Skip to main content
x

भोईटे, रामचंद्र भाऊसाहेब

      रामचंद्र भाऊसाहेब भोईटे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाघोली गावात झाला. त्यांचे इंग्रजी चौथीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर ते आपल्या पारंपरिक शेती व्यवसायाकडे वळले. त्यांनी कर्ज घेऊन वाघोली गावाजवळील पडीक जमीन विकत घेतली. या पडीक जमिनीत त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी अपार कष्ट घेतले. तेथील झाडे काढून टाकली. बैल व बुलडोझर यांच्या सहाय्याने त्यांनी जमिनीचे सपाटीकरण केले. त्यांनी १८ हेक्टर जमिनीपैकी १२ हेक्टर जमीन लागवडीखाली आणली. त्यांनी आपल्या शेतात ५ विहिरी खोदल्या. त्यांची सर्वच जमीन हलकी व मुरमाड असून सर्व क्षेत्र विहिरीने भिजत राहील असे केलेले आहे. त्यांनी १९७३मध्ये ऐन दुष्काळात आपल्या विहिरीत १२५ फूट खोलीचे बोअर घेतले. त्याला भरपूर पाणी लागल्याने त्यांना सर्व क्षेत्र बागायत करणे शक्य झाले. भोईटे यांनी चिकाटी, परिश्रम, योग्य मार्गदर्शन यांचा अवलंब करून आपल्या शेतीमध्ये विक्रमी उत्पादन सातत्याने घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ते सर्व प्रकारची सुधारित शेत अवजारे, ट्रॅक्टर,जीप व ट्रक यांचा वापर करत असत. त्यांनी आपल्या जमिनीतून उसाचे हेक्टरी १५० टनांपर्यंतचे लक्षणीय उत्पन्न घेतले. तसेच त्यांनी आल्याचे २५ टनांपर्यंतचे उत्पादन काढले व टॉमेटो व बटाटा यांचे विक्रमी उत्पादन घेण्याचा सातत्याने प्रयत्न केला. नजीकच्या तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक शेतकरी त्यांची शेती पाहण्यासाठी येत,शेती पाहून प्रभावी होत. त्यांना ते विनामोबदला मार्गदर्शन करत. अनेक शेतकऱ्यांना ते चालतेबोलते कृषी-विद्यापीठ वाटत.

- संपादित

भोईटे, रामचंद्र भाऊसाहेब