Skip to main content
x

बर्वे, सदाशिव गोविंद

        दाशिव गोविंद बर्वे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे झाला. त्यांचे वडील (अण्णासाहेब) उपजिल्हाधिकारी व नंतरच्या काळात सांगलीत दिवाण म्हणून काम करत होते. सदाशिव बर्वे यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल नाना वाडा येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्गसन महाविद्यालयात झाले. इंग्रजी व अर्थशास्त्र या विषयांत त्यांनी विशेष पारितोषिके मिळवत पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी एकाच वेळी केंब्रिज विद्यापीठाची पदवी मिळवली व आयसीएस परीक्षेतील यश प्राप्त केले. त्या वेळी त्यांना परदेशात उत्तम संधी असूनही, लोकसेवा करण्यासाठी बर्वे भारतात परतले.

बर्वे यांनी प्रथम अहमदाबाद येथे उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले. त्यांनी प्राध्यापक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या (तरुणांच्या) मदतीने आसपासच्या ग्रामीण भागातले रस्तेही श्रमदानाने सुधारले. ही त्यांच्या ‘ऑफ ट्रॅक’ कामाची सुरुवात होती. याच सुमाराला त्यांनी वैयक्तिक जीवनातही परंपरेला छेद देणारा एक निर्णय घेतला. त्यांनी जून १९३८ मध्ये शरयू गुप्ते यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. बर्वे हे स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांच्या सेवेत अधिकारी होते. कायदेभंगाची चळवळ जोमात चालू असताना त्यांनी अगदी ‘तारेवरची कसरत’ केली. सुरत, अहमदाबाद, मुंबई, धारवाड व पुणे येथे त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली. स्वातंत्र्यपूर्व काळात अहमदाबाद येथे झालेल्या धार्मिक दंगलीत त्यांनी कठोर व धाडसाने निर्णय घेतले आणि दंगल आटोक्यात आणली.

देश स्वतंत्र होत असताना ते पुण्याचे जिल्हाधिकारी होते. नियमांच्या चाकोरीत राहूनही कल्याणकारी राज्यकारभार कसा करता येतो, याचे त्यांनी उदाहरण घालून दिले. जुन्या दप्तरांची विल्हेवाट, स्वच्छता सप्ताह, विशिष्ट कालमर्यादेत ठरवून कामे पूर्ण करणे; पूर्ण झालेल्या कामाची कागदपत्रे मुदतीनंतर निकालात काढणे अशी आधुनिक कार्यपद्धती त्यांनी राबवली.

म. गांधींची हत्या झाली, त्या वेळी बर्वे पुण्याचे जिल्हाधिकारी होते. ज्याने हत्या केली, तो नथुराम गोडसे पुण्याचा. त्या वेळची प्रचंड तणावाची परिस्थिती बर्वे यांनी संयमाने व धाडसाने हाताळली.

पुणे महानगरपालिका १९४९ मध्ये अस्तित्वात आली. पुण्याचे पहिले आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारण्याआधी त्यांनी मुंबई म.न.पा.च्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या कामाचा पाया शास्त्रशुद्ध होता, नियोजन व पूर्वतयारी तपशीलवार असायची, तसेच योग्य कामासाठी सुयोग्य अधिकारी हे सूत्रही पक्के ठरलेले असायचे. पूर्वीच्या नगरपालिकेत पंचवीस वर्षांत जी कामे पूर्ण झाली नाहीत, ती कामे त्यांनी तीन वर्षांत पूर्ण केली. रस्ते, पूल, पाणी, सांडपाणी, वीज, गृहप्रकल्प, दवाखाने, बाजार, उद्याने... असा विविधांगी विचार करून त्यांनी पुढील पंचवीस वर्षांसाठीचा ‘नगर आराखडा’ कालबद्ध नियोजन व खर्चासह तयार केला. हडपसर, चिंचवड, सातारा रस्ता येथे औद्योगिक वसाहती उभ्या केल्या. संभाजी उद्यान, पेशवे पार्क यांच्या निर्मितीचे श्रेय त्यांनाच आहे.

त्यांनी लक्ष्मी रस्ता व जंगली महाराज रस्ता हे दोन प्रमुख रस्ते तयार केले. लक्ष्मी रस्ता रुंद करण्यात एक गणपतीचे देऊळ आड येत होते. बर्वे यांनी धाडसाने निर्णय घेऊन, रातोरात मंदिर हलवले; रस्ता रुंद केला. पुढे त्या गणपती मूर्तीचीही यथोचित पुनर्स्थापना केली आणि पुण्याची नगररचनात्मक, आर्थिक, औद्योगिक व शैक्षणिक प्रगती मोठ्या प्रमाणावर झाली. यामध्ये बर्वे यांचा निश्चितच मोठा वाटा आहे. १२जुलै१९६१ हा पुण्यासाठी काळा दिवस ठरला. पानशेत धरण फुटले. या वेळी बर्वे यांची उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. बर्वे यांनी ‘सरकारी अधिकाऱ्यांच्या विश्रामगृहा’चे कार्यालयात व ‘वॉर रूम’मध्ये रूपांतर केले. या काळात त्यांनी रात्रंदिवस अथक परिश्रम केले. पाणीपुरवठा, शहराची पुन:उभारणी, आरोग्यसेवा, लोकांना तातडीची मदत, त्यांचे पुनर्वसन, दळणवळण, संपर्क साधने इत्यादी सर्वच आघाड्यांवर त्यांनी स्वत: उत्तम कार्य केले आणि वेगाने कामे करवूनही घेतली.

पं.नेहरू व चिंतामणराव देशमुख यांनी बर्वे यांच्यावर दिल्लीजवळील फरीदाबादच्या उभारणीची जबाबदारी (१९५३) टाकली. एका वर्षात त्यांनी हे कार्य यशस्वीपणे पार पाडले. पुढे त्यांनी केंद्रीय अर्थमंत्रालयात सहसचिव म्हणून काम केले. “आंतरराज्य विक्रीकर कायदा या क्लिष्ट कायद्याची उकल करताना बर्वे यांनी दर्शवलेले कौशल्य म्हणजे अर्थखात्याच्या कामाचे शिखर होते,” ही सी.डी. देशमुख यांची प्रतिक्रियाच सर्वकाही सांगून जाते. अनेक खाजगी विमा कंपन्यांचे एल.आय.सी.मध्ये रुपांतर व इंपिरीयल बँकेचे स्टेट बँकेमध्ये रुपांतर करण्यातही त्यांचे विशेष योगदान होते.

बर्वे यांचे मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कानडी, उर्दू इत्यादी भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी भाषा मंडळावर चिटणीस म्हणून कार्य केले. मोठ्या द्वैभाषिक राज्याची विभागणी होत असताना विभाजन समितीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून काम केले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होताना बर्वे यांनी उत्तम, निर्णायक कामगिरी बजावली.

कोयना प्रकल्प निधीअभावी मागे पडत होता. या प्रकल्पाच्या आर्थिक नियोजनामध्ये त्यांनी मुख्य भूमिका बजावली. या प्रकल्पासाठी जागतिक बँकेचे दोन कोटी पन्नास लाख डॉलरचे कर्ज मंजूरीसाठी गेलेल्या शिष्ठमंडळाचे ते अध्यक्ष होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ते महाराष्ट्राच्या पहिल्या सिंचन आयोगाचे अध्यक्ष झाले. सिंचनविषयक संशोधनासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास केला आणि अभ्यासांती सहा पट (त्या वेळच्या प्रमाणाचा) जमीन सिंचनाखाली आणण्याचा अहवाल सादर केला.

एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असताना त्यांनी दापोडी, सातारा, भोर येथे स्थानकांसाठी घेतलेल्या जागा, या स.गो.बर्वे यांच्या द्रष्टेपणाचे द्योतक आहे. महाराष्ट्र उद्योग खात्याचे सचिव असताना मुंबईवरचा अतिरिक्त बोजा कमी करण्याचा केलेला प्रयत्न, उद्योगविषयक मूलभूत संस्थांची केलेली स्थापना, महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळ, पिंपरी-चिंचवड परिसरात उभारलेला टाटा उद्योग समूह, कृष्णा-गोदावरी पाणीतंटा आदी कामांच्या संदर्भात बर्वे यांनी निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे पुणे परिसरात नवीन मोठ्या उद्योगांची मुहूर्तमेढ रोवली गेली.

मुंबईचा विकास साधताना ‘वांद्रे-कुर्ला खाडीत भर घालावी’ आणि ‘त्या जागेचा उपयोग मध्यमवर्गीय व गरिबांच्या घरांसाठी करावा’, अशा सूचना त्यांनी केल्या होत्या. बर्वे यांनी शासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष म्हणून एक कडक अहवाल सादर केला. या अहवालात त्यांनी सत्ताधारी काँग्रेस पक्षावर सप्रमाण टीका केली. तत्कालीन नेते यशवंतराव चव्हाण यांनी काँग्रेसजनांना हा अहवाल गांभीर्याने घेण्यास सुचवले होते.

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी बर्वे यांना राजकारणात आणले. बर्वे यांनीही महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘समंजस नेतृत्वाला’ साथ द्यायचे ठरवले. १९६१ मध्ये त्यांनी सनदी नोकरीचा राजीनामा दिला. १९६२ मध्ये त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली. ते आपली प्रतिमा व कार्याच्या बळावर विजयी झाले.

१९६२ च्या राज्य मंत्रिमंडळात त्यांच्याकडे अर्थमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. पुढे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी उद्योग खात्याची जबाबदारी दिली. ठाणे, बेलापूर, खोपोली, पनवेल, चिपळूण, औरंगाबाद येथील औद्योगिक विकासाची मुळे ही बर्वे यांच्या कारकिर्दीतली आहेत.

१९६५ च्या दरम्यान बर्वे यांची केंद्रीय नियोजन आयोगाचे (उद्योग) सदस्य म्हणून नेमणूक झाली. महाराष्ट्रातील नेते अन्य राज्यांतील नेत्यांप्रमाणे आपल्या राज्याच्या मागण्या दिल्लीदरबारी पुढे रेटण्याकरिता एकत्र येत नाहीत, हे कटू वास्तव त्यांनी अनुभवले. तसेच नियोजन उत्तम प्रकारे केल्यावरही त्याची अंमलबजावणी किमान कार्यक्षमतेइतकीसुद्धा होत नाही, हेही त्यांच्या नजरेला आले. हे मुद्दे बर्वे यांनी परखडपणे मांडले होते.

कोणत्याही पदावरून काम करताना त्यांनी परखडपणा, निर्भीडपणा कधीही सोडला नाही. कातडी बचाव - खुर्ची बचाव असली कार्यपद्धती त्यांना माहीतच नव्हती. ‘सत्त्वाचा आणि तत्त्वाचा आग्रह व त्यासाठी कोणताही त्याग करायची तयारी’; त्याबाबत ते डॉ. चिंतामणराव देशमुख यांचे निष्ठावान अनुयायी होते.

सदाशिव बर्वे राज्यसभेवर सहजपणे खासदार होऊ शकले असते. पण त्यांनी १९६७ ची ईशान्य मुंबईची निवडणूक लढवली. काँग्रेसने बर्वेंना तिकीट दिले व आपल्याला नाकारले म्हणून कृष्ण मेनन यांनी बंड केले. ‘हा नेहरूंचा अपमान’ असा कांगावा केला. मेनन यांनी निवडून येण्यासाठी शक्य तितके अनेक मार्ग वापरले. नव्याने स्थापन झालेल्या शिवसेनेने बर्वे यांना पाठिंबा दिला. ही निवडणूक राज्यात व देशात गाजली. बर्वे यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही गैरमार्गाचा वापर न करता त्यांनी विजय मिळवला आणि जनता सामाजिक कामाला महत्त्व देते हे सिद्ध केले.

निवडणूक जिंकल्यानंतर पुढील वाटचालीच्या दृष्टीने बर्वे दिल्लीला गेले. त्यांना अर्थ किंवा उद्योग खाते मिळणार हे स्पष्ट होते. पण दिल्ली येथेच सदाशिव बर्वे यांचे दु:खद निधन झाले.

- बळवंत शंकर बर्वे  /  विनय मावळणकर

बर्वे, सदाशिव गोविंद