Skip to main content
x

बापट, विष्णू वामन

    विष्णू वामन बापट यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात धाऊलवल्ली या गावी झाला. वयाच्या आठव्या वर्षी पितृवियोग झाल्यावर चुलत्याने त्यांना रामदुर्गला आपल्या घरी नेले. त्यांची तल्लख बुद्धिमत्ता पाहून वडिलार्जित भिक्षुकीच्या धंद्याला चिकटून राहण्यापेक्षा शिकावे म्हणून मराठी शाळेत घातले. पुढे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी आजोळी शिराळे येथे रवानगी करण्यात आली. येथे शिक्षणाबरोबर तालमीत जाण्यास सुरुवात झाली. पण मित्रांच्या संगतीने मामांचा डोळा चुकवून लळीत व तमाशा पाहण्यास जाऊ लागले. ही गोष्ट लक्षात आल्यावर मामांनी चांगलीच कानउघडणी केली. ते सहन न होऊन घरातून पलायन केले व एका नाटक कंपनीत नोकरी धरली.

     चार महिन्यांनी मामांना त्यांचा शोध लागल्यावर ते त्यांना तेथून घेऊन आले व गव्हर्नमेंट टेलिग्रफिक क्लासमध्ये शिक्षण घेण्यासाठी पुण्यास पाठवले. तेथे उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाल्यावर सदर्न-मराठा रेल्वेत दरमहा पंधरा रुपयांची नोकरी लागली. नोकरीच्या निमित्ताने बापटांना हुबळी-धारवाडकडे जावे लागले. तेथे विद्याव्यासंगी माणसांशी त्यांची गाठ पडली. त्याचा परिणाम म्हणजे हातात येईल ते पुस्तक वाचण्याची सवय जडली. त्याच वेळी त्यांना आपण शिकलो नाही याची खंतही वाटू लागली. उत्तमोत्तम ग्रंथ वाचताना आपण उत्तम ग्रंथकार व्हावे, ही इच्छा मूळ धरू लागली. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधातील ‘मराठीत चांगला ग्रंथकार होण्यासाठी संस्कृत भाषा तितकीच उत्तम आली पाहिजे,’ या वाक्याने त्यांच्या जीवनाचे ध्येय निश्चित झाले.

      वयाच्या तेविसाव्या वर्षी भांडारकरांच्या पुस्तकावरून संस्कृत अध्ययनाला सुरुवात झाली. दरम्यान काशी गोखले यांच्याशी विवाहबद्ध झाले. विवाह झाल्यावर गदग येथे नोकरीसाठी गेले. पुढे नॉर्थ वेस्टर्न रेल्वेत कराची येथे सिग्नलरची नोकरी मिळाली. कराचीला अनेक विद्वान ब्राह्मण कुटुंबे राहत होती व उत्तम ग्रंथसंग्रहालये होती. येथेच हरी लक्ष्मण लागू या संस्कृतच्या प्राध्यापकांशी परिचय झाला. बापटांनी त्यांना आपली ज्ञानतृष्णा पुरी करण्याची गळ घातली. त्यांनीही ते मान्य केले. लागूंचे घर बापटांच्या घरापासून अडीच मैल दूर व दोघांच्याही नोकरीच्या वेळा वेगवेगळ्या अशी अडचण होती. यावर उपाय म्हणून बापट लागूंच्या घरी पहाटे चार वाजता जाऊ लागले. चार ते सात अध्ययन व नंतर नोकरी असा दिनक्रम सुरू झाला. येथेच अष्टाध्यायीच्या अभ्यास पूर्ण झाला.

      जर्मन तत्त्ववेत्ता डॉयसन यांनी त्यांच्या व्याख्यानात, ‘ज्यांनी शांकरवेदान्त वाचला नाही, त्यांचे जीवन व्यर्थ आहे’ असे म्हटले होते. ते ऐकून आचार्यांचे तत्त्वज्ञान जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. संस्कृतचा अभ्यास चांगला झाला होता, पण तत्त्वज्ञान मात्र गुरुमुखातूनच जाणून घेतले पाहिजे, असे वाटू लागले. या कालावधीत वाई येथील देवळात प.पू.श्री. प्रज्ञानंद सरस्वती हे शांकरभाष्यावर प्रवचने करतात असे समजले. त्यांच्याशी पत्रव्यवहार करून स्वत:विषयी माहिती दिली व तत्त्वज्ञान शिकण्याची इच्छा कळवली. स्वामींकडून बोलावणे आले.

      रेल्वेतील नोकरी सोडून सपत्नीक वाईला गेले. तेथे मोदवृत्त छापखान्यात नोकरी करत अध्ययनाला प्रारंभ झाला. अकरा महिन्यांच्या कठोर अध्ययनानंतर, ‘प्रस्थानत्रयीचा अर्थ ग्रहण करण्याची पात्रता तुमच्यात आली आहे. पुढील ग्रंथांचे श्रवण करण्याची गरज नाही. कोणाच्याही साहाय्यावाचून ते तुम्हांला समजू लागतील.’ अशा शब्दांत स्वामींनी जाण्याची परवानगी दिली. यानंतर पुन्हा बेलपपहाड स्टेशनवर रेल्वेत नोकरी पत्करली. चार महिन्यांनी खोमसारा या आडगावी बदली झाली.

     येथे अध्ययनाला वेळ मिळू लागला. सुभाषितसंग्रहासारख्या लहान ग्रंथाच्या भाषांतराला सुरुवात केली. ही भाषांतरे मुंबईचे शेठ दामोदर सावळाराम यंदे यांना पाठवून ती प्रसिद्ध करण्याविषयी विचारणा केली. अनुकूलता दिसताच नोकरी सोडून मुंबईला आले. यंदेंनी धार्मिक ग्रंथांची भाषांतरे केल्यास मोबदला देण्याची तयारी दर्शवली. एकीकडे भाषांतराचे हे काम सुरू असतानाच आनंदगिरीच्या टीकेसह प्रस्थानत्रयीच्या अध्ययनाला प्रारंभ झाला. या अध्ययनाची आवर्तने केली. शांकरभाष्यावर प्रभुत्व प्राप्त झाले.

     १९०१मध्ये मुंबईच्या आर्यन हायस्कूलच्या संस्कृतच्या प्राध्यापकांशी परिचय झाला. त्यांच्याबरोबर उपनिषदांचा अभ्यास सुरू केला. १९०३मध्ये सिंधमधील गिडमुल वेदपाठशाळेत मुख्याध्यापकाची नोकरी मिळाली. येथील ग्रंथालय दुर्मीळ ग्रंथांनी समृद्ध होते. कोणत्याही वेळी कोणीही विद्यार्थी बापट गुरुजींकडे शंका घेऊन येऊ शकत होता. विद्यार्थिप्रिय शिक्षक, असा गुरुजींचा लौकिक होऊ लागला.

     गुरुजी जुन्या मताचे पुरस्कर्ते होते, पण स्त्रियांविषयी उदारमतवादी होते. ‘स्त्रियांनी संस्कृतचा, वेदान्ताचा अभ्यास करावा, धर्मशास्त्र त्यांना अवगत असले पाहिजे, त्याच धर्मरक्षण करणार आहेत’ असे ते नेहमी म्हणत. १९१२मध्ये ते पुण्यास आले. येथे आल्यावर त्यांनी ब्रह्मविद्याग्रंथमाला व दर्शनमाला अशा दोन माला सुरू केल्या. पुढे वर्षानंतर ‘आचार्य’ नावाचे पाक्षिक सुरू केले.

     वेदान्तातील शास्त्रींचा अधिकार एवढा मोठा होता की, गीतारहस्य लिहिताना लोकमान्यांनीही त्यांच्याशी चर्चा केली होती. पण टिळकांची काही मते शास्त्रींना पटली नाहीत. त्यावरून त्यांच्यात वैचारिक मतभेद झाले. त्यामुळे ते टिळकविरोधक म्हणून प्रसिद्ध झाले.

     शास्त्रींचा तत्त्वज्ञानातील अभ्यास पाहून त्यांना विविध उपाधी प्राप्त झाल्या होत्या. सिंधमध्ये असताना हंपी मठाधिपतींकडून ‘आचार्यभक्त’ ही पदवी प्राप्त झाली होती. डाकूरचे शंकराचार्य श्री. राजराजेश्वर यांनी ‘सद्धर्मभास्कर’ ही उपाधी दिली. डॉ. कुर्तकोटीस्वामींनीही ‘वेदान्तचूडामणी’ ही उपाधी दिली पण शास्त्रींनी ती साभार परत केली. १९२७ मध्ये बनारस येथील श्रीभारतधर्ममहामंडळातर्फे ‘शास्त्रसुधारक’ ही उपाधी प्रदान करण्यात आली. त्यांची दोन्ही मुले १९१६ मध्ये निवर्तली आणि त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. शास्त्रीबुवा विरक्त होत गेले. यानंतर जागोजागी व्याख्याने, अखंड लेखन सुरू झाले. लोकांनी सांगूनही प्रकृतीकडे दुर्लक्ष केले.

     १९२५मध्ये ‘आचार्यकुल’ नावाची संस्था काढली. संस्थेचा विस्तार होत होता, त्याच वेळी प्रकृतीही ढासळत होती. शेवटी शास्त्रीजी आपल्यामागे वेदान्तातील फार मोठी संपदा ठेवून पंचत्वात विलीन झाले. त्यांची ग्रंथसंपदा अशी आहे-

     भाष्यार्थ - ईश, केन, कठ इत्यादी प्रमुख दहा उपनिषदांचा भाष्यार्थ; गीताभाष्यार्थ; ब्रह्मसूत्रशारीरभाष्यार्थ ३ भाग; सुबोध पंचदशी; सुबोध उपनिषत्संग्रह; सुबोध ब्रह्मसूत्र; आत्मपुराण; अध्याय १, २, १०; अनुभूतिप्रकाश अध्याय १, २; अपरोक्षानुभूति; शतश्लोकी, तत्त्वानुसंधानसार.

      दर्शने - चार्वाक, बौद्ध, जैन, रामानुज, पूर्णप्रज्ञ, वल्लव, माहेश्वर, जैमिनि, पाणिनि, तर्कसंग्रह, ऐतरेयोपनिषद, नारायणोपनिषद, प्रश्नोत्तररत्नमालिका, वेदान्तशब्दकोश, वेेदान्तपरिभाषा.

      दामोदर सावळाराम मंडळींनी प्रकाशित केलेली ग्रंथसंपदा - सार्थ सुभाषित संग्रह, आनंदरामायण, कथासरित्सागर ३ भाग, पंचदशीसार २ भाग, आत्मबोध, वेदान्तसार, सांख्यतत्तवकौमुदी, हरिमीडेस्तोत्र, जीवन्मुक्तिविवेकसार, बृहद्योगवासिष्ठ ३ भाग.

       पुराणप्रकाशक मंडळी - गणेशपुराण २ भाग, भविष्यपुराण २ भाग, देवी भागवत २ भाग, मनुस्मृति, याज्ञवल्क्यस्मृति.

       चिपळूणकर मंडळी - योगवासिष्ठ २ भाग, बालबोधिनी गीता,

      इंदिरा छापखाना - एकनाथी भागवतार्थ २ भाग

      कर्नाटक प्रेस - महाभारतार्थ ७ भाग

     आनंदाश्रमचे रानडे मूर्ती यांच्या आनंदमूर्तिचरित्राचे भाषांतरसुद्धा बापट यांनी केले आहे.

डॉ. आसावरी बापट

बापट, विष्णू वामन