Skip to main content
x

आडिवरेकर, गोपाळ शंकर

     चित्रकार म्हणून स्वत:ला विकसित करीत असतानाच अनेक तरुण व होतकरू मराठी चित्रकारांना आडिवरेकरांनी मार्गदर्शन, प्रोत्साहन दिले. म्हणूनच चित्रकलेच्या स्पर्धात्मक क्षेत्रात स्थिरावण्यास मदत करणारे कलावंत म्हणून आडिवरेकर ओळखले जात.

गोपाळ शंकर आडिवरेकर यांचा जन्म  कोकणातल्या फणसगाव येथे झाला. त्यांचे बालपण व शालेय शिक्षण तेथेच झाले. मात्र एस.एस.सी.पासून शिक्षणासाठी त्यांचे मुंबईत येणे झाले आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत ते मुंबईतच होते. हयात मुंबईत घालवली तरी त्यांच्या चित्रांमध्ये कायम अप्रत्यक्ष दर्शन घडायचे आणि पाऊलखुणा दिसायच्या त्या कोकणातल्या मातीच्या.

चित्रकलेच्या शिक्षणासाठी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये ते दाखल झाले आणि प्रत्यक्ष, खऱ्या अर्थाने त्यांच्या ज्ञानार्जनाला सुरुवात झाली. आर्टस्कूलमध्ये शिकताशिकता अर्थार्जनाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी अर्धवेळ  नोकरीही केली. १९६३ मध्ये जी.डी. आर्ट झाल्यावर ‘आव्हान’ या नियतकालिकात ‘नाना’ या टोपणनावाने त्यांनी व्यंगचित्रे काढली. तेव्हापासून निकटवर्तीयांमध्ये ते ‘नाना’ याच नावाने ओळखले जाऊ लागले. मुंबईतल्या अनेक प्रकाशनांसाठी त्यांनी चित्रकारी केली. त्यांत ‘सत्यकथा’ या मासिकाचाही समावेश होता. त्यांची काही चित्रे ‘सत्यकथा’ व ‘मौज’च्या दिवाळी अंकांवर छापली गेली.

भारत सरकारच्या वीव्हर्स सर्व्हिस सेंटरमध्ये त्यांनी नोकरी पत्करली. बावीस वर्षे तेथे नोकरी करीत असतानाच आडिवरेकरांनी स्वतंत्र चित्रकार म्हणून प्रस्थापित होण्याच्या दिशेने वाटचाल केली. प्रारंभीच्या काळात त्यांनी जलरंगात कोकणातल्या निसर्गाचे चित्रण केले होते. याचा परिणाम असा झाला, की कोकण त्यांच्या मनात कायमचे घर करून राहिले. उमेदवारीच्या काळात त्यांनी व्यक्तिचित्रणाचा भरपूर अभ्यास केला. मात्र अशा चित्रणात मर्यादा आहेत आणि अमूर्त शैलीतले स्वातंत्र्य कलानिर्मितीसाठी उपकारक आहे असे लक्षात येताच त्या दृष्टीने त्यांचा प्रवास सुरू झाला. असे होऊनही त्यांच्या चित्रांमध्ये मानवाकार मात्र येतच राहिले. त्यांच्याच जोडीला कोकणातला निसर्ग, प्राणी, पक्षी, झाडे, डोंगर, दगडांचे पृष्ठभाग अगदी त्यांच्या रचनांसह ढोबळ आकारांच्या अंगाने दिसतच राहिले.

त्यांच्या चित्रांमध्ये तपकिरी, पिवळा आणि पांढरा रंग यांचे प्राबल्य दिसत असे. याच जोडीला त्यांनी मोजक्या प्रखर रंगांचा वापर करून वेधक चित्रनिर्मिती केली. चित्रात रंगलेपनाला जेवढे महत्त्व, तेवढाच चित्रातला पोतही महत्त्वाचा. आदिमानवाच्या गुहाचित्रांच्या निरीक्षणाचा त्यांच्या मनावर झालेला परिणाम किती जबरदस्त होता याचे दर्शन त्यांच्या चित्रात घडते. आडिवरेकर यांच्या चित्रांमध्ये जाड रंगलेपनाच्या बरोबर संगमरवराची भुकटी वापरून पोत निर्माण झाला. त्या ओल्या पृष्ठभागावरच अणकुचीदार टोकाने आकार कोरून ते मुक्तपणे रंगलेपन करीत.

१९७० मध्ये ताज आर्ट गॅलरीत त्यांच्या चित्रांचे पहिले कलाप्रदर्शन भरले. यानंतर केनया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, स्वीत्झलंड, हाँगकाँग, सिंगापूर आदी ठिकाणीही त्यांच्या चित्रांची अनेक प्रदर्शने झाली. १९७०, १९७२, १९७३ असा तीन वेळा त्यांना महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात पुरस्कार मिळाला. याशिवाय १९८६ मध्ये नवी दिल्लीच्या ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार, तर १९९० मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘महाराष्ट्र गौरव’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना मिळाला. भारत सरकारतर्फे होणाऱ्या चौथ्या व सहाव्या त्रैवार्षिक प्रदर्शनांसाठी त्यांची निवड झाली होती.

बॉम्बे आर्ट सोसायटीच्या विविध पदांवर काम करत त्यांनी संस्थेची धुरा अनेक वर्षे सांभाळली. यानंतरच्या काळात त्यांनी दिल्लीच्या ललित कला अकादमीची निवडणूक लढवली व सदस्य म्हणून ते निवडूनही आले. त्यासाठी आवश्यक असणारा राष्ट्रीय पातळीवरील जनसंपर्क त्यांनी निर्माण केला. अशा प्रकारच्या सार्वजनिक संस्थांच्या निवडणुकीच्या राजकारणातही डावपेच लढवत आपले स्थान त्यांनी बराच काळ कायम ठेवले. अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी आधार व प्रोत्साहन दिले, तसेच त्यांना आर्थिक आणि वैचारिक स्थैर्य दिले. अशा या कलाकाराचे २००८ मध्ये मुंबईत अल्पशा आजाराने देहावसान झाले.

- श्रीराम खाडिलकर

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].