Skip to main content
x

आफळे, सुनीती जयंत

सुनीती आफळे यांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण एच.पी.टी. महाविद्यालय, नाशिक येथे झाले. बी.ए.ला व एम.ए.ला संस्कृत व अर्धमागधी हे विषय घेऊन त्यांना प्रथम श्रेणी प्राप्त झाली. ‘आद्य शंकराचार्यांच्या भाषाशैलीची वैशिष्ट्ये’ या विषयातील संशोधनासाठी नागपूर विद्यापीठाची ‘डॉक्टरेट’ त्यांना प्राप्त झाली. ‘ब्रह्मसूत्रशंकरभाष्य’ या संशोधनासाठी विद्यापीठ अनुदान मंडळाची ‘फेलोशिप’ मिळाली.

बिटको चांडक महाविद्यालय, नाशिक रोड व सेन्ट जॉर्ज स्कूल, फरिदाबाद, हरियाणा येथे त्यांनी अध्यापन केले. त्याचप्रमाणे नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागात ८ वर्षे रिसर्च फेलो म्हणून त्यांनी काम केले. सुनीती यांनी कथा, कादंबरी, ललित लेखन तसेच वैचारिक व संशोधनात्मक लेखन केले आहे. बालवाङ्मय, काव्य आणि आकाशवाणीसाठी नभोनाट्य लेखनही केले आहे. ‘कुंपणापलीकडील बकुळी बाभळी’, ‘अतिथी’, ‘रिकामी’, ‘अनाथ’, ‘केवडा’, हे कथासंग्रह; ‘एक दाणा एक उखाणा’, ‘चकवा’, ‘डबक्यातले आकाश’, ‘पिंपळपान’ ह्या कादंबर्‍या; ‘दक्षिणा’ हा दीर्घकथासंग्रह; ‘अव्यक्ता’ हा संस्कृत नाटकातील नायिकांवर ललित लेखसंग्रह; ‘श्रीसंत गुलाबराव महाराज’ हे बालवाङ्मय अशी त्यांची १४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

‘शंकराचार्य हे प्रच्छन्न बौद्ध होते काय?’, ‘जागतिक वाङ्मयातील पहिले अंगाईगीत’, ‘ॐकाराच्या अर्थाचा विकास’, ‘कौटिलीय अर्थशास्त्रातील राजाची कल्पना’, ‘ऋग्वेदातील मंडूकसूक्त’, ‘शंकराचार्यांच्या मायावादाचे व्यावहारिक स्वरूप’, ‘शाकुंतलचा गर्भितार्थ’ हे संशोधनात्मक लेखनही त्यांनी केले आहे.

सुनीती यांच्या सुरुवातीच्या कथा या अस्वस्थ करणार्‍या सामाजिक अनुभवातून व स्वानुभव कथनातून साकारल्या आहेत. जीवनातील बर्‍या-वाईट घटनांना कारणीभूत होणारे मानवी मन, त्याचा शोध, आधुनिक स्त्रीचे जगणे, स्त्रीत्वातून उमलणारे अनुभव ह्या त्यांच्या लेखनामागील प्रेरणा आहेत. अंतरंग वेधून घेणारी सूक्ष्म मनोविश्लेषणात्मक, नेमक्या शब्दांत आशय व्यक्त करणारी शैली, प्रत्ययकारी भाषा आणि कलात्मक अलिप्तता यांमुळे त्यांच्या कथा समृद्ध झाल्या आहेत.

 सुनीती यांच्या अनेक कथांचे कानडी, गुजराती, हिंदी, तेलगू, इंग्रजी ह्या भाषांत अनुवाद झाले आहेत. ‘बाहुल्या’ ही कथा आंतरराष्ट्रीय नियतकालिक ‘सर्ज’मध्ये प्रसिद्ध झाली. तिचे इंग्रजी, फ्रेंच, जर्मन ह्या भाषांत अनुवाद झाले आहेत. याबरोबरच ‘ज्योतिषशास्त्री’ परीक्षाही त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी कथाकथनाचे कार्यक्रम महाराष्ट्र व अन्य राज्यांत केले आहेत. अनेक नाटिकांचे लेखन व दिग्दर्शन हिंदीतूनही केले आहे. वेदान्ताच्या अभ्यासामुळे त्यांच्या लेखनात एक अलिप्तता जाणवते.

- प्रा.संध्या टेंबे

 

 

आफळे, सुनीती जयंत