चंदावरकर,, नारायण गणेश
नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्म कारवार जिल्ह्यातील होनावर येथे त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे सुरुवातीचे शालेय शिक्षण होनावर येथील मिशनरी शाळेत झाले. त्यांचे मामा शामराव विठ्ठल कैकिणी यांनी १८६९मध्ये त्यांना मुंबईस आणले. मुंबईत अगोदर त्यांना माझगावच्या सेंट मेरी मिशनरी शाळेत घालण्यात आले, पण पुढच्याच वर्षी चंदावरकर यांना एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश देण्यात आला. नंतर १८७२मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि तेथून १८७६मध्ये त्यांनी बी.ए. ची पदवी पहिल्या वर्गात संपादन केली. कॉलेजमध्ये चंदावरकर हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. बी.ए.ला त्यांनी इतिहास, तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्र हे विषय घेतले होते. चंदावरकर एलफिन्स्टन महाविद्यालयात विद्यार्थी असताना काशिनाथ त्रिंबक तेलंग तेथे सीनियर फेलो होते. बी.ए. झाल्यानंतर चंदावरकरांनाही एलफिन्स्टन महाविद्यालयामध्ये फेलो म्हणून नेमण्यात आले.
१८७८मध्ये तेलंगांच्या शिफारशीवरून ‘इंदुप्रकाश’ साप्ताहिकाच्या इंग्रजी विभागाचे संपादक म्हणून चंदावरकरांची नेमणूक झाली. जवळजवळ दहा वर्षे त्यांनी ही संपादकपदाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली. या काळात त्यांनी ‘इंदुप्रकाश’ मधून स्त्रीशिक्षणाचा आणि एकंदर सामाजिक सुधारणांचा सातत्याने पुरस्कार केला. याच दरम्यान त्यांनी कायद्याचा अभ्यास करून एलएल.बी.ची पदवी संपादन केली आणि १८८१पासून वकिलीस सुरुवात केली. त्यांना वकिलीत उत्तम यश मिळाले आणि सार्वजनिक कार्यातही त्यांचा प्रवेश झाला.
१८८५मध्ये काँग्रेसची स्थापना झाली; काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनापासूनच चंदावरकर काँग्रेसचे क्रियाशील सभासद झाले. त्याआधी सप्टेंबर १८८५मध्ये रामस्वामी मुदलियार आणि मनमोहन घोष यांच्याबरोबर चंदावरकर इंग्लंडला जाऊन त्या वर्षीच्या तेथील पार्लमेंटच्या निवडणुकीच्या वेळी भारताची आणि भारतीयांची कैफियत मांडून आले होते. प्रार्थनासमाजाशीही ते पहिल्यापासून संबद्ध होते आणि नंतर कित्येक वर्षे त्याचे अध्यक्ष होते. सामाजिक परिषदेच्या (सोशल कॉन्फरन्स) कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग असे. प्रांतिक परिषदेच्या (प्रोव्हिन्शिअल कॉन्फरन्स) १८९६मध्ये कराचीला भरलेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. १८८७मध्ये आणि पुन्हा १८९९मध्ये विद्यापीठ मतदारसंघातून त्यांची त्यावेळच्या मुंबई कायदेमंडळावर निवड झाली. त्यानंतर १९००मध्ये लाहोरला भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.
जानेवारी १९०१मध्ये न्यायमूर्ती रानडे यांच्या निधनाने रिकाम्या झालेल्या जागेवर चंदावरकरांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. न्यायाधीशपदावर त्यांनी बारा वर्षांपेक्षा अधिक काळ काम केले. या काळात साहजिकच ते सक्रिय राजकारणात नव्हते. १९१३मध्ये त्यांनी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला. या दरम्यान १९०९मध्ये त्यांनी काही काळ उच्च न्यायालयाचे कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले. १९१० मध्ये त्यांना ‘सर’ हा किताब मिळाला.
न्यायाधीश होण्यापूर्वी चंदावरकरांनी उच्च न्यायालयात वकिली केलेली असल्याने त्यांना उच्च न्यायालयाच्या मूळ आणि अपील या दोन्ही शाखांत काम करण्यास सांगण्यात येई. योगायोगाने राजकीय संदर्भ आणि महत्त्व असलेले अनेक खटले त्यांच्यासमोर आले. त्यातील बहुसंख्य खटल्यांतील आरोपींवर राजद्रोहाचे आरोप होते. दोन खटले अपील होऊन त्यांच्यासमोर आले होते. एक म्हणजे ‘राष्ट्रमत’ दैनिकाचे व्यवस्थापक गणपतराव मोडक यांनी बिपिनचंद्र पाल यांच्या ‘स्वराज्य’ पाक्षिकाचे ‘आक्षेपार्ह’ मजकूर असलेले अंक वितरित केले म्हणून सरकारने त्यांच्याविरुद्ध भरलेला खटला, तर दुसरा म्हणजे कवी गोविंदांच्या ‘आक्षेपार्ह’ कविता प्रसिद्ध केल्यावरून बाबाराव सावरकरांविरुद्ध भरलेला खटला. या खटल्यांत आरोपींना सत्र न्यायालयाने दिलेल्या कठोर शिक्षा न्या.चंदावरकरांनी अपीलात कायम केल्या. त्यानंतर नाशिक कटाच्या संबंधीचे एकूण तीन खटले सरळ मुंबई उच्च न्यायालयात स्कॉट, चंदावरकर आणि हीटन या तीन न्यायाधीशांच्या विशेष पीठापुढे चालले. पहिल्यामध्ये अनंत कान्हेरे, देशपांडे, कर्वे आणि अन्य आरोपी होते व दुसर्या दोन खटल्यांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर व अन्य आरोपी होते. या सर्व खटल्यांत तिन्ही न्यायाधीशांनी एकमताने बहुतेक आरोपींना फाशी आणि जन्मठेप-काळे पाणी-अशा शिक्षा दिल्या; सावरकरांना तर दुहेरी जन्मठेप दिली. या निकालांमुळे चंदावरकरांबद्दल जनमानसात संतापाची भावना निर्माण झाली.
या भावनेची तीव्रता ताई महाराज खटल्यातील निकालाने अधिकच वाढली, कारण या खटल्यात लोकमान्य टिळक आरोपी होते. ताई महाराजांनी केलेल्या दत्तकविधानाकरिता टिळक आणि खापर्डे यांनी आपल्या वजनाचा दुरुपयोग केला असे चंदावरकरांनी आपल्या निकालात म्हटले, तर सदर दत्तक विधान झालेच नाही, असा न्या.हीटन यांचा निकाल होता. उच्च न्यायालयाचा हा निकाल नंतर प्रिव्ही काऊन्सिलने फिरविला आणि टिळकांना निर्दोष ठरविले; त्यामुळे जनमानसातील नाराजी आणि क्षोभ अधिकच वाढला. त्याचे पर्यवसान चंदावरकरांच्या खुनाचा प्रयत्न होण्यात झाले. त्यांनी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला, याचे हेही एक कारण असावे.
राजकीय खटल्यांशिवाय अन्य खटलेही न्या.चंदावरकर यांच्यासमोर चालले. हिंदू कायद्याशी संबंधित दोन महत्त्वाच्या खटल्यांचा उल्लेख करता येईल. एकामध्ये ‘मुरळी’ म्हणून खंडोबाशी लग्न लावून वस्तुत: वेश्यावृत्तीसाठी सोडून दिलेल्या मुलीच्या तिच्या बापाच्या मालमत्तेतील वारसाहक्काचा प्रश्न होता, तर दुसर्यामध्ये काही काळ मार्गभ्रष्ट झालेल्या परंतु नंतर पतीकडे परत आलेल्या पत्नीला सांभाळण्याच्या पतीच्या जबाबदारीचा प्रश्न होता. या दोन्ही खटल्यांत न्या.चंदावरकर यांनी ‘मिताक्षर’, ‘व्यवहारमयूख’, ‘पराशर स्मृती’ इत्यादि मूळ संहितांमधील वचनांचा बारकाईने विचार करून आणि त्यांचा कालानुरूप अर्थ लावून निर्णय दिले.
न्यायाधीशपदाचा राजीनामा दिल्यानंतर चंदावरकर काही काळ इंदौर संस्थानचे दिवाण म्हणून इंदौरला गेले. परंतु महाराजांशी मतभेद झाल्यामुळे दिवाणपदाचा राजीनामा देऊन ते मुंबईला परत आले. यानंतर ते ‘प्रार्थनासमाज’ आणि कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ‘डिप्रेस्ड क्लासेस् मिशन’ या संस्थांमध्ये सक्रिय राहिले. ते मुंबई विद्यापीठांचे कुलगुरूही झाले. राजकारणात त्यांनी नेहमी नेमस्त भूमिका मांडली. महात्मा गांधींबद्दल त्यांना आदर होता, परंतु गांधीजींच्या सत्याग्रह आणि असहकारितेच्या मार्गाला त्यांचा विरोध होता. १९१९नंतर माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणांनुसार विस्तार झालेल्या मुंबई विधिमंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. अखेरपर्यंत ते त्या पदावर होते.
देशातील लोकभावनेचा विचार न करता त्यांनी दिलेल्या काही निर्णयांबद्दल व त्यांच्या राजकीय मतांबद्दल मतभेद असले तरी मुंबई उच्च न्यायालयाचे स्वातंत्र्यपूर्व काळातले महत्त्वाचे, विद्वान न्यायाधीश तसेच सचोटीचे आणि तत्त्वनिष्ठ नेमस्त नेते हे त्यांचे स्थान अबाधित राहील.