Skip to main content
x

चॅपलीन, विल्यम

      इंग्रजी शिक्षणाद्वारे नव्या शास्त्रांची लोकांना ओळख करुन द्यावी अशी इंग्रज अधिकाऱ्यांची इच्छा होती त्यासाठी सन १८२१ मध्ये पुण्यात हिंदू शास्त्रांचे शिक्षण देणारे संस्कृत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय झाला. तत्पूर्वी लोकांना विश्‍वासात घेण्याच्या उद्देशाने कमिशनर विल्यम चॅपलीन याने दसऱ्याच्या दिवशी पेशव्यांचे निवासस्थान विश्रामबाग वाडा येथे दरबार आयोजित केला व जमलेल्या समुदायास आपली योजना सादर केली.

     पेशवे दक्षिणा रुपाने विद्यावेतन वाटत. पण इंग्रज सरकारने फक्त ५०,००० मंजूर केले. त्यातील रु. तीस हजार दक्षिणा रूपाने वाटावयाचे व उरलेले रु. वीस हजार नव्या पध्दतीच्या शिक्षणासाठी खर्च करायचे असे ठरले. चॅपलीनने या वीस हजारांची योजना तयार केली. विद्यार्थ्यांसाठी मराठी पुस्तके तयार करणे, महाविद्यालयामधील शिक्षकास पगार, विद्यार्थ्यांना विद्यावेतन (दक्षिणा फेलोशिप) महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरील खर्च, ग्रंथालय इत्यादी बाबींवर दक्षिणा फंडातून खर्च करायचे ठरले.

     चॅपलीन योजनेत अनेक महत्वाच्या गोष्टींबाबत निर्णय घेण्यात आले, या योजनेत दहा विषय शिकवण्याची व्यवस्था करण्यात आली. ते असे, व्याकरण, अलंकार, न्याय, धर्मशास्त्र, ज्योतिष, वेदांत, वैद्यक, ऋग्वेद व यजुर्वेदाच्या दोन शाखा. विषय निवडीबाबत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य होते. पण फक्त वेदांचे अध्ययन करता येत नसे. वेदांबरोबर अन्य विषयही अभ्यास़णे जरुरीचे होते. कायदा, गणित व वैद्यक या विषयांना प्राधान्य दिले होते. हे विषय शिकणाऱ्यांना प्रोत्साहनपर जास्त विद्यावेतन दिले जाई. धर्मशास्त्र व न्याय विषय शिकणाऱ्यास न्यायालयातील विवाद सोडविण्यास मदत करावी लागे. त्यांना आपले मत द्यावे लागे.

      महाविद्यालयामध्ये एकूण १०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळे. दहा गुरु नेमले होते व प्रत्येक गुरुकडे दहा विद्यार्थी शिकत, दहापैकी कोणत्याही एका शास्त्रात प्राथमिक शिक्षण झालेल्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळे. सर्वसाधारणपणे दहाव्या वर्षी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळे. विद्यार्थ्याला त्याच्या शास्त्राचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी सात ते बारा वर्षे लागत. दक्षिणा फंडातून होतकरु विद्यार्थ्यांना दरमहा पाच रुपये विद्यावेतन देण्याची योजना करण्यात आली. मासिक पाच रुपयांशिवाय काही विद्यार्थ्यांना वर्षाअखेर त्यांच्या प्राविण्यानुसार बक्षिसही दिले जाई.

       पेशवाईचा अंत झाल्यावर सन १८१८ मध्ये पेशव्यांच्या निवासस्थानास कुलूप घालण्यात आले. सन १८२१ मध्ये संस्कृत महाविद्यालय सुरु करण्याचे ठरल्यावर पुण्याचा कमिशनर चॅपलीन याने वाड्याचे कुलूप काढले व तो वाडा संस्कृत महाविद्यालयाला दिला. त्यात गुरु व विद्यार्थी यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच महाविद्यालयाचे कार्यालय व अध्यापनाचे वर्गही पेशवेवाड्यात (विश्रामबाग वाडा) होते. महाविद्यालय जूनमध्ये सुरू होई व परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात येत. पेशव्यांचे खाजगी ग्रंथालय होते. तेथील सर्व पुस्तके, पोथ्या महाविद्यालयाला देण्यात आल्या. महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म्हणून राघवाचार्य रामानुज यांची नेमणूक झाली. चॅपलीनने गुरु व उपगुरु ही दोन पदे निर्माण केली. त्यांचे काम अध्यापनाचे होते. आचार्यांना दरमहा रु. १०० व पंडितांना रु. ६० हा पगार ठरला गेला. वैदिकांना मात्र रु. ४० मिळत.

      दक्षिणारुपाने ब्राह्मणांना विद्यावेतन दिले जाई. अनेकजण पाठशाळा चालवत त्यांना दक्षिणारुपाने मदत केली जाई. पुण्याचा कमिशनर विल्यम चॅपलीन याने त्याबाबत नियम केले. दक्षिणा वाटण्यासाठी पाच शास्त्र्यांची समिती नेमली. दक्षिणा मागण्यास आलेल्या ब्राह्मणांची परिक्षा घेऊन मगच दक्षिणा द्यावी असे चॅपलीनने सुचविले. पहिल्या वर्षी २६७५ ब्राह्मणांची परीक्षा घेऊन त्यांना रु. ५४,४०४ दक्षिणा रूपाने दिले. दरवर्षी ही रक्कम कमी होई व १८२४ मध्ये (चॅपलीन काळात) फक्त तीस हजार रुपये दक्षिणा रूपाने वाटले.

       पुण्यात आधुनिक संस्थामय शिक्षणाची सुरुवात विल्यम चॅपलीन या पुण्याच्या कमिशनरच्या पुढाकाराने झाली. त्याने संस्कृत महाविद्यालय ही संस्था सुरू केली. त्यासाठी आवश्यक असणारी पायाभूत संरचना त्याने उभारली. इमारत, ग्रंथालय, शिक्षक, विद्यार्थी, प्रवेशाचे नियम, परीक्षा, शिक्षकांची आवश्यक कौशल्ये, विद्यावेतन ह्या सर्व प्राथमिक बाबींबाबत चॅपलीनने यथार्थ निर्णय घेतले व नियम घालून दिले. महाराष्ट्रातील आधुनिक शिक्षणाचा शिल्पकार म्हणून त्याला गौरवणे योग्यच होईल.

- डॉ. नीळकंठ बापट

चॅपलीन, विल्यम