारे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].