Skip to main content
x

फडके, रामचंद्र विनायक

सुधीर फडके

रामचंद्र ऊर्फ सुधीर विनायक फडके यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या वडिलांना संगीताची आवड होती. त्यामुळे त्यांच्यावर बालपणापासूनच प्रख्यात गायक, वादक यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकून संगीताचे संस्कार झाले. वयाच्या सातव्या वर्षी कोल्हापूरचे प्रख्यात संगीतज्ञ, गायक वामन पाध्ये यांच्याकडे त्यांचे गायनाचे शिक्षण सुरू झाले. माता-पित्यांच्या अकाली निधनाने व प्रतिकूल कौटुंबिक परिस्थितीमुळे बालवयातच त्यांच्यावर अर्थार्जनाची जबाबदारी येऊन पडली. यामुळे त्यांचे शालेय शिक्षण अर्धवटच राहिले. कोल्हापूरच्या एका संगीत विद्यालयात संगीत शिक्षकाचे काम करीत असताना, त्या विद्यालयाच्या संचालकांनी त्यांचे ‘सुधीर फडके’ असे नामकरण केले आणि पुढे हेच नाव जनमानसात रुळले आणि खूप लोकप्रिय झाले.

मुंबईत गायक, संगीतकार म्हणून प्रस्थापित होण्यापूर्वी सुधीर फडके अर्थार्जनासाठी भारतभर हिंडले. त्यांनी विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम केले आणि त्यायोगे विविध प्रांतांतील संगीतशैली, लोकसंगीत यांचा त्यांनी अभ्यास केला. प्रथम कोल्हापूर व नंतर मुंबई येथे आलेल्या तत्कालीन ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ या प्रसिद्ध ग्रामोफोन कंपनीतून त्यांची व्यावसायिक संगीतकार, गायक अशी कारकीर्द सुरू झाली आणि उत्तरोत्तर यशस्वी होत राहिली. त्यांनी १९४१ साली ग.दि. माडगूळकर यांच्या ‘दर्यावरी नाच करी होडी चाले कशी भिरीभिरी’ या कवितेला चाल लावली. त्यांच्याच आवाजात त्याची ध्वनिमुद्रिकाही निघाली आणि ती लोकप्रिय झाली.

फडके यांनी प्रख्यात गायिका हिराबाई बडोदेकर यांना आपले गुरू मानले. संगीतकार म्हणून हिराबाईंकडून त्यांनी काही गीते गाऊन घेतली. शांता हुबळीकर, माणिक दादरकर (वर्मा), गोविंद कुरवाळीकर, सुमन हेमाडी, जे.एल. रानडे, पद्मा पाटणकर अशा नामवंत गायक-गायिकांकडूनही एच.एम.व्ही.चे संगीतकार म्हणून त्यांनी गीते ध्वनिमुद्रित केली.

चित्रपट व्यवसायात संगीतकार-गायक म्हणून १९४५ साली सुधीर फडके यांचा प्रवेेश प्रभात कंपनीच्या ‘गोकुळ’या चित्रपटाद्वारे झाला. याच कंपनीच्या ‘आगे बढ़ो’, ‘संत जनाबाई’ अशा चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. एव्हांना सुधीर फडके हे रसिकांचे लाडके ‘बाबूजी’ झाले. बाबूजी म्हणून रसिकांनी त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतले. प्रभात कंपनीव्यतिरिक्त ‘जिवाचा सखा’, ‘जशास तसे’, ‘लाखाची गोष्ट’, ‘प्रपंच’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘मुंबईचा जावई’,  ‘पुढचं पाऊल’, ‘शापित’ या चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीतही कमालीचे यशस्वी झाले. 

सुधीर फडके २९ मे १९४९ रोजी गोड गळ्याच्या प्रतिभावंत गायिका ललिता देऊळकर यांच्याशी विवाहबद्ध झाले. त्यांनी १९५१ साली ‘विठ्ठल रखुमाई’ हा चित्रपट निर्माण केला. त्या चित्रपटात त्यांनी गुरू मानलेल्या बालगंधर्वांना गाणी गाण्याचा मान दिला. 

मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. ‘पहली तारीख’, ‘मालती माधव’, ‘भाभी की चूडियां’ हे काही ठळक हिंदी चित्रपट होत. माणिक वर्मा, लता मंगेशकर, आशा भोसले, मुकेश, मुहंमद रफी, किशोरकुमार अशा श्रेष्ठ पार्श्वगायकांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. मराठी चित्रपटांतील ‘वेदमंत्रांहून आम्हां..’, ‘एक धागा सुखाचा’, ‘त्या तिथे पलीकडे’, ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’, ‘जिवलगा कधी येशील तू’, ‘देहाची तिजोरी’, ‘धुंदी कळ्यांना’, ‘एकाच या जन्मी जणू’, ‘दिस जातील दिस येतील’ ही काही अत्यंत गाजलेली गीते, तर हिंदीतील ‘खुश है जमाना,’ ‘बांध प्रीत फुलडोर’, ‘ज्योति कलश छलके’,‘लौ लगाती गीत गाती’ ही लोकप्रिय झालेली गीते होत.

त्यांची १९४६ ते १९८८ अशी प्रदीर्घ चित्रपटसंगीताची कारकीर्द संपन्न झाली. बाबूजींचे संगीत ८३ मराठी चित्रपटांना लाभले आहे. त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके यशस्वी संगीतकार, गायक म्हणून कार्यरत आहेत. ‘लक्ष्मीची पाऊले’ या चित्रपटात श्रीधर फडक्यांच्या संगीत दिग्दर्शनात सुधीर फडके ‘फिटे अंधाराचे जाळे’ हे द्वंद्वगीत आशा भोसले यांच्या सोबत गायले आहेत. 

‘गीतरामायण’ हा सुधीर फडके यांच्या सांगीतिक कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनावर ग.दि. माडगूळकर यांनी ५६ गीते लिहिली. या गीतांना सुधीर फडके यांनी अद्वितीय संगीतसाज चढविला. पुणे आकाशवाणीने १९५५ साली ही गीते पुणे केंद्रावरून प्रक्षेपित करून करोडो श्रोत्यांपर्यंत ती पोहोचवली आणि सार्‍यांना मंत्रमुग्ध केले. पुणे आकाशवाणीच्या या प्रकल्पात सुधीर फडके, गजानन वाटवे, माणिक वर्मा, राम फाटक, मालती पांडे, वसंत देशपांडे, सुरेश हळदणकर अशा मोठ्या गायकांनी ही गीते गायली. लता मंगेशकरांनी यांतील ‘मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे’ हे एकमेव गीत गायले. पुढे सुधीर फडक्यांनी सर्व ५६ गीते स्वत:च्या आवाजात एच.एम.व्ही.तर्फे ध्वनिमुद्रित केली. आणि लाखोंच्या संख्येने या ध्वनिमुद्रिकांची विक्री झाली. मराठी भावसंगीतातील अत्युच्च शब्द-स्वराविष्कार म्हणून ‘गीतरामायण’ ओळखले जाते.

संख्यात्मकदृष्ट्या सुधीर फडक्यांचे काम त्यांच्या समकालीन संगीतकारांहून खूपच अधिक आहे. यामुळे मराठी भावसंगीत म्हणजे सुधीर फडके असे समीकरणच झाले होते. गेयता हा त्यांच्या संगीताचा प्रमुख पैलू असल्याने ते अफाट लोकप्रिय झाले. ते स्वतः  गायक आणि संगीतकार असल्याने त्यांचे संगीत अधिक परिणामकारक ठरले. गायक म्हणून त्यांचे उच्च स्थान वादातीत आहे. भावसंगीताचा आत्मा म्हणजे शब्दोच्चार आणि शब्दफेक. सुधीर फडके यांची ही दोन्ही वैशिष्ट्ये म्हणून ओळखली जातात. शब्दोच्चार अतिशय स्पष्ट, अर्थवाही आणि अतिशय लयदार शब्दफेक. त्यांच्या शब्दफेकीतील आवाजाचा चढउतार हा त्या लयकारीचाच एक भाग. या चढ-उतारामुळेच त्यांचे गायन भावनांनी ओथंबलेले आणि काळजाला हात घालणारे आहे. हे सगळे गाताना ज्या सहजतेने ते गायलेत, ते तर एकमेवाद्वितीयच. ‘गीतरामायणा’तील त्यांचे गायन हे भावसंगीत गायकाचा अभ्यासक्रम ठरावा इतके परिपूर्ण आहे. त्यात आशयानुरूप चाली आणि गायन, अभिव्यक्ती, लयकारी, शब्दोच्चारण, शब्दफेक हे सर्व अद्वितीय आहे. त्यांचा शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास त्यांच्या गीतरामायणातील गायनात स्पष्ट जाणवतो. ‘दशरथा, घे हे पायसदान’, ‘वाली वधना’, ‘तात गेले माय गेली’, ‘सन्मित्र राघवांचा’, ‘मज सांग लक्ष्मणा..’, ‘रघुराजाच्या नगरी जाऊन ..’ ही त्यांची गीतरामायणातील काही ठळक गीते.

या असामान्य गायक-संगीतकाराच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रखर राष्ट्रभक्ती हा अतिशय महत्त्वाचा पैलू होता. सुधीर फडक्यांनी निस्सीम राष्ट्रभक्ती आणि कट्टर हिंदुत्ववाद आयुष्यभर जपला. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजन्म निष्ठावान स्वयंसेवक म्हणून जगले. तसेच त्यांनी संघप्रचारक म्हणूनही कार्य केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोमंतकाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या सशस्त्र लढाईत १९५४ साली सुधीर फडके यांनी सक्रिय भाग घेतला आणि गोमंतकाला पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केले. आझाद गोमंतकाच्या दलात सामील होऊन त्यांनी हे कार्य पार पाडले. परिणामतः पोर्तुगीजांच्या अटकेत असलेल्या भारतीय क्रांतिवीर मोहन रानडे आणि डॉ. मस्कारेन्हास यांची सुटका झाली.

सुधीर फडके हे थोर क्रांतिवीर वि.दा.सावरकर यांचे भक्त होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील चित्रपटाच्या निर्मितीचे स्वप्न त्यांनी पाहिले. अतिशय जिद्दीने, तळमळीने, कष्टाने ‘वीर सावरकर’ या चित्रपटाची यशस्वी निर्मिती करून त्यांनी आपले स्वप्न साकारले. 

सुधीर फडक्यांना संगीतात दिलेल्या योगदानाबद्दल   काही उल्लेखनीय पुरस्कार मिळाले आहेत. प्रथम महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात ‘प्रपंच’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक’ (१९६२ - ६३), श्रीराम चित्र निर्मित ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटासाठी राष्ट्रपती रौप्यपदक (१९६३-६४), दुसर्‍या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात श्रीराम चित्र निर्मित ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटासाठी दुसरे पारितोषिक (१९६३-६४), सहाव्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात ‘संथ वाहते कृष्णामाई’ या गीतासाठी ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक’ (१९६७-६८), सुरसिंगार संसदतर्फे ‘भाभी की चूडियां’ या चित्रपटातील ‘ज्योति कलश छलके’ या उत्कृष्ट गीताबद्दल ‘स्वामी हरिदास’ पुरस्कार (१९६८), सातव्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात ‘आम्ही जातो अमुच्या गावा’ या चित्रपटासाठी ‘उत्कृष्ट संगीतकार’ (१९६८-६९), सुरसिंगार संसदतर्फे ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटातील ‘प्रथम तुज पाहता’ या गीताच्या स्वररचनेबद्दल ‘स्वामी हरिदास’ पुरस्कार (१९७०), नवव्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात ‘धाकटी बहीण’ या चित्रपटातील ‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना’ या गीतासाठी ‘उत्कृष्ट पार्श्वगायक’ (१९७०-७१), बाराव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात ‘कार्तिकी’ या चित्रपटासाठी ‘उत्कृष्ट पार्श्वगायका’चे पारितोषिक (१९७४-७५) आदी पुरस्कारांचे ते मानकरी ठरले.

संगीत नाटक अकादमीने १९८१ साली संगीतातील सर्जनशील  प्रमुख कलाकार म्हणून ताम्रपट देऊन त्यांचा सन्मान केला तर, १९९३ मध्ये मराठी साहित्य संमेलन, खार, मुंबईतर्फेही त्यांना सन्मान प्राप्त झाला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे १९९६ साली संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांचा ‘गोदावरी गौरव’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

प्रमोद रानडे

फडके, रामचंद्र विनायक