Skip to main content
x

बेंद्रे, वासुदेव सीताराम

     तिहास ही राष्ट्राची ज्योत आहे’ असे महाभारतकार व्यासांनी म्हटले आहे. आपल्या देशाचा उज्ज्वल आणि स्फूर्तिदायी इतिहास समाजापुढे यथावत यावा यासाठी मागील पिढीतील काहींनी इतिहास संशोधन केले, त्यांत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संशोधन क्षेत्रात अतिशय मोलाचे काम करणारे बहुव्यासंगी व्यक्तिमत्त्व म्हणजे वासुदेव सीताराम बेंदे्र हे होय. आई भागिरथीबाई व वडील सीतारामपंत यांनी अतिशय श्रमसायासाने त्यांना घडविले. कुलाबा जिल्ह्यातील (हल्लीचा रायगड जिल्हा) पेण या ठिकाणी प्राथमिक शिक्षणानंतर तत्कालीन मॅट्रीकच्या परीक्षेस बसण्यास १४व्या वर्षी तयारी असलेल्या वासुदेवाला १६ वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे दोन वर्षे थांबावे लागले, त्या दोन वर्षांत त्यांनी जी.आय.पी. ऑडीट विभागात विनावेतन उमेदवारी केली. नंतर लघुलेखन (शॉर्टहँड) शिकून नोकरीस लागले. वयाच्या १९व्या वर्षी लघुलेखन परीक्षेत सुवर्णपदक विजेते झाले आणि शिक्षण खात्यात नोकरीला लागले.

     त्यानंतर त्यांनी १९१८ साली भारत इतिहास संशोधनाचा उंबरठा ओलांडला आणि आपले जीवन महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनात झोकून दिले ते अगदी अखेरच्या क्षणापर्यंत! इ. स. १९२८ साली ‘साधन चिकित्सा’ हा ग्रंथ लिहून त्यांनी आपल्यातील इतिहास संशोधनवृत्ती सिद्ध केली. नोकरीतील सचोटी, दीर्घोद्योग, चिकाटी, नम्रता आणि कामावरील निष्ठा यांमुळे त्यांना पदोन्नत्या मिळत गेल्या, ते ‘राजपत्रित अधिकारी (ॠरूशीींंशव जषषळलशी) या पदापर्यंत पोहोचले. त्यांच्यातील इतिहास संशोधकाला प्रेरणा मिळाली ती शिक्षणाधिकारी ‘कोव्हनन्टन’ यांच्यामुळे. त्यांनी त्यांना पुणे दप्तरखात्याच्या संशोधन अधिकारी पदापर्यंत पोहोचविले. तेथे त्यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली. पेशवे दप्तरातील सुमारे चार कोटी ऐतिहासिक कागदपत्रे विस्कळीत अवस्थेत होती. त्याचे कॅटलॉगिंग व विषयावर मांडणी करण्याच्या कामात त्यांनी बारकाईने लक्ष घातले. या सर्व गोष्टी शास्त्राशुद्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी अश्रळशरिींळिि जषषळलश ठशलिीवी रवि झििरि ऊरषींशी (इ.स. १९५०) असे पुस्तक लिहिले. आज हे पुस्तक वस्तुसंग्रहालय आणि इतिहास अभ्यासक यांच्यासाठी बहुमहत्त्वाचे आहे. ते अभ्यासल्याशिवाय कागदपत्रे हाताळता येत नाहीत. त्याच वेळी त्यांनी प्रसिद्ध केलेला अहवाल (ठशििीीं षि झशीहर्रींश ऊरषींशी जी र्ॠीळवश ीिं ींहश ठशलिीवी) हाही तितकाच मोलाचा आहे. याशिवाय राजस्थानातील बिकानेर आणि तमिळनाडूतील तंजावर येथील दप्तरखान्याची पाहणी करून तेथील तपशिलांची नोंदणी करण्याची जबाबदारी त्यांनी दिलेल्या वेळेपूर्वीच अतिशय काटेकोरपणे पूर्ण केली.

     वरील अनेक कागदांच्या ढिगार्‍यांच्या अनुभव आल्यामुळे बेंद्रे यांचे लक्ष मराठ्यांच्या इतिहास संशोधनाकडे स्थिरावले. वरील कागदपत्रे तपासत असताना त्यांनी इब्राहीम खान नावाच्या एका परकीय चित्रकाराने काढलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लीम पेहरावातील चित्र पाहिले. हे चित्र काही योग्य नाही, हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे ते अधिक संशोधनासाठी सरसावले आणि मॅकेनझीच्या ग्रंथाचे अवलोकन करताना त्यांना व्हलेन्टाइन या डच चित्रकाराने काढलेले सुरतेच्या वखारीतील तेथील गव्हरर्नरच्या भेटीच्या वेळेचे चित्र मिळाले. ज्या वेळी ते इंग्लंडला गेले, त्या वेळी त्यांनी या चित्राची खातरी करून घेतली आणि हे चित्र त्यांनी पुढे आणले. इंडिया हाउसकडून परवानगी मिळविली आणि पुण्याच्या शिवाजी मंदिरात साहित्यसम्राट न.चिं. केळकर यांनी ते प्रसिद्ध केले. आज सरकारी कचेरीत लावले जाणारे तेच हे चित्र!  वा. सी. बेंद्रे यांची ही कामगिरी इतिहास संशोधन क्षेत्रात उत्तुंग अशी झाली!

     इतिहास संशोधनाच्या अपुर्‍या साधनांमुळे छत्रपती संभाजी राजांची मलिन झालेली प्रतिमा प्रथम धुऊन काढण्याचे प्रचंड मेहनती काम बेंद्रे यांनी केले. अनेक अडचणींच्या प्रसंगांना तोंड देऊन, परदेशात जाऊन अनेक साधने त्यांनी मिळविली. सतत ४० वर्षे संशोधन केले, १९३८ साली ‘त्यांना हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलरशिप’ मिळाली व संशोधनासाठी ते इंग्लंडला गेले. तेथून त्यांनी २५ खंड होतील इतकी संशोधन सामग्री मिळविली.

     सन १८५८ साली छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र हा ६५० पृष्ठांचा चिकित्सक ग्रंथ प्रसिद्ध झाला. छत्रपती संभाजी महाराजांची युद्धनीती, त्यांची धर्मप्रवण वृत्ती त्यांचा ज्वलज्ज्वलन तेजस् पराक्रम या गोष्टी त्यामुळे सर्वांना ज्ञात झाल्या. या ग्रंथाच्या प्रसिद्धीसाठी यशवंतराव चव्हाण यांनी ७००० रुपयांचे अनुदान दिले.

     छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू येथील समाधीचा शोध त्यांनी लावला आणि तेथे स्मृतिदिन साजरा होऊ लागला.

     तुकाराम महाराजांच्या चरित्राचा प्रचंड अभ्यास आणि चरित्र लेखन करून त्यांचे अप्रकाशित अभंग प्रसिद्ध करून त्यांनी आपल्या संशोधन कार्यात मानाचा तुरा खोवला. याशिवाय छत्रपती मालोजीराजे, शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, राजा जयसिंग आणि शिवाजी महाराज, महाराष्ट्रेतिहासाची साधने (३ खंड), विजापूरची अदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, तुकाराम महाराज संतसांगाती, शिवराज्याभिषेक प्रयोग, तुकाराम महाराजांचे अप्रकाशित अभंग अशी ६०पेक्षा अधिक ग्रंथरचना त्यांनी केली.

     त्यांच्या पुढाकाराने सन १९६५मध्ये महाराष्ट्रेतिहास परिषद ही संस्था सुरू झाली. १९६३पासून मुंबई इतिहास संशोधन मंडळाचे ते संचालक झाले. महाराष्ट्र इतिहास परिषदेचे मुख्य कार्यवाह झाले.

     वयाच्या ८४व्या वर्षी तत्कालीन राज्यपाल सादिक अली यांच्या हस्ते त्यांना राज्य पारितोषिक मिळाले. याशिवाय मालोजी, शहाजी, शिवाजी महाराज या ग्रंथांना महाराष्ट्र राज्याची चार पारितोषिके मिळाली.

     आपले इतिहास संशोधन अतिशय सिद्धहस्त लेखणीद्वारे त्यांनी महाराष्ट्राशारदेच्या दरबारात रुजू केले. वयाच्या ८०व्या वर्षीसुद्धा त्यांनी राजाराम चरित्र लिहिले. हे करीत असता त्यांनी हुंडाविरोधी चळवळ उभी  केली. ब्रदरहुड  स्काउट  संघटना काढली आणि वयाच्या ९०व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली.

      त्यांनी उभ्या केलेल्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेला त्यांच्या नातीने, सौ. साधना डहाणूकर हिने देणगी दिली. त्यातून प्रतिवर्षी मान्यवर इतिहास संशोधकांना कै. वा. सी. बेंद्रे पुरस्कार दिला जातो.

डॉ. सदाशिव शिवदे

बेंद्रे, वासुदेव सीताराम