बोडस, लक्ष्मणराव
लक्ष्मणराव बोडस यांचा जन्म सांगलीत झाला. शंकरराव बोडसांचे ते धाकटे बंधू होत. बालपणी संगीत रंगभूमीशी लक्ष्मणरावांचा परिचय झाला. वृत्तीने ते थोडे हूड होते आणि शिक्षणात त्यांना कमी गोडी होती. मुंबईच्या गांधर्व महाविद्यालयात ते दाखल झाल्यानंतर त्यांचे इंग्रजी चौथ्या इयत्तेपर्यंतचे शालेय शिक्षण झाले. त्यांनी सांगलीत भूगंधर्व रहिमत खाँ, उ.अल्लादिया खाँ वगैरेंची गाणी खूप ऐकली होती. गांधर्व महाविद्यालयात शिकून ते चांगले गवई झाले व पं.पलुसकरांनी त्यांना कराची येथे संगीत प्रचारार्थ पाठविले.
त्यामुळे कराचीत १९३२-३३ च्या सुमारास बृहन्महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे तत्कालीन अध्यक्ष तात्यासाहेब गोखले यांच्या पुढाकाराने त्यांना जागा मिळाली व गायन-वादनाचे संगीत वर्ग सुरू झाले.
सुरुवातीला त्या भागात संगीताचे वातावरण निर्माण करताना कष्ट घ्यावे लागले. नंतर पुष्कळ विद्यार्थी शिकायला येऊ लागलेे. होळीच्या दिवसांत सिंध प्रांतात ‘हंडा’ या नावाचे संगीताचे कार्यक्रम होत असत. लक्ष्मणराव या मैफलीत गाण्यासाठी जात असत.
आकारयुक्त स्वरलगाव, भरावदार आवाज, आक्रमक गायनशैली, लयकारीच्या बोलताना, ताना, वेगवेगळे मुखडे घेऊन समेवर येणे ही लक्ष्मणरावांची गानवैशिष्ट्ये होती. खाँसाहेब मुबारक अली तेव्हा कराचीला होते. त्यांच्याकडून लक्ष्मणरावांनी गायनकला प्राप्त केली. त्यामुळे ग्वाल्हेर ढंगाच्या गमकयुक्त तानांबरोबरच मुबारक अलींच्या गाण्याचा ढंगही ते आपल्या गाण्यात मिसळत असत.
गायनासोबत वाचन आणि चित्रकला यांचीही त्यांना आवड होती. फाळणीनंतर १९४८ च्या सुमारास ते भारतात आले. नाशिक व अन्य ठिकाणी राहून शेवटी ते मुंबईत स्थायिक झाले. त्यांचे थोरले चिरंजीव नारायणराव बोडस हे चांगले गायक आहेत. धाकटे चिरंजीव अनंतराव अमीर हुसेन खाँचे गंडाबंध शागीर्द होते. ते चांगला तबला वाजवत. दुर्दैवाने त्यांचे लवकर निधन झाले.
लक्ष्मणरावांनी विद्यार्थ्यांचा वाद्यवृंद तयार केला होता. त्यात दिलरुबा, सतार, जलतरंग, हार्मोनियम, व्हायोलिन, बासरी व तबला या वाद्यांचा समावेश होता. सिंध प्रांतात पुष्कळ उत्सवांमध्ये या वाद्यवृंदाचे कार्यक्रम होत असत. अमूभाई दोशी, खानोलकर भगिनी, सुलक्षणा राणे, गग्गू आडवाणी, आबान मिस्त्री, अशोक दा. रानडे, नारायणराव व अनंतराव बोडस हे त्यांचे शिष्य होत.
लक्ष्मणराव वृत्तीने भाविक, रामभक्त व अजातशत्रू गायक होते. त्यांचे वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांचे पुत्र नारायणराव व नातू केदार बोडस हे त्यांचा गान-वारसा चालवत आहेत.